सांगलीच्या राजानं ठरवलं, कृष्णेच्या महापुराला तोंड देईल असा महाप्रचंड पूल उभारायचा.

गेल्या काही महिन्यापूर्वी महापुराने अख्ख्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना झपाटल होतं. कित्येक वर्षात कित्येक पिढ्यांमध्ये बघितलेल्या मध्ये आलेला हा सर्वात मोठा पूर होता. जवळपास महिनाभर लोक पूर कधी ओसरणार याकडे डोळे लावून बसले होते.

या भागात पूर किती वाढलाय हे कळण्याचे एकच माप आहे, आयर्विन पूल. 

हा आहे सांगली गावचा नव्वद वर्षापूर्वीचा पूल. या पूलावर पाणी किती चढलय याच माप दिल आहे. पण फक्त इथलीच नाही तर कोल्हापूरवाली माणस सुद्धा आयर्विन पुलावर पाणी किती चढलय हे विचारतात आणि त्यावरून महापुराचा अंदाज लावतात.

हा पूल बनला या मागे सुद्धा एक महापूर आहे.

गोष्ट आहे १९१४ सालची. तेव्हा अख्ख्या भारतावर इंग्रजांच राज्य होतं. सांगली संस्थानमध्ये चिंतामणराव पटवर्धन(दुसरे) गादीवर होते. त्यावर्षी कृष्णेला महापूर आला. तसही दरवर्षी पावसाळ्यात सांगलीहून नदी पार करून जाणे अशक्य असायचं. कृष्णेचा पूर ही तेव्हाही डोकेदुखीच होतीचं. पण यावेळचा पूर हा न भुतोनभविष्यती असा होता. गावाचा संपूर्ण संपर्क तुटला. अनेक घरे पाण्याखाली गेली. कोणतीही मदत पोहचणे अशक्य होतं.

सांगली गावाला पाण्याने वेढल होतं. राजाने ठरवलं यावर कायमचा तोडगा काढायचा. कोणत्याही महापुराला तोंड देईल असा पूल उभारायचा.

त्यांनी आपल्या दरबारातल्या इंग्रज अधिकाऱ्याशी चर्चा केली आणि सांगलीच्या स्टेट असेंब्लीत एका पुलाचा प्रस्ताव मांडण्यात आला. राजाच्या मनात महाप्रचंड पूल बांधायचं होतं. त्यासाठी खर्च देखील  मोठा होता. पण हा प्रस्ताव पास व्हायला अनेक वर्षे गेली.

सांगलीच्या राजाने स्वतःच्या राजवाड्याचे काम मागे ठेवून पहिल्यांदा हा पूल पूर्ण करायला निधी उपलब्ध करून दिला.

प्रस्ताव मंजूर होऊन काम सुरु व्हायला १९२७ साल उजाडले. खर्च साधारणपणे ६ लाख ५० हजार रुपये इतका अंदाजित होता. बांधकामाचे कंत्राट पुण्यातील रानडे & सन्स या कंपनीकडे दिले गेले. सांगली संस्थानचे चीफ इंजिनियर श्री. भावे हे या बांधकामाचे प्रमुख होते. प्रमुख सल्लागार म्हणून तत्कालीन मुंबई इलाख्याचे निवृत्त झालेले चीफ इंजिनियर श्री. व्ही.एन.वर्तक यांना नेमण्यात आले.

पायाखुदाई चिंतामणराव पटवर्धनांच्या हस्ते १७ फेब्रुवारी १९२७ रोजी करण्यात आली, व १६ एप्रिलला चिंतामणराव आणि राणीसाहेब यांच्या हस्ते बांधकामाचा पहिला दगड ठेवण्यात आला. पुढे २ वर्षे ९ महिन्यात हा भव्य आणि सुंदर पूल बांधून तयार करण्यात आला. या पुलाला तत्कालीन व्हॉइसरॉय आयर्विन यांचे नाव देण्याचे ठरले. 

१८ नोव्हेंबर १९२९ रोजी भारताचे व्हाईसंरॉय एडवर्ड लिंडलेवुड उर्फ  बॅरन आयर्विन ऑफ कर्बी अंडरडेल आणि त्यांची पत्नी उद्घाटनासाठी सांगलीला आले. भव्य समारंभांनंतर हा आयर्विन पूल सामान्य जनतेसाठी खुला करण्यात आला.

या पुलाच्या बांधकामावर इंग्रज काळातील गॉथीक शैलीचा प्रचंड प्रभाव आहे. नदीच्या तळापासून याची उंची जवळपास ७० फुट आहे. एकूण तेरा मजबूत खांबावर हा पूल उभा आहे. यातीलच एका खांबावर नदीच्या पातळीचे वेगवेगळे माप लिहून ठेवले आहेत.

पुण्या-मुंबईहून सांगलीला येणाऱ्या प्रत्येकाला हा पूल पार करूनच सांगलीत प्रवेश घ्यावा लागतो.गेली नव्वद वर्षे हा संथ वाहणाऱ्या कृष्णामाईवर ठामपणे उभा असणारा हा पूल सांगलीची ओळख बनला आहे.

हा फक्त आपल्या सौंदर्यासाठी व मजबुती साठी म्हणूनच नाही तर एक वास्तूशास्त्राचं आश्चर्य देखील आहे. हा पूल बांधताना पटवर्धन राजांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या मदतीने पूररेषेचा अभ्यास केला होता. जर अख्खी सांगली बुडली तरचं हा आयर्विन पूल बुडेल.

आज गेल्या अनेक शतकामध्ये आला नाही असा महापूर आला आहे, सांगलीचा कित्येक भाग पाण्याखाली गेलाय पण आयर्विन पुल बुडेल इतक पाणी आलेलं नाही. आजकाल जी पुले बांधली जातात यात कधीही एवढा दूरदृष्टीचा विचार केला असेल असं वाटत नाही.

खऱ्याअर्थाने आयर्विनपूल हा सांगलीकरांचा आधार आहे. सांगलीकरांचा अभिमान आहे.

हे ही वाच भिडू.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here