नाशिकच्या महादेवाच्या मंदिरात नंदी बैलच नाही !

महादेवाचं मंदिर म्हंटलं की तिथे नंदी असणार हे ओघानेच आलं. जसं गळ्यातला नाग, हातातलं त्रिशूळ आणि डमरू यांशिवाय महादेवाची कल्पना आपल्याला करता येत नाही, अगदी तसंच नंदीशिवाय महादेवाच्या मंदिराची कल्पना देखील  आपल्याला करवत नाही.

महादेवाच्या कुठल्याही मंदिरात गेलं की आधी महादेवाचं वाहन असलेल्या नंदीसमोर झुकायचं आणि मगच महादेवासमोर डोकं टेकवायचं हे महादेवाच्या भक्तांसाठी सवयीचंच. कारण जिथे कुठे महादेवाचं मंदिर असतं, त्या मंदिरासमोर नंदी देखील असतोच. पण आज आम्ही तुम्हाला सांगतोय महादेवाच्या एका अशा मंदिराबद्दल जिथे महादेवासमोर नंदी नाही.

हो ! तुम्ही बरोबरच वाचलंत ! महादेवाचं असं मंदिर ज्याच्यासमोर नंदी नाही.

अशाप्रकारचं हे महादेवाचं देशातलंच नाही तर जगातलं एकमेव मंदिर असून ते  महाराष्ट्रातच आहे. हे मंदिर म्हणजे नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेलं कपालेश्वर महादेव मंदिर होय.

नंदी नसण्यामागे नेमकं कारण काय..?

या मंदिरात महादेवासमोर नंदी नसण्यामागे एक आख्यायिका आहे. या आख्यायिकेनुसार कोणे एके काळी ब्रह्मदेवाला ५ तोंडं  होती. त्यातील ४ तोंडं तर ईश्वराची आराधना आणि नामस्मरण करायची, पण १ तोंड मात्र सारखंच ईशनिंदा करायचं.

महादेवाला ज्यावेळी ही गोष्ट समजली त्यावेळी महादेवाने ब्रह्मदेवाचं हे तोंड त्यांच्या धडापासून वेगळं केलं आणि त्यामुळे महादेवाला ब्रह्महत्येचं पाप लागलं.

ब्रह्महत्येच्या या पापापासून मुक्ती मिळविण्यासाठी महादेव ब्रह्मांडात सगळीकडे फिरून आले पण त्यांना कुठलाच उपाय सापडत नव्हता. शेवटी महादेव फिरता-फिरता सोमेश्वर येथे पोहोचले. तिथे त्यांना भेटलेल्या नंदीने महादेवांना या पापापासून मुक्ततेचा उपाय सांगितला.

नंदी महादेवाला गोदावरीच्या रामकुंडात घेऊन गेला आणि त्या कुंडात डुबकी मारायला सांगितली. जशी महादेवाने रामकुंडात डुबकी मारली, तशी त्यांची ब्रम्हहत्येच्या पापापासून मुक्ती मिळाली.

अशाप्रकारे नंदीमुळेच महादेव ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त होऊ शकल्याने त्यांनी नंदीला आपला गुरु मानलं आणि महादेव त्याच ठिकाणी शिवलिंगाच्या रुपात स्थापित झाले. आता नंदी महादेवाचे गुरु झाल्याने महादेवानेच त्यांना आपल्यासमोर बसण्यास मनाई केली. त्यामुळे या मंदिरासमोर नंदी नाही.

हे ही वाच भिडू

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here