मुस्लीम असल्याने डॉ.अब्दुल कलमांची बसण्याची जागा बदलण्यात आली होती..!!!

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. देशातील अनेकांच्या स्वप्नांना ‘अग्निपंख’ देणारा शास्त्रज्ञ आणि देशाला मिसाईल देणारा ‘मिसाईल मॅन’. शिवाय देशाचे सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपती देखील. या झाल्या कलाम साहेबांबद्दल आपल्या सगळ्यांना माहित असलेल्या गोष्टी, पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना याची  कल्पना असेल की कलाम साहेबांनी लहानपणी आपल्या भविष्यातील करिअरसाठी काहीतरी वेगळच ठरवलं होतं. आपण मोठे होऊन शास्त्रज्ञ होऊ असा विचार देखील कधी त्यांच्या मनाला शिवला नव्हता.

लहान असताना कलाम साहेबांनी असं ठरवलं होतं की आपण मोठ होऊन नारळाच्या झाडावर जाऊन नारळ तोडायची. कलाम साहेबांना हे काम करायचं होतं, त्यामागे देखील एक रंजक किस्सा होता. कलाम साहेबांना  कायमच उंचीचं आकर्षण होतं. लहान असताना जेव्हा ते नारळाच्या झाडावर चढून नारळ तोडणाऱ्या कुठल्याही व्यक्तिला बघत असत त्यावेळी ते खूप आनंदित होत असत. शिवाय जगात यापेक्षा उंच दुसरं काहीच असू शकत नाही. त्यामुळे आपण देखील पुढे चालून हेच काम करायचं असं कलाम साहेबांना वाटायचं.

‘रेड टर्टल’ प्रकाशनाने ‘माय लाइफ’ नावाचं कलाम साहेबांचं आत्मचरित प्रकाशित केलेलं आहे. त्यातच त्यांनी हा किस्सा लिहिलाय. कलाम साहेब लिहितात की, “ पायलट होण्यापूर्वी लहान असताना मी विचार करायचो की आपण झाडावर चढून नारळ तोडण्याचं काम करावं. हेच आपल्यासाठी एक अतिशय चांगलं करिअर होऊ शकेल. नारळ तोडण्यासाठी झाडावर चढणारी व्यक्ती खूप उंचावर जाते. त्यांच्यापेक्षा जास्त उंचीवर कुणीच पोहचू शकत नाही. नारळाच्या झाडाच्या टोकावरून कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील.

राष्ट्रपती म्हणून कलामांवर देशाने प्रेमाचा प्रचंड वर्षाव केला असला तरी लहानपणात मुस्लीम असल्याने त्यांना भेदभावाचा देखील सामना करावा लागला होता. याविषयी देखील कलाम साहेबांनी आपल्या आत्मचरित्रात लिहीलय. रामेश्वरमच्या एलीमेंट्रि शाळेत शिकत असताना कलाम साहेबांची रामनाधा शास्त्री नावाच्या एका ब्राम्हण मुलाशी खूप छान गट्टी जमली होती. मैत्री इतकी घट्ट झाली होती की जिथे कुठे जातील तिथे ही जोडी सोबतच असायची.

पण ज्यावेळी शाळेत नव्यानेच आलेल्या एका शिक्षकाने या दोघांना एकत्र बघितलं, त्यावेळी या शिक्षकाने तडकाफडकी कलाम साहेबांची बसायची जागा बदलली होती. याप्रसंगाविषयी ते लिहितात की, “ शिक्षकांनी माझ्या जागेवरून उठवून मला दुसरीकडे बसवलं होतं. त्यामुळे मी प्रचंड दुखावला गेलो होतो. मला आठवतंय की या प्रसंगानंतर मी रडत बसलो होतो, कारण माझ्या जवळच्या मित्राजवळची जागा माझ्याकडून हिसकावून घेण्यात आली होती. ‘हिंदू-मुस्लीम’ सोबत बसू शकत नाहीत असं कुणी सांगितलंय…?”

रामनाधा शास्त्री यांच्या वडिलांना ज्यावेळी ही गोष्ट समजली त्यावेळी मात्र त्यांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटवल. ते कलाम साहेबांच्या वडिलांना घेऊन शाळेत गेले आणि संबंधित शिक्षकांना भेटले. धर्मामुळे भेदभाव करण्यात येऊ नये. ज्याचा-त्याचा धर्म प्रत्येकाने घरीच ठेवावा असं त्यांनी शिक्षकांना समजावून सांगितल्यानंतर हे प्रकरण मिटलं आणि दोन्ही मित्र परत सोबत आले.

बहुतेकांना याची कल्पना नसेल पण कलाम साहेबांची इंडियन एअर फोर्समध्ये फायटर पायलट होण्याची संधी फक्त एका जागेमुळे हुकली होती. या जागांसाठी ज्यावेळी यादी जाहीर झाली होती त्यात कलमांचं नांव नवव्या स्थानी होतं आणि फक्त ८ जणांचीच भरती होणार असल्याने त्यांना ही संधी गमवावी लागली होती.

शास्त्रज्ञ म्हणून एवढी मोठी कारकीर्द, देशाचे राष्ट्रपती म्हणून देखील प्रचंड लोकप्रियता मिळविल्यानंतर देखील कलाम साहेबांना आपला शिक्षकी पेशाच सर्वाधिक प्रिय होता. त्यामुळेच राष्ट्रपती भवन सोडल्यानंतर लगेचच ते या पेशात परत आले. एकदा एका पत्रकाराने त्यांना विचारलं होतं की, तुमच्या कुठल्या कामासाठी (शास्त्रज्ञ, राष्ट्रपती आणि शिक्षक) तुम्हाला लक्षात ठेवण्यात यावं असं तुम्हाला वाटतं..? या प्रश्नावर उत्तर देताना देखील कलाम साहेबांनी आपल्या प्रिय शिक्षकी पेशाचीच निवड केली होती.