लोकांच्या कापलेल्या केसांनी कोरियन अर्थव्यवस्थेला युद्धाच्या दुष्परिणामांपासून वाचवलं होतं.

१९६० च्या दशकाच्या सुरुवातीला उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या कोरियन द्वीपकल्पावरील देशांमध्ये कोरियन युद्ध झालं होतं. अमेरिका दक्षिण कोरियाच्या बाजूने होतं, तर रशिया उत्तर कोरियाच्या.

युद्ध कुठलंही असो, ते कधीच कुणासाठी हितकारक नसतं. या युद्धाचे देखील अनेक वाईट परिणाम दोन्ही राष्ट्रांना भोगावे लागले होते. कोरियन अर्थव्यवस्था तर अगदी रसातळाला गेली होती. देशाची आर्थिक स्थिती इतकी वाईट होती की लोकांना २ वेळच्या खाण्यासाठी देखील मारामारीची वेळ होती. लोक आपल्या उपजीविकेसाठी डोक्यावरील केस विकून मिळेल तो पैसा जमवत होते. कारण करण्यासाठी दुसरं कामच नव्हतं.

अशा परिस्थितीतून दक्षिण कोरियाला बाहेर काढलं होतं ते ‘विग इंडस्ट्री’ने. त्यावेळी लोकांचे केस विकत घेण्यासाठी कोरियाच्या शहरांमध्ये फेरीवाले फिरत असत. लोकांचे जमवलेले केस हे फेरीवाले गोरु जिल्ह्यातील विग इंडस्ट्रीला जाऊन विकत असत. या ठिकाणी वेगवेगळे विग बनवण्याचं काम चालत असे.

कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेमुळे देशातील बहुतेक उद्योगधंदे बंद पडू लागले होते आणि बेरोजगारी वाढायला लागली होती. त्याचवेळी विग बनवण्याच्या केंद्रांमध्ये मात्र लोकांच्या हाताला काम आणि पर्यायाने पैसा मिळू शकत होता. जसजशी वर्षे जात होती, तसतशी ही इंडस्ट्री देखील मोठी व्हायला लागली होती.

विग इंडस्ट्री किती झपाट्याने वाढत होती याचा अंदाज आपल्याला या गोष्टीवरून येईल की १९६० च्या दशकांती देशातील निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या यादीत १० व्या स्थानावर असलेली ही इंडस्ट्री ७० च्या दशकाच्या अंती टेक्स्टाईल आणि प्लायवूड इंडस्ट्रीनंतर तिसऱ्या स्थानी आली होती. कोरियातील विगला जगभरातून मागणी वाढू लागली होती.

कोरियन युद्धात दक्षिण कोरियाच्या बाजूने उभ्या असणाऱ्या अमेरीकेमध्येच या विगला मोठ्या प्रमाणात मागणी होती. असं सांगतात की त्यावेळी अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या विगच्या संख्येच्या एक तृतीयांश विग हे कोरियामधून येत असत. यामागे विचारधारांचं युद्ध देखील होतं. शीतयुद्धाच्या दरम्यान अमेरिकेने साम्यवादी देशांकडून होणाऱ्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली होती. त्याचा देखील फायदा दक्षिण कोरियाच्या विग इंडस्ट्रीला झाला होता.

पार्क चुंग ही

विग इंडस्ट्रीने फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेलाच आधार दिला नव्हता तर देशाच्या राजकीय पटलावर देखील मोठे बदल घडवून आणले होते.१९९३ साली पार्क चुंग ही यांची सत्ता जाऊन किंग यंग सॅम यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही सरकार स्थापन होण्यात देखील या इंडस्ट्रीची मोठी भूमिका होती. विग इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अनेक कामगारांना ज्यावेळी १९७९ मध्ये कामावरून कमी करण्यात आलं होतं, त्यावेळी या कामगारांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं होतं, यावेळी किंग यंग सॅम हे आंदोलकांच्या समर्थनात उतरले होते. आपल्या राजकीय पक्षाचं कार्यालय त्यांनी आंदोलाकांसाठी खुलं करून दिलं होतं. याचाच त्यांना पुढे फायदा झाला होता.

आजघडीला देखील दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेत विग इंडस्ट्रीचं स्थान महत्वपूर्ण आहे. ‘ही-मो’ हा विग उत्पादनातील दक्षिण कोरियन ब्रांड जगभरात प्रसिद्ध आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here