शालिनीताई पाटलांमुळं लागूंचा ‘सामना’ सुपरहिट झाला !

सामना” , मराठी चित्रपटाचा एक ऐतिहासिक टप्पा. राजकीय परिस्थितीवर बिनधास्त भाष्य करणारा पहिला सिनेमा.  विजय तेंडुलकरांची कथा, पटकथा, जब्बार पटेलांच दिग्दर्शन , भास्कर चंदावरकर याचं संगीत असे हे सगळे रंगभूमीवरचे एका पेक्षा एक मोठे कलाकार पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर आले होते. आणि त्यांना एकत्र आणलं होत रामदास फुटाणे या तरुण निर्मात्यानं.

परंतु सगळ्यात जास्त उत्सुकता होती जेष्ठ खलनायक निळू फुले आणि नटसम्राट श्रीराम लागू यांच्या जुगलबंदीची. 

सहकाराची साखर खाऊन मोठा झालेला निळू फुलेंचा बेरकी राजकारणी हिंदुराव झेंडेपाटील विरुद्ध त्याच्या गावात आलेला एकपूर्वाश्रमीचा गांधीवादी आणि आता दारुडा झालेला लागूंचा मास्तर असा तो सामना.

 तेंडुलकर लिहित होते आणि शुटींग चाललं होत. निर्माता दिग्दर्शक पटकथाकार सगळ्यांचा पहिलाच सिनेमा असल्यामुळे चित्रपटाच्या लांबीचा अंदाजच कोणाला येत नव्हता. शुटींग संपत आलं तेव्हा लक्षात आलं की सिनेमा तब्बल चार-साडे चार तासाचा बनला आहे.  एवढा मोठा चित्रपट बघण्याची प्रेक्षकांची मानसिकता नसते. यामुळे एडिटिंगची कात्री जोरात चालवावी लागणार होती.

रामदास फुटाणे यांनी राज कपूरच्या संगम चित्रपटाप्रमाणे सामना मध्ये ही दोन मध्यांतर ठेवू असा प्रस्ताव मांडला पण तो बारगळला. अखेर निर्दयपणे एडिटिंग करून चित्रपटाचे २ तास कमी करण्यात आले. यामध्ये पटकथेचे अनेक सांधे निसटून गेले. कथेमधल्या अनेक प्रश्नांची उत्तर सुद्धा गळाली.

कथे पेक्षाही निळू फुले आणि श्रीराम लागू यांच्या व्यक्तीरेखाचा संघर्ष हीच या सिनेमाची युएसपी होती.

आधीच हा चित्रपट या सगळ्या प्रतिभावान व्यक्तींच्या नावामुळे प्रायोगिक समजला जात होता. त्यात एडिटिंगमुळे तो अजून अनाकलीय बनला . यामुळे हा पिक्चर फक्त बुद्धीवाद्यांचा सामान्यांना न समजणारा अशी काहीशी प्रसिद्धी झाली.  चित्रपट खूप मोठा व्यवसाय करेल अशी कोणाला अपेक्षाही नव्हती. तसच घडलं. लोकाकडून मागून जमा केलेल्या पैश्यातून रामदास फुटाणेनी हा सिनेमा बनवला होता. तरीही अशाही स्थितीत त्यांची तीक्ष्ण विनोदबुद्धी खिलाडूवृत्ती दाखवत होती.

हा पिक्चर पडला असं समजून सगळे आपापल्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये गुंतून गेले आणि अचानक बातमी आली की सामनाला लोकांची गर्दी सुरु झाली आहे.

चौकशी केल्यावर कळालं की याच्या मागे होत्या शालिनीताई पाटील.

झालं असं की कोणीतरी शालिनीताई पाटील यांना सांगितलं होत की हा चित्रपट साखरसम्राटांच वाईट चित्रीकरण करतो. पर्यायाने सहकार आणि ग्रामीण संस्कृतीच्या विरोधात उच्चवर्णीयांनी केलेलं हे कारस्थान आहे. शालिनीताई या तेव्हा काँग्रेसचे मोठे नेते असलेल्या वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. त्यांना स्वतःलाही राजकीय महत्वाकांक्षा होती. त्यांच वैयक्तिक राजकीय वजन सुद्धा मोठ होतं.

सामना या सिनेमाला सेन्सॉर बोर्डने बॅन केले पाहिजे म्हणून त्यांनी आंदोलन छेडले.

औरंगाबाद शहरात सामनाचा शो सुरु असताना जमावाने चित्रपटगृहावर हल्ला केला. दगडफेक झाली, थिएटरचा पडदा जाळण्यात आला. पोलिसांना लाठीमार करावा लागला.  दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरात हेडलाईनची बातमी झाली. अनेक उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. आणि पिक्चर मध्ये नेमकं काय दाखवलय या बद्दलच्या उत्सुकतेन लोकांचे पाय परत सामनाकडे वळले. पिक्चर जोरात चालू लागला.

रामदास फुटाणे तर कायम विनोदाने सामनाच यश हा तर शालिनीताईंचा कृपाआशीर्वाद असं म्हणतात.

पुढे जेष्ठ सिनेअभिनेत्री नर्गिस आणि सुनील दत्त यांच्या प्रयत्नातून हा पिक्चर जर्मनीच्या मानाच्या बर्लिन चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेला. त्यानंतर सामना ने इतिहास घडवला. आजही सामनाला सामाजिक, राजकीय चित्रपटांच्या यादीत कल्ट सिनेमा म्हणून सर्वोच्च स्थान दिले जाते.

हे ही वाच भिडू.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here