भावकीच्या भांडणातून ‘आदिदास’ आणि ‘प्युमा’ ब्रँँडचा जन्म झाला.

‘आदिदास’ आणि ‘प्युमा’

क्रीडा साहित्याच्या उत्पादनातील जगभरातील २ दादा ब्रँँड. क्रीडा साहित्याच्या जगभरातल्या मार्केटवर या दोन कंपन्यांनी आपला मोठ्या प्रमाणात ताबा मिळवलाय. पण तुम्हाला माहितेय का की या दोन्ही कंपन्यांचे संस्थापक एकमेकांचे सक्खे भाऊ होते आणि दोन्हीही ब्रँँडचा जन्म एकाच कंपनीच्या विभाजनातून झालाय. आज ‘माहितीच्या अधिकारात’ जाणून घेऊयात कसा भावकीच्या भांडणातून जगाला हे दोन ब्रंड मिळाले ते.

साधारणतः पहिल्या महायुद्धापूर्वीचा काळ. जर्मनीतील ‘त्सोगेनाउराख’ हे शहर. क्रिस्तोफ आणि पॉलिना डेस्लर हे दांपत्य आपल्या ४ आपत्यांसह राहत होतं. क्रिस्तोफ हे एका बूट बनवणाऱ्या कंपनीत कामाला होते, तर पॉलिना या लॉड्री चालवत असत. अडॉल्फ,रुडॉल्फ आणि फ्रिट्झ हे तिघे भाऊ आपल्या आईला तीच्या कामात  मदत करत असत. त्यामुळेच आजूबाजूच्या परिसरात ते ‘लॉड्री बॉईज’ म्हणून देखील ओळखले जात असत.

डावीकडून अडॉल्फ आणि रुडॉल्फ डेस्लर

पहिलं महायुद्ध सुरु झालं आणि जर्मनीच्या कायद्यानुसार तिघा भावांना सैन्यात सामील होण्याचा आदेश मिळाला. तीघेही भाऊ महायुद्धात जर्मनीच्या बाजूने लढले. महायुद्ध संपल्यानंतर ज्यावेळी ते परतले त्यावेळी अडॉल्फ आणि रुडॉल्फ या जोडगोळीने बूट बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. हळूहळू काम चांगलं सुरु झालं. १९२४ साली दोघांनी ‘डेस्लर ब्रदर्स’ नावाची कंपनी सुरु केली. दोघांनाही खेळाचं प्रचंड वेड होतं, त्यामुळे त्यांनी सुरुवातीलाच ठरवून टाकलं होतं की कंपनी फक्त ‘स्पोर्ट्स शूज’चीच निर्मिती करणार.

कंपनी सुरु झाली आणि अल्पावधीतच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळायला लागला. कंपनी नावारूपास यायला लागली. १९३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धा जर्मनीतील जर्मनीतील बर्लिन शहरात भरवण्यात आल्या होत्या. या दोन भावांसाठी व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने ही एक नामी संधी चालून आली होती. तोपर्यंत ‘डेस्लर ब्रदर्स’ ही ‘स्पोर्ट्स शूज’च्या निर्मितीतील एक महत्वाची कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली होती.

जेसी ओवेन्स

स्पर्धा सुरु होण्याच्या अगदी काही दिवसांपूर्वी अडॉल्फ डेस्लर यांनी प्रख्यात अमेरिकन धावपटू ‘जेसी ओवेन्स’ याला आपल्या कंपनीचा ‘ब्रँँड अम्बेसेडर’ म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि याच निर्णयाने कंपनीचं भवितव्यच पालटलं. बर्लिन ऑलिम्पिकमध्ये जेसी ओवेन्सने ४ सुवर्णपदकांची कमाई केली आणि जागतिक क्रीडा क्षेत्रातून डेस्लरच्या ‘स्पोर्ट्स शूज’ला असणारी मागणी प्रचंड प्रमाणात वाढली.

सगळं काही सुरळीत सुरु होतं. पण सगळं काही सुरळीत सुरु असताना बरंच काही अघटीत घडण्याची तयारी सुरु असते, असा मर्फीचा लॉ आहेच की. कदाचित याच नियमानुसार दोन भावांमध्ये छोटेमोठे वाद-विवाद व्हायला लागले. हे वाद विकोपाला गेले दुसरं महायुद्ध संपल्यानंतरच्या काळात. झालं असं की दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला आणि अमेरिकेने हिटलरच्या नाझी पार्टीला मदत केलेल्या लोकांची धरपकड करायला सुरुवात केली. अडॉल्फ आणि रुडॉल्फ या दोघांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं. यावेळी अडॉल्फने कशीबशी परिस्थिती हाताळली आणि निर्दोष सुटले पण रुडॉल्फ मात्र फसले. त्यांना १ वर्ष स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं.

स्थानबद्धतेतून बाहेर आल्यानंतर रुडॉल्फ यांना असं समजलं की कुणीतरी जवळच्या व्यक्तीनेच त्यांच्याविषयीची माहिती अमेरिकन सैन्याला दिली होती. हे समजल्यानंतर त्यांचा पहिला संशय आपल्या भावावर म्हणजे अडॉल्फ यांच्यावर गेला आणि यातुनच त्यांच्यात वाद होऊन शेवटी कंपनीचं विभाजन झालं आणि दोघांनीही आपापला वेगळा संसार थाटला.

अडॉल्फ डेस्लर यांनी १९४८ साली आपली नवी कंपनी स्थापन केली. कंपनीला नांव देताना त्यांनी आपलं टोपणनांव अॅडी आणि आधीची कंपनी ‘डेस्लर ब्रदर्स’ मधलं ‘डास’ या आद्याक्षरांचा उपयोग केला आणि अशा रीतीने ‘अॅडीडास’ (आदिदास) कंपनीचा जन्म झाला. रुडॉल्फ यांनी देखील नवीन कंपनी स्थापून तिचं नामकरण रुडॉल्फमधलं ‘रु’ आणि ‘डेस्लर’ मधलं ‘डा’ वापरून ‘रुडा’ असं केलं. पण काही दिवसानंतर त्यांनी हे नांव बदलून कंपनीला ‘प्युमा’ हे नांव दिलं.

Youtube

दोन वेगवेगळ्या कंपन्या तर स्थापन झाल्या पण भावकीत सुरु झालेलं हे भांडण काही थांबायला तयार नव्हतं. दोन्ही कंपन्यामधलं  भांडण इतकं वाढलं की या दोन्ही कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार देखील त्यात ओढले गेले. दोन्ही कंपन्यांचं मुख्यालय ‘त्सोगेनाउराख’ याच शहरात होतं. त्यामुळे शहरातील बहुतेक लोक दोहोंपैकी एका कंपनीत कामाला होते. पण दोन्ही कंपनीमधील वादामुळे लोकांनी एकमेकांशी बोलणं देखील सोडून दिलं होतं.

समोरच्याला बोलण्यापूर्वी लोकं आधी समोरच्याचा शूज बघत असत. आदिदासवाला माणूस आदिदासवाल्याशीच बोलत असे तर, प्युमावाला माणूस दुसऱ्या प्युमावाल्या माणसाशी. या सगळ्या प्रकारामुळे त्सोगेनाउराख हे ‘झुकलेल्या मानांचं शहर’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं होतं. हीच गोष्ट लग्नाच्या बाबतीत देखील लागू होती.

१९७४ साली रुडॉल्फ यांचं तर १९७८ साली अडॉल्फ याचं निधन झालं, पण दोघांमधील वैर मृत्यूपूर्वी तर सोडाच मृत्यूनंतर देखील संपलं नाही. त्यांच्या मृत्यूनंतर दोघांचेही मृतदेह स्मशानभूमीच्या २ वेगवेगळ्या टोकांना पुरण्यात आलं.

 

 

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here