कोल्हापूरचं तावडे हॉटेल गेलं तरी कुठं..?

कोल्हापुरात प्रवेश करताना प्रवाशांच्या कानी वाहकाचा आवाज हमखास पडायचा,

‘चला तावडे हॉटेल.’

मग या स्टॉपवर काही जण उतरायचे. तावडे हॉटेल या स्टॉपची (थांब्याची) केवळ महाराष्ट्रीय नव्हे, तर विविध राज्यातील प्रवाशांना, वाहक-चालकांनाही ओळख होती. काही वर्षांपूर्वी हे हॉटेल जरी बंद पडले, तरी आजही कोल्हापूरकरांच्या मनात त्याचे अस्तित्व ‘जिवंत’ आहे.

कोठे होते हे हॉटेल, कधी बंद झाले, कोणाच्या मालकीचे होते, ते बंद करण्यामागील कारणे काय होती, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील.

चला तर मग जाणून घेऊ या कोल्हापूरची ओळख असणाऱ्या तावडे हॉटेलचा इतिहास…

या हॉटेलात चहा, भजी आणि बिस्किटाचा पुडा मिळायचा. शंकर कदम उर्फ तावडे आणि त्यांची पत्नी गिरिजाबाई हॉटेल चालवायचे व सहकुटुंब हॉटेलच्या मागेच एका छपरात राहायचे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात म्हणजे १९३९ ते १९४५ मध्ये पोलंडचे निर्वासित वळिवड्याला निर्वासित छावणीत राहायचे. त्यांच्यासाठीच जे साहित्य येईल ते या हॉटेलच्या दारातच उतरवले जायचे व तेथून टांग्याने किंवा बैलगाडीने छावणीत पोचवले जायचे.

शंकर कदम-तावडे यांच्या निधनानंतर हे हॉटेल त्यांची मुले केरबा, पांडुरंग, बाबासाहेब, निवृत्ती आणि मुलगी हौसाबाई, केरबा शंकर कदम यांची पत्नी आनंदीबाई यांनी चालवले. कालांतराने कदम यांचे पूर्ण कुटुंब तावडे हॉटेलपासून जवळ असणाऱ्या लोहार मळ्यात वास्तव्यास गेले. शंकर कदम यांच्या ५ मुलांना एकूण ११ मुले आहेत. त्यांनीही हे हॉटेल चालवण्यात हातभार लावला.

१९९८ मध्ये जेव्हा कोल्हापूरला महापुराचा फटका बसला त्या वेळी निम्मे हॉटेल बुडाले. त्यानंतर शिरोली नाका ते गांधीनगर फाटा रस्ता चौपदरी झाला आणि त्या रस्त्याखालीच २००३ साली तावडे हॉटेलच्या खोपटाचा शेवट झाला. मात्र तावडे हॉटेल अस्तित्वात नसले तरी त्याचे नाव आजही जिवंत आहे.

२००३ मध्ये जेव्हा नव्या चौपदरी रस्त्याचा प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हा ते हॉटेल काढण्यात आले.

या हॉटेलच्या आठवणीने आजही शंकर कदम-तावडे यांच्या स्नुषा आणि केरबा कदम यांच्या पत्नी आनंदीबाई यांचे डोळे पाणावतात. एक वेळ खायला अन्न नव्हते अशा परिस्थिती या हॉटेलने सावरायला खूप मदत केली. केरबा आणि आनंदी यांना ४ मुले. या मुलांच्या जडणघडणीला हॉटेलची खूप मदत झाली. खोपटं असलं तरी आम्ही त्यात आनंदाने दिवस काढले, असं त्या आजही सांगतात.

तावडे हॉटेलचे अस्तित्व जरी पुसले गेले असले, तरी कोल्हापूरकरांच्या मनात ते अजूनही ‘जिवंत’ असेल ! कोल्हापूरचा अर्वाचीन इतिहास तावडे हॉटेलच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण असेल, हे मात्र निश्चित…

 – पूजा कदम-तावडे

हे ही वाच भिडू.