क्रिकेटच्या इतिहासातील अशी टेस्ट मॅच ज्यामध्ये खेळाडूंना रविवारची सुट्टी देण्यात आली…

Twitter

टी-२० क्रिकेट सुरु झालं अन क्रिकेटच्या या फास्ट फूड स्वरूपाशी आपणही तितक्याच फास्ट जुळवून घेतलं.  ज्या काळात  टी-२० च्या मॅचेस  ३ तासांत सुपरफास्ट इंटरटेनमेंट देऊ लागल्या त्या काळात कसोटी क्रिकेटची मैदानं ओस पडायला फरसा वेळ लागणार नव्हताच. झालंही  तसंच. या फास्ट फूड क्रिकेटच्या जमान्यात तुम्हाला कुणी ‘टाइमलेस टेस्ट मॅच’ (काळाचं नी वेळेचं कुठलंही बंधन नसणारी, कुठलातरी एक संघ सामना जिंकेपर्यंत खेळवली जाणारी  मॅच) बघायची ऑफर दिली तर…? आता तुम्ही ही ऑफर स्विकाराल की नाही हे आम्हाला खात्रीशीररीत्या सांगता येत नसलं तरी टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात मात्र अशी एक टेस्ट झालीये जी तब्बल १० दिवस खेळवली गेल्याची आणि क्रिकेट रसिकांनी ती बघितल्याचीही नोंद आहे. होय, तब्बल १०  दिवस. बरं इतके दिवस खेळूनही मॅचचा रिझल्ट काय तर ड्रॉ. कारणही तितकंच अफलातून, काय तर म्हणे पाहुण्या इंग्लंडच्या संघाला त्यांची बोट पकडण्यासाठी लवकरात लवकर मैदान सोडायचं होतं.

Twitter

३ मार्च १९३९. द. आफ्रिकेतील किंग्समेड, डरबनचं मैदान. द. आफ्रिका व्हर्सेस इंग्लंड. ३ मार्चला सुरु झालेली ही टेस्ट संपली ती तब्बल १२ दिवसानंतर म्हणजे १४ मार्चला. आता तुम्ही विचाराल की १२ दिवसांनी संपलेली मॅच आम्ही १० दिवसांची का सांगतोय..? त्यासाठीही कारण आहे, ते असं की या मॅचमध्ये २ दिवस विश्रांतीसाठी राखीव ठेवण्यात आले होते. रविवारची सुट्टी हो. सगळेच घेतात, क्रिकेटर्सनी का घेऊ नये..? ३ मार्चला शुक्रवारी सुरु झालेल्या या मॅचमध्ये ५ मार्च म्हणजे रविवारचा दिवस आणि त्यानंतरचा  पुढचा रविवार म्हणजे १२ मार्चचा दिवस विश्रांतीसाठी राखीव ठेवण्यात आला होता.

पहिल्या इनिंगमध्ये द. आफ्रिकेने ५३० रन्स काढले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ फक्त ३१६ रन्स काढू शकला. नंतर दुसऱ्या इनिंगमध्येहीही आफ्रिकेने ४८१ रन्स ठोकत पहिल्या इनिंगमधील आघाडीच्या आधारे इंग्लंडसमोर जिंकण्यासाठी ६९६ रन्सचं टार्गेट ठेवलं. पहिल्या इनिंगमध्ये फारशी समाधानकारक कामगिरी न करू शकलेल्या इंग्लंडच्या संघाने एडरिचचं द्विशतक आणि गीब तसेच हॅमंडच्या शतकाच्या जोरावर ५ विकेट्स गमावून ६५४ रन्सपर्यंत मजल देखील मारली. आता इंग्लंड सहज मॅच जिंकेल असं वाटत असतानाच, पाऊस सुरु झाल्याने खेळ थांबवण्यात आला. पुढच्या दिवशी खेळून मॅच जिंकणं शक्य असतानाही  इंग्लंडच्या संघाला मायदेशी परतण्यासाठी बोट पकडायची घाई असल्याने दोन्हीही संघांच्या सहमतीने मॅच तिथेच थांबवण्यात आली अन  १० दिवस चाललेली, क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जास्त दिवस खेळवली गेलेली मॅच ड्रॉ अवस्थेत संपली. ही टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील शेवटची ‘टाइमलेस टेस्ट’ देखील ठरली.

 

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here