नेमका तोच क्षण जो रोझेन्थाल या छायाचित्रकाराने टिपला आणि इतिहासात अमर करून टाकला.

हा फोटो आपण पूर्वीच पाहिलाय. प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यदिनाला तो व्हाट्सएप्प आणि फेसबुक वर शेअर होत असतो. किंबहुना सर्वच देशांमध्ये असा तो विशिष्ट दिवशी झेंडे बदलून फिरत असतो, तो फोटो तसाच काळजाला भिडणारा आहे. सहा तरुण एका पर्वताच्या टोकावर आपल्या देशाचा झेंडा रोवत आहेत, ते विजयाचे प्रतीक आहे.

पण हा झेंडा कोणत्या देशाचा आहे? ते सहा तरुण कोण? तो स्टुडिओ मध्ये तरी काढलेला नाही ? जेवढा हा फोटो अप्रतिम आहे तेवढाच त्यामागचा इतिहास रोमांचक आहे,

जेवढा हा फोटो सुंदर आहे तेवढीच रक्ताची किंमत त्यासाठी मोजलेली आहे.युद्धातले काही क्षण अमर होतात पण युद्ध भयानकच असते.

स्टॅलिनग्राड च्या लढाईनंतर युरोपातील युद्धाचे वारे फिरले होते. रशियाने पूर्वेकडून तर नॉर्मंडीत उतरलेल्या दोस्त सेनेने पश्चिमेकडून मुसंडी मारत जर्मनीला जेरीस आणले होते. त्याचवेळी पॅसिफिक मधल्या युद्धात गुडालकॅनाल, ग्वाम, पापुआ न्यू गिनी, फिलिपाइन्स जिंकत अमेरिकन फौजा जपानला मागे सरकवत होत्या. जपानच्या आग्नेयेला १२०० किमीवर एक छोटे बेट आहे त्याचे नाव इवो जिमा (Iwo Jima). पॅसिफिक महासागराच्या पोटात वसलेले हे २१ चौ. किमी क्षेत्रफळ असलेले बेट म्हणजे जमेत न धरण्याइतके क्षुल्लक. साम्राज्यवादी जपानकडे एव्हाना कुठलेच साम्राज्य नव्हते आता जे काही त्यांच्या हाती होतं ते म्हणजे खुद्द जपानची भूमी आणि आजूबाजूची काही छोटी मोठी बेटे. पण जर्मनीइतका सहज जपान पडणार नव्हता कारण जपानच्या सर्व बाजुनी असलेला समुद्र.

http://www.wikiwand.com/en/Raising_the_Flag_on_Iwo_Jima#/Photo_history

इवो जिमा हे बेट जिंकून त्याचा ताबा घ्यायला अमेरिकन सेनेस ५ दिवस लागतील असा अमेरीकन सेनेस विश्वास होता कारण एक माऊंट सुरीबाची (Mt. Suribachi) सोडल्यास संपूर्ण बेट म्हणजे एक खडकाळ कमी उंचीचा प्रदेश होता. प्रत्यक्ष हल्ल्यापूर्वीच २६ दिवस सलग अमेरिकन विमानांनी बॉंबवर्षाव करून बेट भाजून काढले होते. त्यामुळे बेटावर फारसे कुणीच जिवंत राहिले नसावेत आणि कमीत कमी प्रतिकार करून बेट आपल्या ताब्यात येईल असा समज आणि आशा अमेरिकन सैन्याची होती. १९ फेब्रुवारी १९४५ ला जवळपास ३०००० अमेरिकन सैन्य याच अपेक्षेने बेटावर उतरले.

पण वस्तुस्थिती तशी नव्हती. बेटावर एक दोन नव्हे तर तब्बल २२००० जपानी सैन्य आणि त्यांची युद्धसामग्री जशी च्या तशी होती.२६ दिवसाच्या बॉम्बवर्षावाचा त्यांना काहीच फरक पडला नव्हता. कारण ते सैन्य जमिनीवर नव्हतेच मुळी. १८ ते २५ किमी लांबी भरेल एवढ्या बोगद्यांचे जाळे इवो जिमा बेटाच्या खडकातून विणले गेले होते जपानी सैन्य या बोगद्यांमधून सर्व हालचाल करायचे आणि बाहेर येऊन प्रत्यक्ष हल्ला. बेट सहजपणे सोडून द्यायला ते काही ग्वाम, गिनी किंवा सिंगापूर नव्हते, इवो जिमा हि जपानी भूमी होती, ते कुठले सामान्य बेट नव्हते तर खुद्द जपान होते.

 

जनरल तदामीची कुरीबायाशी याला जून १९४४ मध्ये या बेटावर आला त्याने येताच बीच पोस्टचे पारंपरिक युद्ध इथे चालणार नाही हे हेरले आणि जमिनीखालून बोगदे खोदण्याचे काम चालू केले. महायुद्धाचा कल आता स्पष्ट दिसत होता. त्याने सैन्याला स्पष्ट सांगितले होते

“प्रत्येक जपानी सैनिकाने किमान दहा अमेरिकन सैनिकांना कंठस्नान घालावे आणि मगच प्राण सोडावा, म्हणजे आपण शत्रूला जास्तीत जास्त वेळ झुंजवत ठेवू शकु.”

आणि प्रत्यक्ष १९ फेब्रुवारी १९४५ ला इवो जिमा च्या बीच वर उतरलेल्या अमेरिकन सैन्याला पहिला झटका बसला, एका तासात एक हजाराहून जास्त अमेरिकन सैन्य गारद केले गेले. जिथे कोणीच जिवंत नसेल अशा आशेने अमेरिकन सैन्य आले होते तेथे तब्बल २२००० जपानी सैन्य होते. आणि ते बोगद्यांमधून लपलेले असल्याने नजरेच्या टप्प्यात काहीच नव्हते. अमेरिकन सैन्याच्या हालचालींची माहिती गुफांमध्ये लपून बसलेल्या जपानी सैनिकांना असायची, कारण त्यांनी अशा पोझिशन्स घेतलेल्या असायच्या जिथून अमेरिकन सैन्याला न दिसता त्यांच्या हालचाली ते स्पष्टपणे पाहू शकायचे. 

पण इतक्या सहजपणे हार खातील ते अमेरिकन कसले. अमेरिकेन सैन्याने आपला रोख माऊंट सुरीबाची कडे ठेवला होता, कारण सुरीबाची टेकडी इवो जिमा बेटाच्या दक्षिणेला होती आणि तेथून सर्व बेट नजरेच्या टप्प्यात होते. २८ व्या रेजिमेंटच्या हॅरी लिव्हरसिज व त्याच्या इतर सहकार्यांनी बेटाची चिंचोळी पट्टी रात्रीत पार केली व माऊंट सुरीबाची ला इतर बेटापासून अलग पाडले किमान जमिनीवर तरी! सुरीबाची च्या गुफांमधून हल्ले चढवणाऱ्या सैनिकांवर आग फेकणाऱ्या (Flamethrowers) शर्मन टँक्स ने हल्ला चढवला.

लढाईच्या पाचव्या दिवशी म्हणजे २३ फेब्रुवारी १९४५ ला २८ व्या रेजिमेंटने माऊंट सुरीबाची सर केले. मायकल स्ट्रँक, हरलॉन ब्लॉक, फ्रँकलिन सौस्ली, रेने गॅग्नन, इरा हायेस आणि हेरॉल्ड शॅल्झ या सहा तरुणांनी आपल्या विजयाचे प्रतीक म्हणून अमेरिकेचा झेंडा माऊंट सुरिबाचीच्या टोकावर रोवला. तो क्षण बीचवरील अमेरिकन सैन्य, जहाजांवरील सैन्याने आनंदाने टाळ्या, शिट्या वाजवून आणि आपल्या टोप्या हवेत फेकून साजरा केला. तो एक आनंदाचा, अभिमानाचा आणि त्यागाचा क्षण होता.

नेमका तोच झेंडा रोवतानाचा क्षण असोसिएटेड प्रेस च्या जो रोझेन्थाल (Joe Rosenthal) या छायाचित्रकाराने टिपला आणि इतिहासात अमर करून टाकला. याच छायाचित्रासाठी पुढे जो रोझेन्थाल याना पुलित्झर पुरस्कार मिळाला. पुढच्या काही दिवसात जगभरातल्या सर्व महत्वाच्या वृत्तपत्रात तो झळकला.
http://www.wikiwand.com/en/Raising_the_Flag_on_Iwo_Jima#/Photo_history

अमेरिकन जनतेत तर राष्ट्रवादाचे वारे संचारले. दुसऱ्या महायुद्धातल्या अमेरिकेच्या लढ्याचे एक प्रतीक म्हणून त्या फोटोकडे पहिले जाऊ लागले.

माऊंट सुरीबाची जपानसाठी काहीच नव्हते त्यांच्यासाठी फक्त एक सुरीबाची टेकडी पडली होती अखंड इवो जिमा अजून लढणार होते, हा तर युद्धाचा पाचवा दिवस होता, युद्ध इतक्यात संपणार नव्हते. इवो जिमा जिंकायला अमेरिकेला अजून खूप सैन्याच्या रक्ताचा अभिषेक घालायला लागणार होता. कुरीबायाशी च्या नेतृत्वाखालील २२००० जपानी सैन्य अखेरच्या श्वासापर्यंत लढले तेही माऊंट सुरीबाची पडल्यानंतर तब्बल ३३ दिवस. या लढाईत ७ हजार अमेरिकन सैन्य ठार झाले तर १९००० जखमी झाले. तुलनाच करायची म्हटली तर ८ वर्षे चाललेल्या इराक युद्धातही (२००३-११) अमेरिकेने एवढे सैन्य गमावले नाही. इवो जिमा मध्ये लढलेल्या आणि जिवंत परत आलेल्या अमेरिकन सैनिकांच्या मनावर एक इवो जिमा चा ओरखडा उमटलेला आहे. अमेरिकेने जिंकलेल्या आणि एका गाजलेल्या लढाईतले हे हिरो आजही इवो जिमा बद्दल काहीच बोलत नाहीत. आपण जिवंत परत आलो आणि आपले हजारो सहकारी त्या बेटावरून कधीच परत आले नाहीत या गोष्टीची एक अपराधीपणाची भावना त्यांच्या मनात कायम आहे. म्हणूनच रॉबर्ट शेरॉड या लढाईचे वर्णन ‘नरकातले दुःस्वप्न’ (Nightmare in the hell) असे करतो.

http://www.wikiwand.com/en/Raising_the_Flag_on_Iwo_Jima#/Photo_history

माऊंट सुरीबाचीच्या टोकावर झेंडा रोवताना युद्ध संपल्यासारखे वाटत होते पण संपले नव्हते. लाखो अमेरिकन जनतेला आणि सैनिकांना लढायची, जिद्दीनं उभं राहायची प्रेरणा त्या एका क्षणानं दिली. ते छायाचित्र अमर झालं प्रत्येकापर्यंत पोचलं, त्यानं अमेरिकन जनतेच्या अंगावर रोमांच फुलवले. असे फोटो स्टुडिओत काढता येतीलही आणि झेंडा बदलून कॉपी पेस्टही करता येतील पण त्यात राष्ट्र उभं करण्याची ताकद नसते कारण त्यासाठी प्रचंड त्याग आणि बलिदान द्यावे लागते. 

  •  रणजीत यादव

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here