या शेतकऱ्याच्या मुलीने देशाला एका आठवड्यात दोन सुवर्णपदकं मिळवून दिलेत.

भारताची ‘ढिंग एक्सप्रेस’ उर्फ हिमा दास हिने पुन्हा एकदा आपल्या चमकदार कामगिरीने नवा विक्रम केला आहे. पोलंड येथे सुरु असलेल्या स्पर्धेत एकाच आठवड्यात हिमा दासने दोन सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले.

४ जुलैला पोलंड मध्ये २०० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक जिंकल होतं. त्यानंतर रविवारी परत पोलंड मध्येच कुंटो अॅथलेटिक्स मीट स्पर्धेत २०० मीटर धावण्यात आणखी एक सुवर्णपदकाची कमाई केली.

हिमा दासने २०० मीटरचे अंतर २३.९७ सेकंदात पार करत प्रथम क्रमांक पटकावला. त्या खालोखाल भारताचीच धावपटू व्हीके. विस्मया हिने २४.०६ सेकंदात अंतर पूर्ण करत दुसऱ्या क्रमांकासह रौप्य पदक जिंकले. ४ जुलैला पोलंडमध्येच पोजनान अॅऐथलेटिक्स ग्रां प्री मध्ये सुद्धा हिमा पहिल्या क्रमांकावर राहिली होती. यात हिमाने अंतर पूर्ण करायला २३.६५ सेकंद लावले होते. व्हीके. विस्मया या स्पर्धेत २३.९५ सेकंदात अंतर पूर्ण करत तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. वर्ल्ड ज्युनिअर चँम्पियन हिमा दास हिचा वैयक्तिक रेकॉर्ड २३.१० सेंकदाचा आहे, जो तिने गेल्या वर्षी केला होता.

हिमा मुळची आसाम मधील नगांव जिल्ह्यातील ढिंग गावची राहणारी, त्यावरूनच तिला ‘ढिंग एक्सप्रेस’ म्हटल जात. हिमाचे कुटुंब हे १६ सदस्यांचे एकत्र कुटुंब आहे. तिचे वडील भाताची शेती करतात. कुटुंबाची परिस्थिती हलकीचीच. जेमतेम दोन वेळच्या खाण्याची कशीतरी सोय होईल इतकीच काय त्यांची आर्थिक कमाई.

हिमाला लहानपणी फुटबॉल खेळण्याची आवड होती. ती गावातील लहान-मोठ्या फुटबॉल सामन्यांमध्ये खेळून १००-२०० रुपये जिंकायची. फुटबॉल मध्ये फार धावायला लागत असल्यामुळे तिचा स्टॅमिना वाढत गेला आणि पुढे त्याचाच फायदा तिला धावण्याच्या स्पर्धेत झाला. गावात रनिंग ट्रक नसल्यामुळे हिमा शेतात, मातीच्या मैदानावर प्रक्टिस करायची. पण गाव विकसित न झाल्यामुळे गावात सहसा पूरस्थिती निर्माण होते, त्यामुळे शेतात दलदल तयार व्हायची आणि तिला प्रक्टिसला मुकाव लागायचं.

२०१७ मध्ये हिमा एका कॅम्प मध्ये भाग घ्यायला गुवाहाटीला गेली होती. तेव्हा तिच्यावर तिचे सध्याचे कोच निपुन दास ह्यांची नजर पडली. ती ज्याप्रकारे ट्रॅकवर धावत होती ते बघून त्यांनी अचूक हेरलं की, ही फार मोठा पल्ला गाठणार, फार मोठी क्षमता आहे हिच्यात.

त्या कॅम्प नंतर निपुण हिमाच्या आई वडिलांना भेटायला तिच्या गावी गेले आणि हिमाला गुवाहाटीला पाठवून देण्याचे सांगितले. पण घरची हलाखीची परिस्थिती बघता तिचे आई-वडील तिचा गुवाहाटीला राहण्याचा खर्च उचलण्यास अक्षम होते. पण त्यांचीही इच्छा होती की, आपली मुलगी पुढे जावी. त्यावर निपुण यांनी तोडगा काढला. ते म्हणाले,

हिमाचा गुवाहाटीमध्ये राहण्याचा सगळा खर्च मी उचलतो तुम्ही फक्त तिला जाण्याची परवानगी द्या.

हिमाचे आई-वडील लगेच तयार झाले आणि तिला जाण्याची परवानगी दिली. तिथे १०० मीटर धावण्याच्या सराव करायला सुरुवात केली. जसजसा तिचा स्टॅमिना वाढायला लागला तशी ती २०० मग ४०० मीटरचा सराव करायला लागली.

बँकॉक मध्ये झालेल्या युथ एशियन चँम्पियनशिप मध्ये २०० मीटर धावण्यात भाग घेत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. यात ती सातव्या क्रमांकावर राहिली होती. पुढे अठरा वर्षाची झाल्यावर तिने ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भाग घेत ४०० मीटर प्रकारात ती सहाव्या क्रमांकावर राहिलेली.

पण यशस्वी व्हायला तिला जास्त वाट बघावी लागली नाही. कॉमनवेल्थ स्पर्धा झाल्यावर तिने विश्व अंडर-20 अॅएथलेटिक्स चँम्पियनशिप मध्ये भाग घेतला. यात तिने ४०० मीटर अवघ्या ५१.४६ सेंकदात पार करत नवा इतिहास रचला. यासोबतच ही चँम्पियनशिप जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.

ही स्पर्धा जिंकली तेव्हा तिच्याकडे कुठले ब्रँडेड शूज नव्हते. एक काळ असा होता की ब्रडेड सोडा तिच्या कडे साधे शूज सुद्धा नव्हते. पण तिची जिद्द आणि जिंकण्याची इच्छ्शक्ती बघून ही जगातली सर्वोत्तम शूज बनवणाऱ्या अदिदास कंपनीने तिच्या नावाचा शूज बाजारात आणला.

हे ही वाच भिडू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here