मुंबईत चाळीस रुपये घेवून आलेल्या पोराने पाच हजार कोटींचा घोटाळा करुन दाखवला.

२३ एप्रिल १९९२ चा दिवस. त्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीने देशभरात खळबळ माजली होती. ती बातमी काही साधीसुधी नव्हती. तब्बल पाच हजार कोटींच्या घोटाळ्याचा अंदाज बांधण्यात आला होता. घोटाळा झाला होता तो शेअर मार्केटमध्ये. नुकतीच खुले अर्थधोरण स्वीकारण्यात आलं होतं. या बातमीनंतर दोन नाव चर्चेत आली होती. पहिल नाव म्हणजे बातमी देणाऱ्या सुचेता दलाल या पत्रकार आणि दूसरा नाव म्हणजे, हर्षद मेहता.

त्या दिवशी कोणालाच वाटलं नव्हतं की हर्षद मेहता हे नाव भारताच्या इतिहासात कायमच कोरलं जाणारं आहे. शेअर मार्केट नाव उच्चारलं तरी नव्वदिच्या पिढीच तरुण असणाऱ्यांना हर्षद मेहताच आठवतो. 

हर्षद शांतीलाल मेहता गुजरात मधल्या राजकोट मधील एका सामान्य कुटुंबात जन्माला आला होता. त्याचा बालपणातील काही काळ कांदिवलीमध्ये गेला. त्याच्या वडिलांची बदली रायपुरला झाल्यानंतर मात्र तो कुटूंबासोबत छत्तीसगडला गेला. पण तिथून काहीच वर्षात मुंबईतून शिक्षण घ्यायचं म्हणून खिश्यात असणाऱ्या चाळीस रुपयांच्या जोरावर तो मुंबईत B.com करण्यासाठी आला. तसेची हि चाळीस रुपयांची रक्कम काही कमी नव्हती.

कारण तो काळ होता 1970 चा.

हर्षद मेहताने मुंबईच्या लाला लजपतराय कॉलेजमधून बी.कॉम पुर्ण केलं. बी.कॉम झाल्यानंतर तो वेगवेगळ्या नोकऱ्या करत राहिला. आठ वर्ष तो ठिकठिकाणी नोकरी करत होता. याच काळात त्याला शेअर मार्केटमध्ये रस आला. गुजराती कुटूंबाची पार्श्वभूमी असल्याने त्यांच्या ओळखीच्या हिंमत्तीवर तो शेअर मार्केटमध्ये ब्रोकर म्हणून काम करु लागला.

सुरवातीला त्याने स्टॉक ब्रोकर महणून काम केले. १९८४ साली त्यांने भावाला सोबत घेऊन ‘ग्रोथ मोर रिसर्च ‘नावाची कंपनी काढली आणि बॉम्बे स्टॉक एक्सेज मध्ये खरेदी विक्री करू लागला. या काळात काय झालं तर हर्षद मेहताने एक ब्रोकर म्हणून नाव कमावलं. प्रचंड महत्वकांक्षी असणारा हर्षद मेहता कोणतिही रिस्क घ्यायला तयार असायचा. तो कोणतिही नवीन सिस्टिम तात्काळ शिकून घ्यायचा.

त्याच्या जवळची माणसं सांगतात की,

हर्षद मेहताने याच जोरावर नाव कमविल्यानंतर आपला बराचसा वेळ बॅंक आणि बॅंक सिस्टिम समजून घेण्यात घालवला. याच काळात शेअर मार्केटमधल्या सर्व खाचाखोचा माहित असणारा मेहता म्हणून त्याचा उल्लेख केला जावू लागला होता.

बॅंक सिस्टिमधलाच एक प्रकार सरकारी बॉन्डचा. 

सरकारला काही सरकारी कामांसाठी पैसे उभारायचे असल्यास ते बॉन्ड द्वारे उभे केले जातात. सर्व बॅंकांना सरकारी बॉन्ड्समध्ये ठराविक रक्कम गुंतवणे बंधनकारक होते. सरकार बॉन्ड्स घेणार्‍या सर्वांना काही व्याज ही देतं. जेव्हा एखाद्या बॅंकेला पैशांची गरज पडायची तेव्हा त्या बँकेकडे असलेले सरकारी बॉन्ड्स ती बँक दुसर्‍या बॅंकेला विकत असे आणि अल्पावधीसाठी काही व्याजदराने कर्ज घेत असे. पैसे आल्यावर पहिली बँक तो बॉन्ड दुसर्‍या बँकेकडुन परत विकत घेत असे. ह्याला बॅंकिंग च्या भाषेत’ रेडी फॉरवर्ड डील’ असे म्हणले जायचे. अल्पावधीसाठी लागणार्‍या पैश्यांची या प्रकारामुळे लगेचच सोय होत असे.

पण यात एक दोष ही होता तोच दोष हर्षद मेहताने टिपला अणि पाच हजार कोटींचा घोटाळा करुन दाखवलां.

ज्या बॅंकेला बॉन्ड्स विकायचे असायचे तिला ग्राहक म्हणजेच दुसरी बँक शोधण्याचे काम काही ब्रोकर्स करत असत. हर्षद मेहता तसाच एक ब्रोकर होता.

हर्षदला ही सर्व सिस्टीम बरोबर माहित होती. त्याने त्याचा फायदा घ्यायचे ठरवले. त्याचं झालं असं की जेव्हा बॅंकेला बॉन्ड विकायचा असायचा तेव्हा हर्षद मेहता मी तुम्हाला बॉन्ड घेणारी बँक शोधून देतो म्हणुन तो बॉन्ड बँकेकडून घ्यायचा. तो बॅंकेला काही दिवसांचा वेळ ही मागून घ्यायचा. परत हर्षद बॉन्ड विकत घेणार्‍या बॅंकेत जायचा अणि तुम्हाला विक्रेता शोधून आणतो म्हणुन त्यांच्याकडून पैसे घ्यायचा परत त्या बँकेकडे देखील काही दिवसांचा कालावधी मागायचा.

खरंतर आर.बी.आय च्या नियमानुसार कोणत्याही बॅंकेला बॉन्ड्स घेतांना चेक हा ब्रोकरच्या नावे देत येत नव्हता. पण हर्षद मेहता अनेक वर्षांपासून हे काम करत होता. मार्केट मध्ये त्याचे नाव चांगले होते. त्याचे बँक अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते त्यामुळे बॅंका थेट त्याच्या नावाने चेक देत असत. त्यांचा हर्षदवर विश्वास होता. ह्याच विश्वासाचा हर्षदने गैरफायदा घ्यायचा ठरवला.

हर्षद दोन्हीही बँकांकडून वेळ मागून घ्यायचा दरम्यानच्या काळात तो पैसा शेअर बाजारात लावायचा ठरवून मोठ्या प्रमाणात शेअरवरती पैसे लावल्याने शेअर्सची मागणी वाढत असे परिमाणी शेअर्सची किमंत देखील वाढत असे. काही दिवसांनी जेव्हा पहिली बँक पैसे मागत असे तेव्हा तो एका तिसर्‍याच बँकेकडून परत वेळ मागून पैसे घेत असे अणि पाहिल्या बॅंकेला देत असे. कोणी बॉन्ड मागितला तर एखाद्या नवीन बँकेकडून आणून देत असे. पैसे मागितले तर परत नवीन बँक.

असं करुन अनेक बँकांचे पैसे हर्षद फिरवत असे पण काही काळ स्वतः कडे ठेवुनच. त्याने एक स्वतःची साखळीच बनवली होती. यातून सर्व फिरवाफिरवी करून हर्षद कडे बरेच पैसे शिल्लक राहत असत.

त्याला अजून पैसे हवे होते त्याने आपला हा घोटाळा पुढच्या पायरीला घेवून जायची योजना आखली. जेव्हा एखादी बँक बॉन्ड घ्यायची तेव्हा पहिली बँक दुसर्‍या बॅंकेला बॉन्ड देत नसून एक रिसीट द्यायची. ती रिसीट बॉन्ड विकत घेतल्याचे अणि पैसे दिल्याचे प्रमाण असायची.

हर्षद मेहताने अशा बनावटी रिसीट छापल्या. हर्षदने अनेक बॅंकांना या बनावटी रिसीट देऊन त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले अणि शेअर बाजारात लावले. अाणि काही स्टॉकची किंमत चमत्कारिकरित्या वाढविण्यात तो यशस्वी ठरला.

हर्षदने ACC च्या स्टॉक ची किंमत तर दोनशे रुपयांपासून नऊ हजारांवर नेऊन ठेवली होती. अचानक बाजार तेजीत यायचा सर्वजण गुंतवणूक करायचे त्यामूळे शेयर बाजार अजूनच तेजीत यायचा. हर्षद याच्यावर बारीक लक्ष देऊन असायचा बाजाराने सर्वोच्च बिंदू गाठला की हर्षद सर्व स्टॉक विकत असे आणि अनेक पटीने फायदा कमवत असे.

मिळालेल्या पैशातून बँकांचे पैसे परत करून तो आपलीच बनावटी रिसीट परत घेत असे. यामुळे बँकांचा हर्षद वरचा विश्वास कायम राहत असे. याच दरम्यान हर्षदचे रहाणीमान उंचावले होते. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या होत्या. हर्षदचा मुंबईत समुद्र किनारी एक भव्य बंगला होता. इतका मोठा की त्यात एक गोल्फचे मैदान अणि मोठं स्विमिंग पूल ही होतं. हर्षदने त्याच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवले होते. त्याला लोक स्टॉक मार्केटचा अमिताभ बच्चन म्हणायचे. त्या काळात २८ कोटीचा आगाऊ इन्कम टॅक्स त्याने भरला होता.

एका बाजूला हे तर दुसर्‍या बाजूला बँकांकडून पैसे फिरवणे चालूच होते. सन १९९२ मध्ये एकदा हर्षदने खूप मोठ्या प्रमाणात बाजारात पैसा लावला. तेव्हा स्टॉक मार्केटमध्ये खूप मोठी मंदी आल्याने हर्षद मेहताचे मोठे नुकसान झाले. इतके मोठे की बँकांचे पैसे परत करणे अशक्य होऊन बसले. ह्या गोष्टीचा सुगावा पत्रकार सुचेता दलाल यांना लागला त्यांनी हा घोटाळा २३ एप्रिल १९९२ ला उघडकीस आणला.

त्यानंतर बॅंकांना जाग आली अणि हर्षदने आपल्याला दिलेल्या रिसीट खोट्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सर्व बॅंकिंग व्यवस्थेला एकूण चार हजार नऊशे कोटीहून जास्ती रुपयांचा तोटा झाला होता. हा घोटाळा उघडकीस आल्याने शेअर बाजार कोसळला अनेकांना प्रचंड नुकसान झाले.

हर्षद वरती केसेस टाकण्यात आल्या.

अखेर ९ नोव्हेंबर १९९२ ला सीबीआयने हर्षदला अटक केली. त्याच्यावर एकूण ६०० सिविल तर ७० क्रिमिनल केसेस टाकण्यात आल्या होत्या. पुढे अनेक वर्षे ह्या केसेस चालत राहिल्या पण ३१ डिसेंबर २००१ ला हर्षदला छातीत दुखत असल्याने जेल मधुन हॉस्पीटलमध्ये आणण्यात आले अणि तिथेच त्याने जीव सोडला. 

या घोटाळ्या मुळे देशाचे मोठे नुकसान झाले. तत्कालीन सरकारने अशा घटना होऊ नयेत म्हणून SEBI सेक्युरीटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ह्या संस्थेची स्थापना केली. २००६ साली सुचेता दलाल यांना पत्रकारितेसाठी पद्मश्री देण्यात आला.

या घटनेने दलाल स्ट्रिटचा इतिहास बदलून टाकलाच शिवाय तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्यावर देखील काळा शिक्का लावला. हर्षद मेहताचे वकिल राम जेठमलानी यांनी हर्षद मेहताने हे प्रकरण शांत रहावे म्हणून नरसिंह राव यांना एक कोटी रुपये दिल्याचे सांगितले. एक कोटी रुपयांची रक्कम छोट्या सुटकेसमध्ये बसवण्याचा कारनामा मेहताने करुन दाखवला. राम जेठमलानी यांनी तर या घोटाळ्यास हर्षद मेहता घोटाळा नाही तर पी.व्ही.नरसिंह राव घोटाळा म्हणा असे सांगितले पण या प्रकरणात पंतप्रधान म्हणून ते कितपत सहभागी होते हे मात्र गुलदस्त्यातच राहिलं. पण इतका मोठ्ठा घोटाळा सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय करता येणं शक्य नव्हतं हे देखील तितकच खरं.

हे ही वाच भिडू. 

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here