भाजपचे हे दोन “राम” विधानसभेतून गेल्यानंतर शरद पवार म्हणाले, “आम्ही सुटलो”.

राम नाईक आणि राम कापसे. भाजपचे दोन राम. देशाच्या राजकारणाला दिशा देणारा महत्वाचा मुद्दा म्हणजे राम मंदिराचा मुद्दा. भाजपच्या हातात हुकूमाचा एक्का असल्यासारखा हा मुद्दा आहे हे राजकिय विचारवंताना मान्य करायलाच लागतं. असेच दोन राम भाजपकडे होते.

विधानसभेतले हुकूमाचे हे दोन राम तेव्हा सत्ताधाऱ्यांना शब्दांच्या गराड्यात अडकवून सोडायचे. पण एकदा या दोन “रामांमधील” एक राम आपल्याच शब्दजंजाळामध्ये अडकून गेला. रामाच्या मदतीला लक्ष्मण धावून यायचा. इथे रामाच्या मदतीला दूसरे राम धावून गेले त्यांचाच हा किस्सा.

एकदा राम नाईक विधानसभेत भाषण करत होते. वसंतदादा पाटील कॉंग्रेसचे मुख्यमंत्री होते. सरकार विरुद्ध कोणत्या तरी विषयावरून विरोधी पक्षांनी वातावरण तापवलेलं होत. अशा या तापलेल्या वातावरणात राम नाईक सुद्धा तापले आणि त्यांचा स्वतःवरचा तोल सुटला. रागाच्या भरात ते वसंतदादांच्या सरकारला उद्देशून म्हणाले,

“हे तर मूर्खांचे नंदनवन आहे.”

आपण कधी विधिमंडळाचे कामकाज पाहिला असाल तर तुम्हाला लक्षात येईल येथे अगदी हाणामारीचे वेळ येते पण कधी वावगा शब्द कोणी ऐकून घेत नाही. लगेच असंसदीय शब्द म्हणून कारवाई होते.

राम नाईकांनी ही मोठी चूक केली होती. पुण्याचे तेव्हाचे आमदार कै.अमीनुद्दीन पेनवाले यांनी मूर्ख या शब्दाला जोरदार आक्षेप घेतला.  

विधानसभेचे अध्यक्ष आता मोठी शिक्षा करणार शिवाय अख्या राज्यभरात नाचक्की होणार म्हणून राम नाईकांच धाब दणाणलं. दोन्ही बाजूच्या आमदारांनी सभागृह डोक्यावर घेतलं. कोण काय बोलतय काहीच कळेना.

अखेर राम नाईकांची बाजू मांडायला त्यांचे मित्र भाजपाचे जेष्ठ आमदार प्रा. राम कापसे उभे राहिले. राम कापसे हे मराठीचे प्राध्यापक होते. ते म्हणाले,

“राम नाईक  यांनी जणू काही हा उत्प्रेक्षा अलंकार वापरला. इथे ‘सरकार’ उपमेय असून ‘मूर्खांचे नंदनवन उपमान आहे. असंसदीय शब्द नव्हे..  “

हे ऐकून अख्ख्या सभागृहातला गदारोळ थांबला. राम कापसे सर थांबायचं नाव घेत नव्हते. शेवटी विधानसभा अध्यक्ष शरद दिघे म्हणाले,

“कापसे सर तुमचं सगळ म्हणण मान्य. राम नाईकांवर काही कारवाई होणार नाही. फक्त तो व्याकरणाचा तास थांबवा.”

पूर्ण सभागृहात हशांचा कल्लोळ उमटला. पुढे १९८९ साली हे राम कापसे आणि राम नाईक दोघेही लोकसभेवर निवडून गेले आणि तेव्हा शरद पवार म्हणाले,

“दोन्ही राम तिथे गेले आम्ही सुटलो”

हे ही वाचा भिडू.