गणपतीची शेकडो गाणी लिहीणारा उत्तम कांबळे उपाशीपोटी मेला तरी आपल्याला कळालं नाही.

काही महिन्यांपुर्वी एका भिडूंचा फोन आला.

‘लोकशाहीर उत्तम कांबळे वारले. बातमी करता येते का बघा.’

आधी तर लोकशाहीर उत्तम कांबळे कोण होते हेच ठाऊक नव्हत. त्यांची माहिती घेतल्यावर ‘कळाल बघ बघ सखे कसं गुबू गुबू वाजतय, टिम टिम टिंबाली, गौरी गणपतीच्या सणा’ सारखी शेकडो लोकप्रिय गाणी लिहिणारे ते मोठे कवी गीतकार होते. मोठा माणूस होता पण खूप हलाखीच्या परिस्थितीमध्ये गेला. स्वतःचीच लाज वाटली.

आम्ही पूर्ण स्टोरी कव्हर करायसाठी गेलो.

पुण्याच्या भवानी पेठेत काशेवाडी म्हणून एक झोपडपट्टी आहे तिथे त्यांच घर होत. पत्ता शोधून घर सापडायला दिवस उतरणीला लागला होता. पाच बाय पाच फुटाच एका खोलीच घर. त्याची भिंत पडलेली. एका हलत्या शिडीवरून चढून जाव लागलं. आत बघितलं तर सगळ भकास होत. एक मोठा कलावंत अशा ठिकाणी बसून आपली कविता करत असेल हे कळल्यावर अंगावर शहारा आला.

त्यांच्या घरमालकांनी सांगितलं,

“गेले काही दिवस ते आजारीच होते. बराच काळ उपासमारीची वेळ आली होती. बायको घरकाम करून संसार ओढायचा प्रयत्न करत होती.  मध्यंतरी कुठल्यातरी गणपती मंडळाने त्यांना मदत केली, पण अखेर दुर्लक्षित आयुष्याला ठिगळ जोडण्याव्यतिरिक्त काही झालं नाही.”

तेवढ्यात कळाल की पुणे स्टेशनजवळच्या आंबेडकर पुतळ्यापाशी त्यांच्या निधनाची शोकसभा सुरु आहे, बरेच कलाकार आले आहेत. आम्ही तिकडे गेलो.

आंबेडकर पुतळ्याच्या आवारात ही सभा चालू होती. ओळखीचे चेहरे नव्हते पण चौकशी केल्यावर कळत गेलं की एकापेक्षा एक दिग्गज कलाकार आहेत. दरवर्षी गणपतीमध्ये वगैरे ज्या गाण्यांवर आपण नाचत असतो अशा झिंग चढवणाऱ्या गाण्याचे कोणी कवी, संगीतकार असे कोण कोण. प्रत्येकजण पोटतीडकीने बोलत होता. आपल्या उत्तमदादांच्या बद्दलच्या आठवणी सांगत होता. कोणाचे ते गुरु होते, कोणाला त्यांनी मदत केली होती, कोणासाठी फुकट गाण लिहून दिल होतं, वगैरे वगैरे.

सगळ्यात शेवटी ठरलं की लोकशाहीर उत्तमदादांच्या आठवणीसाठी एक जंगी कार्यक्रम आयोजित करायचा. सगळ्यांनी आपआपली कला तिथे सादर करायची. सगळे खुश झाले, कोण म्हटल मी उत्तमदादांच हे गाण म्हणतो, कोण आपली वाद्य घेऊन येतो म्हणाला.

मग विषय आला वर्गणीचा.

कोणीतरी पुढाकार घेऊन हिशोब केला. शे-पाचशे वर्गणी काढायचं ठरलं. एवढा वेळ हिरीरीने चर्चा करणारयातले लघवीला जाण्याच निमित्त करून तिथून सटकू लागले. त्यांना उत्तम दादांच्याबद्दल आस्था नव्हती असं नाही, पण प्रत्येकाची परिस्थिती फाटकी होती. खिशात वीस रुपयाची नोट घेऊन आलेला उत्तम दादांसारखी गाणी लिहिण्याची स्वप्ने बघणारा तरुण गीतकार इच्छा असूनही वर्गणी देऊ शकत नव्हता. आपली गरिबी लपवत अंधारात गुडूप होणे त्याने जास्त पसंत केलेलं होतं.

दरवर्षी गणपतीमध्ये शांताबाई टाईप एखादे गाणे येते, तुफान गाजते, त्यातल्या कलाकाराला तेवढ्यापुरते पैसे मिळतात, त्यांच्या मुलाखती वगैरे होतात. आणि काही दिवसांनी सगळ शांत होतं. परत पुढच्या सिझन मध्ये नवीन गाण, नवीन कलाकार. दारिद्र्य उपासमार चुकलेली नाही. 

आज असे अनेक लोककलाकार महाराष्ट्रात आहेत. जग रॅप, के-पॉप, आर अँड बी असं काय काय करत पुढ चाललंय. भारतातही जमाना या गाण्यांचा आहे. तरी या लोककलाकारांनी हट्टाने ही गाणी जपून ठेवली आहेत.

कलेनं पोट भरत नाही. मराठवाडा, विदर्भ अशा कानाकोपऱ्यातून मुंबई पुण्याला आलेले, झोपडपट्टीत राहून कुठतरी सायकल दुरुस्ती, हमाली करणारे हे कलाकार तेवढ्या यशासाठी, कोणाच्या तरी शाबासकीच्या थापेसाठी राबत असतात. कोणीतरी एखादाच आनंद शिंदे निघतो आणि आपली ठराविक चौकट मोडून आपलं नाव मोठ्या पातळीवर पोहचवतो.

या कलाकारांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. दारिद्र्य पाचवीला पुजलेल आहे, शिवाय व्यसनाधीनता आणि शिक्षणाचा अभाव यांनी प्रॉब्लेम्समध्ये भरच घातली आहे. याच्या जोडीला जातीपातीच दबलेपण आहेच.

लोकगीतकार उत्तम कांबळे.

लोकगीतकार उत्तम कांबळे यांचे परवा निधन झाले. "टिंब..टिंब..टिंबाली, माझ्या गणान घुंगरू हरवलं, गौरी गणपतीच्या सणाला", अशी सुपरहिट गाणी त्यांनी लिहिली.

Posted by बोल भिडू on Thursday, 17 January 2019

यांची गाणी एका सिझन मध्ये जेव्हडी गाजतात त्याच्या दहा टक्के जरी गाजली तरी मेनस्ट्रीममधले कलाकाराची चर्चा वर्षभर होते. अवाॅर्ड आणि रिवाॅर्डची त्याच्यावर बरसात होते. याबद्दल शासन, म्युजिक इंडस्ट्री, तिथले मोठमोठे लोक जबाबदार आहेतच पण याच्याबरोबर आपण रसिक प्रेक्षक देखील तितकेच जबाबदार आहोत.

आजकाल ढोलताशा वाजवतानाचे फोटो सोशल मिडियावर शेअर करणे याला संस्कृतीची जपवणूक असं समजल जात. कोणी कितीही नाक मुरडल तरी “हाताला धरलंया, नवीन पोपट हा” सारखी तळागाळातील गाणी देखील आपल्या मराठी संस्कृतीचा भाग आहेत. ज्याच्यावर नाचायला सगळ्यांना आवडत पण व्हाईट कॉलरची सवय झाल्यामुळे मान्य करावस वाटत नाही.

गणेश विसर्जन जवळ आलंय. आपल्याला नाचण्यासाठी नवीन कुठल तरी गाण आलं असणारचं आहे. नाचण्याबद्दल हरकत नाही पण कधी तर त्या कॅसेट,सीडीवर लिहिलेल्या कलाकारांची नावेदेखील वाचा. त्या गाण्याचा बिभित्स अवतार करणाऱ्या डीजेला क्रेडीट देण्यापेक्षा गाण बनवणाऱ्या ओरिजिनल कलाकाराला त्याच ड्यू क्रेडीट द्या.

असं जर झालं तर कोणीतरी लोकशाहीर उत्तम कांबळे कुठल्यातरी सरकारी हॉस्पिटलच्या बेडवर औषधा अभावी मरण्याची वेळ येणार नाही.

हे ही वाच भिडू.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here