पाकिस्तानमधील हिंगलाज भवानी कोल्हापूरच्या गडहिंग्लजला कशी आली..?

पाकिस्तानमध्ये एक देवीच मंदिर आहे जिथं हिंदू आणि मुसलमान दोघेही नतमस्तक होतात. ऐकून आश्चर्य वाटलं ना ?

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील हिंगोल नदीच्या तीरावर मकरान टेकड्यांमधील एका गुहेत “हिंगलाज देवी “चे मंदिर आहे. हे मंदिर  ५१ शक्तीपीठापैकी एक मानले जाते. पाकिस्तानी हिंदू आणि मुस्लीम या तीर्थस्थळाच्या दर्शनाला जातात. मुस्लीम भाविक या देवीला नानी बीबी या नावाने ओळखतात.

पाकिस्तानात हिंदू-मुस्लीम ऐक्याच प्रतिक म्हणून या मंदिराला ओळखले जाते. हिंगलाज देवीच्या मंदिराला पाकिस्तानी सरकारने संरक्षण दिलेले आहे. इथे दर्शन घेण्यासाठी आधी परवानगी काढावी लागते.

हिंगलाज देवी मंदिर, बलुचिस्तान

या देवस्थानच्या उत्पत्तीची कहाणी पुराणातसुद्धा सांगितली आहे. दक्ष राजाने एक मोठे यज्ञ आरंभले होते. पण या यज्ञाला आपल्या जावयाला म्हणजेच भगवान शंकर महादेवाला आमंत्रण दिले नव्हते. नवऱ्याचा हा अपमान सहन न झाल्याने सती ने याच यज्ञात स्वतःची आहुती दिली. चिडलेल्या शंकराने तिचे अर्धवट जळलेले शरीर आपल्या पाठीवर टाकले आणि उद्विग्न अवस्थेत तो इतरत्र भटकू लागला.

त्याच्या फिरण्याने देवीच्या शरीराचे एक एक तुकडे पृथ्वीवर पडत गेले. या प्रत्येक ठिकाणी एक एक शक्तीपीठ वसले आहे. सतीचं शीर बलुचिस्तानमध्ये पडले आणि आज तिथे हिंगलाज भवानी देवीच मंदिर आहे.

दरवर्षी एप्रिल महिन्यात या देवीची यात्रा असते. कराचीमधून यात्रेकरू हिंगलाजदेवीच्या यात्रेला पायी निघतात. अख्ख्या पाकिस्तानातून आणि भारतातूनही भाविक यांना सामील होतात. मुस्लीम यात्रेकरू या देवीच्या यात्रेला ‘नाणी की हज’ असे म्हणतात.

१५० किमी अशी ही यात्रा असते. यात्रेच्या वेळी पंचवीस तीस हजार भाविक गडावर हजर असतात.  हिंगलाज देवी हि भारतातल्या भवसार, बरोट,सोमवंशी क्षत्रिय समाजाची कुलदेवता समजली जाते. या देवीचे अनेक भक्त गुजरात राजस्थान पंजाब या सीमावर्ती भागात आढळतात.

 या देवीचा कोल्हापूरच्या गडहिंग्लजशी काय संबंध?

गडहिंग्लजजवळ भडगाव येथे या देवीच मंदिर आहे. एका निसर्गरम्य टेकडीवर असलेल्या या मंदिरात हिंगुळाई देवी किंवा गुड्डाई देवी म्हणून तिला ओळखलं जात. आता ही देवी पाकिस्तानातून इकडे कशी आली याची सुद्धा एक कथा सांगितली जाते.

इराण, बलुचिस्तान, अफगाणिस्तानमध्ये हिंग पिकते. ती हिंग विकायला बलुची व्यापारी तिकडून भारतात यायचे. या हिंग व्यापाऱ्यांनी ते जिथे जिथे जातील तिथे त्यांनी  हिंगलाज देवीची मंदिर स्थापन केली. राजस्थानमधील हिंगलाजगढ असेल किंवा कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यात देखील हिंगलाज देवीची मंदिरे आहेत.

महामुंबईमधील चौल बौध विहारमध्ये सुद्धा हिंगुळा देवीच मंदिर आहे. याच देवीच्या नावावरून गडहिंग्लजला सध्याचं नाव मिळालं.

हे हि वाच भिडू

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here