कोल्हापूरचा दूध कट्टा म्हणजे काय रं भावा !!!

तुम्ही कोल्हापुरतं रातच्या नऊ साडेनऊ च्या दरम्यान कुठंतर निघालाय, आणि कानावर, “चला या इकडं….!!” असा खणखणीत आवाज कानावर पडला तर न बावचळता समजून जायचं, तुम्ही कुठल्या तर दूध कट्ट्याजवळण निघालाय!

तर हे दूध कट्टा म्हणजे काय?

कोल्हापूर मधी शेतीच उत्पन्नाचं मूळ साधन, त्याजोडीला २/४ जनावरं दारात दावणीला असत्यताच. घरात पुरलं एवढं दूध सोडलं तर मग राहिलेल्या दुधाचं करायचं काय? हे डेअरी आणि सहकार आत्ता नंतर नंतर आलाय, मग अजून एक पर्याय म्हंजी रतीब- बरं रतीब (रोज गिर्हाईकाच्या दारात जाऊन दूध घालायचं) तर मग म्हशी व्याल्याव त्या रतिबास्नी दूध कुठलं मग हाय ती रतीब तुटणार आणि मग परत पाहिलं पाढं पाच. म्हणून म्हशीवाल्यानी एक सुपीक कल्पना हुडकून काढली.शहरातल्या गजबजीच्या ठिकाणी संध्याकाळी म्हशी घ्यून जायचं आणि गिर्हाईकासमोर म्हशी पिळून ताज दूध इकायचं. दूध पिणार्याला बी खात्री आपल्या समोर म्हशी पिळून दूध देणार म्हंजी बनावट काय नाहीच.

मुळात कोल्हापूर फेमस कुस्ती साठी, आणि कुस्ती म्हणलं कि खान-पिन त्या तब्येतीत. थंडाई म्हणू नका, भंग म्हणू नका, ली आगळं येगळं परकार. मग हे पैलवान गडी संध्याकाळी व्यायाम करून इथं दूध कट्ट्यावर येणार आणि मग पैज लावून लिटर लिटर दूध एक एक गडी गट्टम करणार. समोर पिळलेलं गरम गरम दूध म्हणजे नाद खुळाच. आणि ते पितान असं मिशी ला फिल्टर होऊन गेलं पाहिजे आणि मग डाव्या हातानं मिशी वर ताव मारत पेला रिक्काम करायचा. अगदी शाहू महाराज पण त्याकाळी जाताना कट्ट्यावर एक ग्लास दूध पिल्याशिवाय जात न्हवतत अशी जुनी माणसं सांगत्यात.

ह्या कट्ट्याची ठिकाण ठरलेली हैत. गंगावेशीत अर्बन बँकेच्या दारात, मिरजकर तिकटी ला, महानगर पालिकेजवळ, पापाची तिकटी ला. संध्याकाळी ९-९.३० वाजलं कि म्हशी या ठिकाणाकडं येताना दिसणार आणि तेंच्या मागणं तेंच मालक डोक्यावर नैतर सायकल वर भुश्याच पोतं आणि ४ कीटल्या आणि तांब्याच-पितळच ग्लास घेयून. शिवाजी पेठेतलं तात्या शिपेकर, गवळ गल्लीतलं रामभाऊ नागराळे, झालाच तर
गंगायीशीत माळकर हि बैत्याची माणसं कट्ट्यावरची. प्रत्येकाची गिर्ह्यायिक ठरलेली. अगदी हि माणसं येऊस्तोवर वाट बघत बसणार.

अंबाबाईला आलेली माणसं असू देत नैतर रात्री जेऊन झल्यावर फिरायला बाहेर पडलेली माणसं असू देत, एकवेळ आईस्क्रीम ख्याल इसरतील पार दूध म्हणजे जीव कि प्राण.

आजतारखेला डेअरी आणि बाकी सोयी असताना पण हा दूधकट्टा आपलं अस्तित्व टिकवून आहे.

  • शंतनू पवार