लोकं गाढविणीचं दुध विकून लखपती व्हायला लागलेत, कसं ते वाचा.

गाढव या प्राण्याकडे आपण मुर्ख, बेअक्कल, घाणेरडा, उकिरड्यावर लोळणारा प्राणी म्हणूनच बघतो. कारण आपून लोक गाढव या प्राण्याला फारसा काही भाव देत नाहीत. फक्त काम करून घेण्यासाठीच त्याचा सोयीस्कर वापर करतो. माती उचलणं असेल, पाणी वाहून नेणं असेल किंवा दगड पोहचवण्यासाठीच त्याला जुंपलं जातं.

तसंही या बिचाऱ्या मुक्या प्राण्याला आम्ही लोकांनी फार प्रसिद्धी दिलीय. तु गाढव आहेस का रे? काय गाढवासारखं वागतो राव? त्याला अक्कल नाहीये गाढव आहे त्यो, काय गाढवासारखं काम करता, नुस्ता दिवसभर गाढवासारखा लोळत असतोस, अशी स्तुतीसुमनं उधळत आम्ही या प्राण्याचा रोजच उदोउदो करत असतो.

मात्र, भिडूनो गाढवीण हा प्राणी लाखमोलाचा आहे. कारण या गाढवणींच्या दुधापासून तयार केलेली आयुर्वैदिक औषध विकून दिल्लीतली पुजा कौल आज लखपती झालीय.

सोप्प्य़ात सांगायचं तर गाढवाला सुद्धा अच्छे दिन आलेत भिडू

तर झालं असं,

पुजा कौल आणि तीचा मित्र ऋषभ तोमर तुळजापूरच्या टाटा इंस्टीट्युटमध्ये सोशल सायन्सचा अभ्यास करत होते. तेव्हा तिथं शिकत असताना डेअरी क्षेत्रामध्ये नवीन काहीतरी करण्याचा प्रोजेक्ट त्यांना मिळाला. या प्रोजेक्टसाठी पुजा आणि तीचा मित्र ऋषभ अभ्यास करायला लागले. त्यांनी माहिती गोळा करायला सुरूवात केली.

तेव्हा त्यांना समजलं की गाढविणीच्या दुधामध्ये व्हिटॅमिन बी, बी-12 यांची मात्रा; तसेच उष्मांक जास्त आहेत. मातेच्या दुधापेक्षा गाढविणीच्या दुधामध्ये ६० पटींनी जास्त व्हिटॅमिन सी आहे. संसर्गजन्य, जंतुजन्य रोगांपासून या दुधामुळे संरक्षण मिळते.

त्याचवेळी दमा, सर्दी, खोकला, कावीळ आदी रोगांवरही हे गाढवीणीचं दूध रामबाण औषध असल्याचे सिद्ध झाले आहे.

तसंच सध्या गाढवणीचं दुध 2000 ते 3000 हजार रूपये लिटरनी विकलं जातंं. यावर व्यवसाय उभा राहू शकतो, अशी कल्पना त्यांना सुचली. कल्पना सुचली पण नेमकं काय करायचं हे त्याच्या डोक्यात नव्हत. तेव्हा त्याच्या मनात विचार आला.

गाढवणीचं दुध हे शरीरावर लावण्यासाठी उत्तम आहे. त्या दुधाची साबणच केली तर. म्हणून त्यांनी गाढवणींच्या दुधापासून आयुर्वेदीक असा साबण तयार करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी सोलापूरमधील गाढवीण असणाऱ्या एका व्यवसायिकांशी संपर्क केला. त्यांच्याशी भागीदारी करून सुरूवातीला या दुधापासून 200 साबणी तयार केल्या. त्या साबणीला चांगला प्रतिसाद मिळाला.

त्यामुळे 2018 मध्ये पुजा आणि ऋषभ दोघांनी ऑर्गेनिको नावाचा साबणाचा स्टार्टअप सुरू केला. पुजा सांगते,

गाढवणीच्या दुधापासून साबण बनवणं वाटतं तेवढं सोप्पं नाहीये. कारण गाढवणीचं दुध सकाळी 4 ते 6 च्या दरम्यानच काढावं लागतं. कारण जास्त वेळ हे दुध राहत नाही. त्यामुळे 10 तासाच्या आतच या दुधापासून साबण तयार करावी लागते. आम्ही सध्या दोन प्रकारच्या साबण बनवत आहोत, या दोेन्ही साबणांना उत्तम असा प्रतिसाद मिळत असून एक साबण 499 रूपयांना विकला जात आहे.

हा साबण शरीरासाठी उत्तम असुन तुमची त्वचा रंग उठून दिसते. या साबणाचा कोणताच साईड इम्फेक्ट होत नाही. तुम्ही जर लगातर दोन तीन आठवडे हा साबण वापरला तर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये झालेला फऱक जाणवेल. आम्हाला आत्तापर्यंत सगळ्या ग्राहकांकडून चांगलेच रिव्ह्यू आलेले आहेत.

इजिप्तमधील क्लिओपात्रा राणी ही जगातील सर्वांत सुंदर राणी म्हणून गणली जाते. ही राणी गाढविणीच्या दुधाने आंघोळ करीत होती आणि त्यासाठी ७०० गाढवांचे पालन पोषण इजिप्तमध्ये केले जात होते.

आपल्या सुंदरतेचे गुपित हे गाढविणीचे दूध असल्याचेही राणीने म्हटल्याचे इतिहासात नोंद आहे

सध्या पुजानं गाजीयाबाद, डासना आणि महाराष्ट्रामधून गाढवणींची खरेदी केलेली आहे. तीच्यासोबत या व्यवसायात अजून सहा लोक जोडले गेले आहेत.

साबणासोबतच भविष्यात सौदर्यांचे अजूनही उत्पादनं तयार करण्याचा त्याच्या प्रयत्न सुरू आहे. मात्र आज या गाढवणींच्या दुधापासून बनवलेल्या साबणांनी पुजाला लखपती केलेलं आहे. तसंच तिच्यासोबत काम करणाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

तर भिडूनो गाढविणीचं दुध हे लाखमोलाचं आहे. गाढविणीच्या दुधापासून तयार केलेल्या एक किलो पनीरसाठी ८० हजार रुपये इतकी किंमत आकारली जाते. त्यामुळे गाढव प्राण्याला अजिबात हलक्यात घेऊ नका.

हे ही वाच भिडू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here