शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग हेलियमच्या शोधाचा देखील साक्षीदार आहे.

हेलियमच्या शोधाची जन्मभूमी म्हणजे विजयदुर्ग.

साल होतं १८६८ आणि भूमी होती कोकणाची. आजही कोकणाबाहेरच्या माणसांना कोकण दुर्गम भागच वाटतो. त्यामुळे साधारणतः दिडशे वर्षांपुर्वी कोकणची भूमी कशी असेल हे सांगण्यासाठी कोणत्याही तज्ञाची गरज नाही.

तर १८६८ मधल्या १८ ऑगस्टची गोष्ट.

याच तारखेला ज्या विजयदुर्गाने शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहीला, तो विजयदूर्ग अजून एका इतिहासाचा साक्षीदार ठरला. या दुर्गावरुनच हेलियम वायुचा शोध लावण्यात आला. हेलियम या नव्या मुलद्रव्यांची नोंद करण्यात आली.

जागतिक हेलियम दिवस साजरा करताना विजयदुर्गचे नागरिक

विजयदुर्गावर असणारी साहेबांचा ओट ही जागा आजही त्या जागतिक शोधाची साक्षीदार आहे. म्हणूनच विजयदुर्गचे नागरिक आजचा दिवस ‘जागतिक हेलियम दिवस’ म्हणून साजरा करतात.

नेमका विजयदुर्गच का

१८ ऑगस्ट १८६८ रोजी होणाऱ्या सुर्यग्रहणाचा मध्यबिंदू अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागराकडे जाणाऱ्या पट्यावर येणार होता. शिवाय सुर्याची जवळून छाया टिपण्यासाठी अरबी समुद्राजवळ अणारा विजयदुर्गचा पट्टा हा सर्वात जवळचा असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तविला होता.

खग्रास सुर्यग्रहण असल्याने शास्त्रज्ञांसाठी विजयदुर्गची संधी ही सुर्वणसंधीच होती. मात्र शास्त्रज्ञांसमोर एकच मोठी समस्या होती. शास्त्रज्ञांसमोरची ही समस्या म्हणजे दुर्गम अशा कोकणातील विजयदुर्ग येथे जायचं तरी कसं ? काहीही असो पण ही सुवर्णसंधी हातची जाऊ द्यायची नाही हे शास्त्रज्ञांनी मनाशी पक्कं केलं होतं. त्यामुळे मजल दरमजल करत शास्रज्ञांचा एक गट विजयदूर्ग येथे पोहचला.

शास्त्रज्ञ विजयदुर्गावर पोहोचल्याचा उल्लेख ब्रिटीश अंमलदारांच्या तत्कालीन नोंदीत बघायला मिळतो. मात्र शास्त्रज्ञ तिथे नेमके कसे पोहोचले, ते समुद्रामार्गे आले की जमिनीवरील मार्गे आले याबाबतीत मात्र अनेक मतमतांतरे आहेत. मात्र मोठ्या कष्टाने शास्रज्ञ तिथे पोहचले या बाबीवर मात्र अनेकांचं एकमत आहेच.

अखेर सुर्यग्रहणाचा दिवस उजाडला.

१८ ऑगस्टचा तो दिवस. पहाट झाली होती. सर्वत्र सुर्यकिरणे डोकावत होती. पहाट झाल्यानंतर काही तासातच पुन्हा सुर्य झाकोळला गेला.

सुर्य बुडाला म्हणून लोकांची तारांबळ सुरु झाली. सुटे गिऱ्हाणचा आवाज येवू लागला. लोकांनी देव पाण्यात ठेवले. अनेकांनी डुबक्या मारण्यास सुरवात केली.

याच दरम्यानच्या सात मिनटांच्या काळात विजयदुर्गाच्या ‘साहेबांच्या ओट’वर बसुन शास्त्रज्ञांनी आपल्या दुर्बिणी सुर्याच्या दिशेने दुर्बीण रोखल्या. सुर्यग्रहणाचा वेध घेण्यासाठी दुर्बीणीवर स्पेक्ट्रामीटर बसवण्यात आले होते.

डावीकडून पियरे ज्युल्स जेन्सन आणि सर नॉर्मन लॉकियर

स्पेक्ट्रामीटरच्या नोंदी घेत होते ब्रिटनचे शास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर.

सुर्यकिरणांच्या वर्णपटलांमध्ये त्यांना तीन रेष्या दिसल्या. यातील दोन रेषा सोडीयमच्या होत्या मात्र तिसरी रेष नेमकी कोणत्या वायुची, हे मात्र कळायला मार्ग नव्हता. साहजिकच या वायूच्या शोधासाठी अभ्यास सुरू झाला.

मोठ्या अभ्यासानंतर आणि संशोधनानंतर या वायुची नोंद हेलियम अशी करण्यात आली.

नॉर्मन लॉकियर यांनी फ्रेंच अॅकॅडमीत आपला रिपोर्ट सादर केला. अवघ्या काही वेळातच पियरे ज्युल्स जेन्सन यांनी देखील असाच रिपोर्ट सादर केला. त्यांनी देखील हेलियमच्या शोधाचा अभ्यास केला होता. मात्र तो आंध्रप्रदेशातील गुंटूर येथे राहून. दुर्देवाने या दोघांच्याही  रिपोर्टची त्यावेळी फारशी दखल घेतली गेली नाही .

त्यानंतर १८९५ साली विल्यम रामसे, पेर क्लीव्ह आणि अब्राहम लँँगलेट यांनी हेलियम वेगळा करण्याची पद्धत शोधून काढली. या संशोधनानंतर मात्र हेलियमच्या शोधावर शिक्कामोर्तब झालं. नार्मल लॉकियर आणि जेन्सन या दोघांनाही एकाच वेळी हेलियमच्या शोधाचे जनक म्हणून पेटंट देण्यात आलं.