मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या शासकिय पुजेचा मान कधीपासून मिळू लागला.. ?

आषाढी एकादशीला पूजा करण्याचा या प्रथा परंपरेची पाळेमुळे शोधायला गेल्यानंतर काही लोकं छत्रपती शिवरायांपासुनचे दाखले दिले जातात. मात्र पंढरपुरचा समावेश आदिलशाहीत येत असल्याने त्याबद्दल इतिहासकारचे दुमत आहे. नंतरच्या काळात पेशवाई आल्यानंतर थोरले बाजीराव पेशवे यांनी विठ्ठलाची देवस्थान समिती नियुक्त केली. या समितीमार्फत पूजा केली जात असे. त्याचबरोबर १८४० च्या दरम्यान विठ्ठलपुजेचा मान सातारा गादीकडे असल्याचे संदर्भ देखील मिळतात. 

पण खरे दाखले मिळतात ते ब्रिटीश व्यवस्थेपासून. ब्रिटीश काळात मामलेदार, कलेक्टर, प्रांत, असे सेवाजेष्ठतेनुसार विठ्ठलाची पूजा होत असल्याचे संदर्भ आहेत. ब्रिटीशांच्या काळात वार्षिक दोन हजार रुपयांचे अनुदान विठ्ठल मंदिराला मिळत असे. 

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महसुलमंत्री म्हणून राजारामबापूंनी विठ्ठलपूजा केली. त्यानंतर विठ्ठलाची पूजा मंत्र्यांच्या हस्ते करण्याची प्रथा चालू झाली. 

पण सन १९७० साली समाजवादी लोकांनी, धर्मनिरपेक्ष राज्यात सरकारने पूजाअर्चा करणे योग्य नाही म्हणून आंदोलन केलं. त्यावर उपाय म्हणून १९७१ साली मंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली नाही. योगायोग म्हणजे यानंतरच्या पुढच्याच वर्षी राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागला. 

१९७२ साली मुख्यमंत्री असणाऱ्या वसंतराव नाईक यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ गेले. विठ्ठलाची पूजा बंद झाली त्यामुळेच दुष्काळ पडला. पुन्हा पूजा चालू करावी म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली. 

मुख्यमंत्र्यांची वारी !!

१९७३ साली महाराष्ट्र शासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शासनाच्या ताब्यात घेतले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी १९७३ साली विशेष असा कायदा पास करत, मंदिराचा कारभार हा कायद्यानुसार सुरू झाला . 

त्यानंतर खऱ्या अर्थाने १९७३ मध्ये विठ्ठलाची शासकिय पूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांकडे आला. आषाढी एकादशीला शासकिय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची पूजा करण्यात आली. 

वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना विठ्ठलपूजेसाठी आले. त्यांनी पूजा केली. वारकऱ्यांनी गरिब भाविक यात्रेकरुन द्यावा लागणारा कर माफ करण्याची विनंती दादांना केली. दादांनी तात्काळ निर्णय घेत पंढरपुर बरोबरच देहू आणि आळंधीचा यात्रा कर देखील रद्द केला. 

शरद पवार देवधर्माच अवडंबर करत नाहीत. मात्र त्यांनी देखील कधीच शासकिय पूजा चुकवली नाही. त्यांच्याच पुलोद काळापासून राज्याला मुख्यमंत्री पदाबरोबर उपमुख्यमंत्री पद देखील मिळाले.

पण उपमुख्यमंत्र्यांनी पूजा करण्याचा मान दिला गेला तो युती शासनाच्या काळात. 

बॅरिस्टर ए.आर. अंतुलेच्या रुपात राज्यास मुस्लीम मुख्यमंत्री लाभला. पण मुस्लीम समाजातील व्यक्तीने विठ्ठलपूजा कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला ?

तेव्हा अंतुलेंच्या ऐवजी महसुलमंत्री रजनी पाटील यांनी शासकिय पूजा केली. 

राज्यात युतीचं शासन आल. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्याकाळातच आषाढी पूजा मुख्यमंत्र्यांनी आणि कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांनी करण्याची प्रथा सुरू झाली. त्यांच्याच काळात मुंबईत रमाबाई आंबेडकर नगरमध्ये गोळीबार झाला. दलित संघटनांनी मुख्यमंत्र्यांनी आषाढी पूजा करण्यासाठी विरोध केला.

त्यामुळे १९९६ सालची पूजा मुख्यमंत्र्यांना करता आली नाही. 

आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री असताना डाऊ कंपनीचा विषय ऐरणीवर आला. मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांकडून आंदोलन सुरू झालं.  ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी कोणत्याही परस्थितीत आर.आर. आबांना कार्तिकी एकादशीची पूजा करुन देणार नसल्याचं सांगितलं. आर.आर. आबांना पुजेसाठी जाता आलं नाही. त्या ऐवजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पुजा केली. 

नंतरचा किस्सा अजित दादांचा.

अजित दादांना देखील पूजा करता आली नाही. किंवा पूजा करण्याचा मान मिळण्याअगोदरच अजितदादांची यातून सुटका झाली अस म्हणता येईल. पाणीच नाही तर धरणात काय मुतायच का ? या त्यांच्या विधानामुळे त्यांना कार्तिकी एकादशीची पूजा करुन न देण्याचा इशारा वारकरी संघटनांनी दिला होता.

हे ही वाच भिडू.