हे ख्रिश्चन देशासाठी लढले होते, फक्त ते ख्रिश्चन म्हणून नाही तर भारतीय म्हणून लढले होते.

“देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात ख्रिश्चन समुदायाचा सहभाग नव्हता. ख्रिश्चन समुदाय भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलाच नव्हता” अशा आशयाचं वादग्रस्त विधान भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केल्यानंतर एकंच गदारोळ माजला. भाजपकडून आपल्या खासदाराच्या या वक्तव्यावर त्यांना फटकारण्यात देखील आलं.

परंतु गोपाळ शेट्टी मात्र आपल्या विधानावर ठाम होते. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी खासदारकीचा राजीनामा देण्याची देखील तयारी देखील त्यांनी दाखवली होती.

या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेट्टी यांना फोन करून समज दिल्यानंतर मात्र त्यांचा सूर बदलतोय अशी माहिती सध्या समोर येतेय. या पार्श्वभूमीवर देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ख्रिश्चन समुदायाचं नेमकं काय योगदान होतं, याचा आम्ही शोध घेतला. या उत्खननातून जी माहिती समोर आली ती वाचकांशी शेअर करतोय.

वाचकांसाठी आणि गोपाळ शेट्टी यांच्यासाठी देखील ती संदर्भ म्हणून उपयोगी पडू शकते.

सर अॅलन ह्यूम.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापाकांमधील एक महत्वाचं नांव म्हणजे सर अॅलन ह्यूम. ते ब्रिटीश सरकारमध्ये अधिकारी असले तरी भारतातील ब्रिटीश साम्राज्याच्या जुलमी धोरणांविरुद्ध त्यांनी कायमच आवाज उठवला. ब्रिटीश सरकारप्रती त्यांनी घेतलेल्या चिकित्सक भूमिकांमुळे त्यांना आपली नोकरी गमवावी लागली.

अॅनि बेझंट.

इंग्लडमध्ये जन्मलेल्या अॅनि बेझंट यांचं भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचं योगदान होतं. एमिली आणि विल्यम पेजवूड या इंग्लिश दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या अॅनि बेझंट या ‘थीऑसोफीकल सोसायटी’च्या प्रसारासाठी १८९३ साली भारतात आल्या. आज आपण ज्याला ‘बनारस हिंदू विद्यापीठ’ म्हणून ओळखतो त्याची मुहूर्तमेढ अॅनि बेझंट यांनीच १९९८ साली रोवली होती. १८९८ साली अॅनि बेझंट यांनी ‘सेन्ट्रल हिंदू कॉलेज’ची स्थापना केली होती. हेच कॉलेज आज बनारस हिंदू विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं.

अॅनि बेझंट

भारतीय स्वातंत्र्यासाठी लोकमान्य टिळकांसोबत होमरूल चळवळीच्या उभारण्यात त्यांचं महत्वाचं योगदान होतं. १९१५ सालच्या काँग्रेस त्यांनी होमरूल चळवळ उभारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. होमरूल लीगचं काम प्रामुख्याने लोकमान्य टिळक आणि अॅनि बेझंट याच बघत असत. होमरूल चळवळीत त्यांनी कारावास देखील भोगला. भारतीय स्वातंत्र्यासाठी जनजागृती करण्यासाठी त्यांनी ‘कॉमनविल’ या साप्ताहिकाची आणि ‘न्यू इंडिया’ या दैनिकाची सुरुवात केली. १९१७ सालच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले होते.  त्यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचा श्वास देखील भारतातील आपली कर्मभूमी अड्यार येथे घेतला.

चार्ल्स फ्रीर अर्थात दीनबंधू अॅड्र्यूज.

चार्ल्स फ्रीर अॅड्र्यूज हे धार्मिक नेते आणि समाजसुधारक होते. ते स्वतःला महात्मा गांधींचे अनुयायी म्हणून घेत असत. इंग्लंडमध्ये जन्मलेले चार्ल्स ज्यावेळी भारतात आले त्यावेळी त्यांनी गोरगरीबांसाठी आणि वंचितांसाठी काम करायला सुरुवात केली. त्यांची गोरगरीब भारतीय लोकांप्रतीची तळमळ बघूनच त्यांना ‘दीनबंधू’ अर्थात गोरगरिबांचा कैवारी ही उपाधी देण्यात आली होती . भारतातील ब्रिटीश सत्येच्या अन्यायी कारवायांविरुद्ध देखील त्यांनी आवाज उठविला. ‘जालियानवाला बाग’ प्रकरणाला क्रूर हत्याकांड म्हणून संबोधणाऱ्या सुरुवातीच्या लोकांपैकी ते होते. जनरल डायरच्या या कृत्याचा त्यांनी कडाडून विरोध केला. रवींद्रनाथ टागोर, गांधीजी, डॉ. आंबेडकर या सर्वांशीच त्यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यावेळच्या अनेक महत्वाच्या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी भारतीय स्वातंत्र्याचा पुरस्कार केला.

मॅडेलीन स्लेड उर्फ मीराबेन.

मॅडेलीन स्लेड उर्फ मीराबेन

ब्रिटीश एडमिरल सर एडमंड स्लेड यांची मुलगी असलेल्या मॅडेलीन स्लेड यांनी रोमेन रोलेंड लिखित गांधीजींचं चरित्र वाचलं आणि ते वाचून त्या गांधीजींच्या प्रभावाखाली आल्या. इंग्लंडमधील आपलं ऐशोआरामीतलं जीवन त्यागून त्या अहमदाबादेतील गांधीजींच्या आश्रमात येऊन अतिशय साध आयुष्य जागल्या. गांधीजींनीच त्यांना ‘मीराबेन’ हे नांव दिलं. गांधीजींच्या सामाजिक आणि राजकीय सुधारणांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. ‘द स्टेट्समन’ ‘यंग इंडिया’ आणि ‘हरिजन’ मधून भारतीय स्वातंत्र्याच्या समर्थनात त्यांनी अनेक लेख लिहिले. देश-विदेशातील अनेक कार्यक्रमामध्ये आणि परिषदांमध्ये त्या गांधीजीबरोबरच असत. ‘भारत छोडो’ आंदोलनातील त्यांच्या सहभागामुळे ब्रिटीश सरकारने त्यांना अटक देखील केली होती. देशाच्या एकूण जडणघडणीत असणारे मीराबेन यांचे योगदान लक्षात घेऊन इसवी सन १९८२ साली भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं.

सॅम्यूअल इव्हान्स स्टोक्स उर्फ सत्यानंद स्टोक्स. 

सॅम्यूअल इव्हान्स स्टोक्स हे एका प्रतिथयश अमेरिकन उद्योजक घराण्यातील होते. १९०४ साली ते वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते शिमल्याला आले होते. शिमल्यात लेप्रसी रोगाशी लढणाऱ्या लोकांचे हाल बघून त्यांची सेवा करण्यासाठी तिथेच वास्तव्याचा त्यांनी निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या कुटुंबियांच्या पचनी पडणं शक्यच नव्हतं. त्यामुळे आपल्या कुटुंबियांशी त्यांचा दुरावा निर्माण झाला.

सॅम्यूअल इव्हान्स स्टोक्स उर्फ सत्यानंद स्टोक्स

जालियानवाला बाग हत्याकांडाविषयी ज्यावेळी त्यांना समजलं त्यावेळी ही घटना ऐकून ते हेलावून गेले. भारतीयांना ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असं वाटून त्यांनी काँग्रेसमध्ये काम करायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात ते गांधीजींच्या संपर्कात आले. त्यांच्या कामाने गांधीजी देखील प्रभावित झाले. गांधीजींनी पंजाब प्रांताची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला. १९३२ साली त्यांनी हिंदू धर्माचा स्विकार करून स्वतःचं नांव सत्यानंद असं बदललं. त्यांनी भारतीय मुलीशी लग्न देखील केलं. त्यांना ‘अँग्लो इंडियन’ म्हंटलेलं आवडत नसे, ते स्वतःला भारतीयच मानत असत.

 

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here