चायनिज लोकांनी काली मातेचं मंदिर बांधलय !

हिंदू , मुस्लीम, शीख, ईसाई हम सब बेटे भाई भाई चा नारा आपली एकात्मता दाखवत असतोय. आत्ता हि स्टोरी वाचली कि त्यात चायनिज लोकांना पण अॅड करायला लागणार आहे. 

त्याच कारण अस कि कलकत्त्यामध्ये एक मंदिर सापडल आहे. त्या मंदिराच नाव चायनिज काली माता !

आत्ता सापडलं म्हणजे ते गेली साठ वर्ष तिथच आहे पण भारत चीन संबधाचा वरवरचा अभ्यास करताना आमच्या भिडू कार्यकर्त्यांना हे मंदिर सापडलं. 

नेमका काय प्रकार आहे ? 

तर झालं काय. कोलकत्तामध्ये पुर्वीपासून चायनिज लोकांची वस्ती आहे. कोलकत्यापासून जवळच असणाऱ्या टोंगरा किंवा टोग्रा भागात हि वस्ती आहे. याठिकाणी पुष्कळ लोकं चायनिज आहेत. तर झालं अस की साठ वर्षांपुर्वी इथल्या एका झाडाखाली दगड होते. लोकांच्या मते ती काली माता होती. पण मंदिर, मुर्ती असा काही प्रकार साठ वर्षांपुर्वी नव्हता. 

एके दिवशी काय झालं, या एक चायनिज मुलगा आजारी पडला. त्याला या दगडांजवळ आणण्यात आलं. त्यानंतर हा मुलगा टकाटक झाला. देवाची अधिकृत मान्यता चमत्कारांवर ठरते. चमत्कार झाला आणि देवीच्या देवीपणावर स्टॅम्प लागला. झालं काली माता म्हणून मंदिर बांधण्यात आलं. तेही चायना टाऊन सारख्या भागात. 

मंदिराला नाव दिलं गेल चायनिज काली माता ! 

आत्ता चायनिज लोकांची काली माता म्हणजे चायनिझ काली माता. चायनाच्या बहुतांश लोकांचा धर्म हा बौद्ध पण झालं अस की चायनीझ काली मातीची महती ऐकून अनेक लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला. थेटपणे नाही पण सण, उत्सव साजरे करण्यास सुरवात केली. आपल्या चायनिज प्रथा, परंपरा आणि हिंदू प्रथा परंपरा यांच मिश्रण झालं आणि तयार झाला एक अनोखा प्रकार. 

प्रसादासाठी हक्का नुडल्स ! 

दोन्हीकडच मिश्रण होवून नव्या प्रथा आल्या. जस की, अगरबत्त्या आहेत पण त्या लाल रंगाच्याच. शिवाय देवीसाठी मेणबत्यांची सोय देखील आहे. प्रसाद म्हणून मोमो, नुडल्स आणि सुपची सोय केलेली आहे. पुजारी 

जॉन चिंग (John Cheng) सांगतात मी पुर्वी बौद्ध धर्माच पालन करत होतो मात्र जेव्हापासून मी मंदिराचा पुजारी म्हणून कामकाज करु लागलो तेव्हापासून मी हिंदू धर्माच्या रुढी परंपराच पालन करतो. आम्ही नवरात्रमध्ये मंदिरात मोठ्ठा उत्सव साजरा करतो. त्याचबरोबर दिवाळीच्या दिवसांमध्ये मंदिराची रोषणाई देखील पाहण्यासाठी असते.