जात नाही ती ‘जात’, पण एक ट्विस्ट आहे यात.

चवदार तळ्याचा सत्याग्रह. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या सत्यागृह घडवून आणत एक इतिहास रचला होता. त्याच्या अगोदर महात्मा जोतिबा फुल्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद दलित समाजास खुला करुन देखील इतिहास रचला होता. समाजाच्या मुर्ख कल्पनांना कवटाळून एक समुदायाचा हक्क मारणाऱ्यांच्या विरोधात नेहमीच इतिहास रचण्याच काम होत आलय.

पण हे झालं इतिहासाचं. आज किती सुखवस्तू टाईप चालू आहे. आजूबाजूला अशा बुरसटलेल्या प्रथा, परंपरा कुठेच दिसत नाहीत. चंद्रावर जाणारा माणूस अशा अस्पृश्यतेच्या गोष्टी करुच शकत नाही. या गैरसमजूतीत तुम्ही असाल तर एकतर तुमचं जग छोट आहे किंवा तूम्हाला डोळे उघडून जगाकडे पहाण्याची गरज वाटत नाही. अजूनही अस्पृश्यता आणि अत्याचार चालूच आहेत. दलित समाजातील व्यक्तींच्या हातून काही घेण्याचं सोडा तर त्यांची शिवाशीव देखील चुकीची आहे म्हणणारा समाज देखील आहे…

पण अशा गोष्टींच्या विरोधात आवाज उठवणारी चांगली माणसं इतिहासात देखील होवून गेली आहेत आणि वर्तमानात देखील आहेत हि एकमेव चांगली गोष्ट.

तर मुळ मुद्दा कोणता. 

राजस्थान मधल्या धोलपूर जिल्ह्याच्या कलेक्टर निहा गिरी या नेहमीप्रमाणे मनरेगाच्या कामांची पाहणी करण्यासाठी दौरा आखतात. त्यांचा हा दौरा बासंती पंचायतच्या विभागात येवून थांबतो. बासंती पंचायत मार्फत राबवण्यात येणाऱ्या एका मनरेगाच्या कामांच्या ठिकाणी त्या भेट देतात.

त्या ठिकाणी त्यांना दिसतं की, एक साधी महिला आपल्या तान्हा मुलीला घेवून दगड फोडण्याच काम करतेय. उन्हातान्हात कष्ट करतेय. तर दूसऱ्या बाजूला धडदांडगा माणूस कामगारांना पाणी वाटण्याचं काम करतोय. तुलनेनं कमी श्रम असणार पाणी वाटण्याचं काम या महिलेला देण्याची गरज होती तर दगड फोडण्याचं काम त्या माणसाला देण्याची गरज होती. पण समोर असणारं हे उलटं चित्र पाहून कलेक्टर नेहा गिरी यांनी चौकशी केली.

गावातल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी विचारलं तेव्हा धक्कादायक माहिती त्यांना मिळाली, त्यांना सांगितलं गेलं की ती महिला वाल्मिकी समाजातून आहे. त्या समाजाला अस्पृश्य समजलं जात असल्यामुळे त्यांच्या हातातून कोणी पाणी पीत नाही. म्हणून तीला दगड फोडण्याचं काम देण्यात आलं आहे.

पदाधिकाऱ्यांच असलं उत्तर ऐकताच कलेक्टर मॅडमचा पारा चढला, त्यांनी सर्व कामगारांना एकत्र करून जातीप्रथा, अस्पृश्यता यांवर ग्रामस्थांना फैलावर घेतलं. पुढे काय केलं तर त्या महिलेला पाणी वाटण्यास सांगितलं आणि सर्वात पहिला त्यांनी स्वत: ते पाणी प्यायलं, त्यानंतर तिथ असणाऱ्या सर्व कामगारांना महिलेच्या हातून पाणी पिण्यास सांगितलं. सर्व कामगारांनी पाणी पिलं आणि विषय संपला.

विषय संपला असं वाटतं असेल तर पुन्हा आपण चुकतोय, तिथले शासकिय कर्मचारी सांगतात इथे मध्यान्ह भोजन, मनरेगा, अंगणवाडी कार्यक्रम अशा ठिकाणी कोणत्याही दलित व्यक्तींना नेमणूक दिली जात नाही. त्यांच्या हातून काही खाणं चुकिचं मानण्यात आल्यानं लोक शिवाशीव टाळतात. अस्पृश्यता हि नेहमीची गोष्ट झाली आहे.

पण या गोष्टीला कलेक्टर निहा गिरी यांच्यामुळे वाचा फुटली. समाजमाध्यमांना खरी जातीव्यवस्थेची प्रथा किती खोलवर रुजली आहे ते तरी लक्षात आलं. चांगली गोष्ट एकच अशा गोष्टींविरोधात आवाज उठवणारी माणसं प्रत्येकवेळी समोर येतील आणि विरोध करतीलच पण गप्पा मारणारे आपण मनापासून अशा बुरसटरेल्या गोष्टी सोडून दिल्या आहेत का हे आपल्यालाच विचारण्याची वेळ आली आहे.

हे ही वाचा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here