खऱ्या आयुष्यातील मेजर कुलदिप सिंह चांदपुरी गेले..

जे.पी.दत्तांचा बॉर्डर. घरात बसून पाहिलेलं एकमेव भारत पाकिस्तानचं युद्ध. मेजर कुलदिपसिंह आणि त्यांच्या तुकडीने रात का खानां जयपूर आणि सुबह का खानां दिल्लीमैं अशी स्वप्न पाहिलेल्या पाकिस्तानच्या सैन्याला एका रात्रीत अस्मान दाखवलं होतं.

यात मेजर कुलदिप सिंग अर्थात सनी देओलचा एक डॉयलॉग होता. तो म्हणतो,

“मरने की बात दुबारा मत करना.. क्युंकी इतिहास गवाह है जंग मरके नही जिती जाती.”

हे युद्ध खरं होतं. १९७१ सालचं. सनी देओलच पात्रही खरं होतं. मेजर कुलदिपसिंग चांदपुरी अस त्यांच नाव. हे सगळं सांगण्याच कारण म्हणजे सिनेमात असणारा डॉयलॉग जगणारे खऱ्या आयुष्यातील मेजर कुलदिप सिंग चांदपुरी यांच निधन झालं.

४ डिसेंबर १९७१ च्या संध्याकाळ..

३००० पाकिस्तानी जवान आणि ६५ रणगाड्यांची एक अख्खी बटालियन जेसलमेर जिल्ह्यातल्या लोगेंवाला इथून बोर्डर पार करून भारतीय हद्दीत घुसली. त्यांच्याजवळ माहिती होती की तेथील भारतीय सैन्याच्या ठाण्यात सैनिकांची कुमक कमी आहे. भारतीय वायुदलाकडे रात्री हल्ला करता येणारी विमाने नाहीत, त्यामुळे तिथून घुसून रात्रीचे जेवण जयपूर आणि सकाळचा नाश्ता दिल्लीमध्ये असा प्लॅन त्यांनी बनवला होता.

मेजर कुलदीप सिंग चांदपुरी आणि त्यांचे शूर १२० साथीदार यांच्यावर हे ठाणे रोखण्याची जबाबदारी होती. अपुऱ्या सैन्यबळामुळे खरेतर मेजर कुलदीपसिंग यांना माघार घेऊन आपल्या सैनिकांचा जीव वाचवण्याचा पर्याय हेडक्वार्टर वरून देण्यात आला होता पण तरी त्यांनी तिथे उभे राहून लढा देण्याचे ठरवले. ते पाकिस्तानी रणगाड्यांची वाटच बघत होते.

फक्त १२० जवान आणि एक रणगाडा विरोधी तैनात केलेली तोफ असलेली जीप यांच्या आधारे पाक रणगाड्यांची संपुर्ण बटालियन सकाळ पर्यंत रोखून धरली.

भारतीय सैन्याने पेरलेल्या सुरुंगामुळे पाक रणगाड्यांची पळता भुई थोडी झाली. उंच टेकडीवरून उतारावर असलेल्या पाक जवानांना टिपणे भारतीय सैन्याला सहज शक्य झाले. सूर्योदयाच्या पहिल्या किरणाबरोबर तर भारतीय हवाई दलाच्या हंटर विमानांनी तर पाक रणगाड्याना स्मशान बनवले. कुलदीपसिंग चांदपुरी यांनी जवानाचे वाढवलेल मनोबल आणि रणगाड्यांच्यासाठी आखलेल्या चक्रव्युव्हामुळे हा भीमपराक्रम शक्य झाला. या कामगिरीबद्दल त्यांना महावीरचक्र प्रदान करुन गौरवण्यात आलं होतं.

पाकिस्तान मध्ये असलेल्या मांटगोमेरी या गावात त्यांचा जन्म झाला होता. फाळणीनंतर त्याचं कुटुंब भारतात आलं. फाळणीच दुख: स्वतः अनुभवलं असल्यामूळ कुलदीपसिंग यांनी भारतीय सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. १९६५ च्या युद्धातही त्यांनी भाग घेतला होता. मात्र लोगोंवाल यांनी केलेला पराक्रम अतुलनीय असा होता. पुढे ते ब्रिगेडियर या पदावरून निवृत्त झाले.

लोंगेवाला लढाईमधला हा पराक्रम प्रत्येक भारतीयाने बॉर्डर सिनेमातून पाहिला. सनी देओलनं देखील मेजर कुलदीपसिंग यांच्या भूमिकेला न्याय दिला होता. युद्धाची थरारकता, बॉर्डरवर गेलेल्या आपल्या तरूण मुलांच्या जीवाच्या चिंतेने घरच्यांची होणारी घालमेल या सगळ्याच चित्रीकरण बोर्डर मध्ये होत. सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ यांनी जबरदस्त अॅक्टींग, संदेसे आते यांसारख्या अनेक गोष्टी सिनेमात होत्या.

पण एक गोष्ट सिनेमात चुकिची दाखवण्यात आली होती. सिनेमात खूपसे जवान शहिद झाल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र आपल्या १२० साथीदारांपैकी फक्त २ जवान शहिद झाले होते. त्याच कारण होतं ते मेजर कुलदिप सिंह.

हे ही वाचा –