बिली बावडनची ही स्टाईल नाही तर त्यामागे एक आजार आहे.

क्रिकेट पाहणाऱ्या एखाद्याला बिली बावडन हा अंपायर माहित नाही असे होणारच नाही. एखाद वेळेस मॅच मध्ये काय झाले  हे लक्षात राहणार नाही पण बिली बावडनने केलेले मनोरंजनात्मक अंपायरिंग कोणीच विसरत नाही. मैदानावर आचरट प्रकारे हात पाय हालवून तो सर्वाना हसवत असतो. त्याचे असे अनेक विडिओ यू ट्यूब वर आहेत लोक मजा म्हणुन ते बघत असतात.

बिलीचे अनेक किस्से आहेत. त्याने एकदा एल. बी. डब्लू आउट देण्यास बराच वेळ घेतला पुढे जाऊन तो काहीतरी बघत होता, त्यानंतर परत माघारी आपल्या जागेवर येऊन त्याने आउट दिला. ग्लेन मॅकग्राने जेव्हा जाणीवपूर्वक डेड बोल टाकला तेव्हा बिलीने त्याला फारच नाट्यमय पणे रेड कार्ड दाखवले मैदानात खूपच हशा पिकला. बिलीला बॉल तर अनेकदा लागलाय बॉलपण त्याचाच पाठलाग करत असतो. बिलीला बॉल स्वतःच्या दिशेने येताना दिसला तर तो गमतीशीर पणे तो चुकवतो आणि जर बसलाच तर त्याच्या चेहऱ्यावरील भाव कॅमेरा टीपतोच,  इतके मिश्र आणि विनोदी भाव असतात त्याचे.

तो त्याचे काम एन्जॉय करतो असे दिसते. बिलीने त्याच्या  चित्र विचित्र हालचालीमुळे जगभरात स्वतःची एक विनोदी प्रतिमा बनवली आहे. जिचा त्याला बराच फायदा होतो.

बिली चा जन्म हा न्यूझीलंडचा. लहानपणापासूनच त्याला खेळाचा नाद होता. वयाच्या विशीतच तो न्यूझीलंडच्या टीम मधून खेळू लागला. तो एक चांगला फास्ट बॉलर होता.पण पुढे त्याला  एक आजार झाला अणि त्याला उमेदीच्या वर्षांतच क्रिकेटला रामराम ठोकावा लागला. पुढे तो अंपायर झाला पण इथे ही तो आजार त्याच्या आड येऊ पाहत होता ह्या वेळेस मात्र त्याने त्याच्या या दुखण्यावर तोडगा काढला.

किस्सा असा आहे की बिली बावडनला झालेला तो आजार म्हणजे rheumatoid arthritis म्हणजेच संधिवात. बिलीला संधिवाताने ग्रासले अणि त्याला स्नायूंच्या हालचाली करणे अवघड जाऊ लागले. त्यामुळे त्याला इतक्या तरुण वयात क्रिकेट सोडावे लागले.

पुढे बिली अंपायर झाला अणि तिथे सुद्धा त्याला संधिवाताचा त्रास होऊ लागला. त्याला पटकन हात वरती करता येत नाहीत, एकाच ठिकाणी स्तब्ध उभे राहिले की त्याला परत हालचाल करणे कठीण जाते. अंग दुखू नये म्हणून त्याला थोड्या थोड्यावेळाने स्ट्रेचिंग करण्याचे डॉक्टरांचे निर्देश आहेत. आता बिली परत त्याचे काम सोडू शकत नव्हता. यावेळेस त्याने लढायचे ठरवले आणि त्याने त्याच्या अंपायरिंग मध्ये कराव्या लागणाऱ्या हालचालींमध्ये काही कल्पक बदल केले.

आणि यातूनच बिली बावडनची एक वेगळीच  “अंपायरिंग स्टाईल” क्रिकेट विश्वात उदयास आली. जी अंम्पायर म्हणून तर प्रभावी होतीच पण त्यात एक मनोरंजन  मूल्य ही होते.

बिलीने स्वतःच्या अडचणीवर कल्पकता वापरून मात करायच ठरवल. बिलीची हाताची बोटं लगेच सरळ होत नाहीत म्हणून कोणालाही आउट देतांना त्याचे बोट वाकडंच असतं. सिक्स मारल्यानंतर त्याचे हात पटकन वर होत नाहीत म्हणून तो एका विशिष्ट पद्धतीने हळू हळू हात वर करतो, ह्या वेळेस ही त्याची बोटं आकड्यांसारखी वाकलेलीच  असतात. त्याला  डॉक्टरांनी जे स्ट्रेचिंग करायला सांगितले आहे ते ही तो खेळ चालू असतानाच करतो. जेव्हा फलंदाज चौकार मारतो तेव्हा बिली साईड स्ट्रेचिंग करून घेतो. तो दोन तीन वेळा हात हलवून उजव्या बाजूला झुकतो यात त्याचे स्ट्रेचिंग ही होते आणि  अंपायरिंग पण, आहे का नाय बिली हुशार?

जेव्हा एखादा फलंदाज बायच्या  रन्स  मिळवतो तेव्हा बिली गुडघा वर करून लोवर बॉडीचे ही स्ट्रेचिंग करून घेतो. प्रेक्षकांना ती गम्मत वाटते पण बिलीच्या आजारावरचा त्याने काढलेला तो उपाय आहे. डॉक्टरांनी वेळोवेळी हालचाल करायला सांगितले आहे म्हणून सतत तर नाही पण जेव्हा केव्हा मैदानात एखांदा खेळाडू त्याला संधी देतो तेव्हा तेव्हा बिली जास्तीच्या हालचाली करून अंग मोकळं करून घेतो.

लोक हसतात तो ही ती प्रोसेस एन्जॉय करतो.

हे ही वाच भिडू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here