हा “बिडीवाला देव” आपल्याच महाराष्ट्रात आहे.

लहानपणापासून सांगितल जातं की ३३ कोटी देव आहेत. पण ३३ वर्षांचा झालो पाच पन्नास देवच मला पाठ झाले असतील. बाकीचे देव कोणते आणि ते कुठं असतात? त्यांची मंदिर कुठं आहेत असले प्रश्न नेहमी पडतात. असा प्रश्न पडला कि एखादा नवीन देव सापडतो आणि ३३ कोटी देवामधून माहिती असणारा देव म्हणून मी तो वजा करतो.

आत्ता झालं अस की असाच एक नवा देव मला दिसला,

या देवाच नाव बिडीवाला देव..!

बिडीवाला देव म्हणजे कोणता महाराज, कुणाचा अवतार वगैरे नाही तर प्रॉपर देव. हा आदिवासी समाजातला देव. आदिवासी भागात आतमध्ये या देवाची किती मंदिर आहेत, ती कुठेकुठे आहेत ते सांगता येण अशक्य आहे पण एका हायवेवर या देवाची मुर्ती आहे. या मुर्तीमुळेच आदिवासी समाजातला हा देव आपल्या ओळखीचा झाला.

अकोला जिल्ह्यात अकोट नावाचा तालुका आहे आणि अमरावती तालुक्यातलं हरिसाल नावाच गाव फेमस आहे. म्हणजे ते यापुर्वी फेमस नव्हतं पण भाजप आणि राज ठाकरे अशा दोघांनी मिळून हरिसाल गावाला फेमस केलं. तर या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर हा बिडीवाला देवाच वास्तव्य आहे.

या मार्गावर खटकाली ते हाय पॉइन्टकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक झाडं दिसतं. झाडाखाली शेंदूर फासलेली माणसाचा आकार दिलेली एक मुर्ती दिसते. पहिल्या नजरेत मुर्ती बघताना म्हसोबा, बिरोबा सारखी वाटते पण याच एक वेगळेपण दिसतं. ते वेगळेपण म्हणजे मुर्तीच्या तोंडात चक्क सिगरेट दिलेली असते. बरं सिगरेटवरच भागत नाही तर मुर्तीच्या पायात गुटखा, खर्रा असा नैवेद्य देखील असतो. RMD पासूनची वेगवेगळी पाकीटे पडलेली असतात. पण शोभून दिसण्यासारखी गोष्ट म्हणजे मुर्तीच्या तोंडात असणारी “सिगरेट”.

या देवाच नाव बिडीवाला देव अस सांगितलं जातं. मेळघाट परिसरातील असणारी कोरकू हे आदिवासी बांधव बिडीवाल्या देवाला पूजतात. बिडीवाल्या देवाचा मुळ इतिहास काय? त्यांची अजून किती मंदिरे आहेत. मुर्तीच्या तोंडात बिडी देण्यास कधीपासून सुरवात झाली हे सगळे प्रश्न बाहेरच्या जगासाठी अजूनही अनभिज्ञच आहेत.

कोरकू समाजातील बांधवच या देवाबद्दल अधिक माहिती सांगू शकतील. बोलभिडूने देखील अनेकांसोबत संपर्क केला पण आम्हाला देखील संपुर्ण माहिती मिळू शकली नाही.

जी माहिती मिळते ती अशी की हि मुर्ती राजदेव बाबांची. अर्थात आदिवासींचा देवराज. म्हणजे एक प्रकारचा निसर्गदेवच. या मुर्तीचे पाय वाघासारखे नखे असलेले. हात म्हणजे दोन ठोकळेच आणि चेहरा पक्षी आणि माणसापासून बनलेला. त्यावर शेंदूर फासलेला. सोबत गळ्यात हार, पायात साखर, गुटखा, खर्रा आणि तोंडात सिगरेट.

तुम्हाला देखील या बिडीवाल्या देवाचे दर्शन घ्यायचे असतील तर लक्षात असून त्या अकोट ते हरिसाल रस्ता. खटकाली ते हायपाईन्टकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बघत चला देव नक्कीच दर्शन देईल.

हे हि वाच भिडू. 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here