म्हणून चितळेकडं काम करणाऱ्या पोराला लग्नासाठी पोरगी मिळते. 

काय सांगता दुपारी १ ते ३ जे झोपा काढतात त्यांच पण आत्ता बोलभिडूवाले कौतुक करणार का? हे आठ म्हणजे आठलाच बंद करतात. इथून ते थेट ते कट्टर ब्राह्मण आहेत हो. कशाला कौतुक करयात त्यांच इथपर्यन्तच्या प्रतिक्रिया चितळे आडनाव ऐकताच येवू शकतात. 

पण तुम्हाला हि गोष्ट सांगतोय ती आमच्या गावाची.

आमच्या गावात कस असतय तर चितळेंच्याकड कामाला असणाऱ्या पोराला लग्नासाठी पोरगी मिळतेच मिळते. अस समीकरण आहे. माझ गाव तासगाव. तासगावपासून दहा एक किलोमीटरच्या अंतरावर भिलवडी स्टेशन आहे. भिलवडी स्टेशन हे गाव एकदम छोट. पण गावात दोन मोठ्ठे प्लॅन्ट पहिला आहे तो हिंदूस्तान पेट्रोलियमचा आणि दूसरा मे. बी.जी. चितळेंचा. 

आमच्या भागातल्या मुलांनी सर्वात पहिला दहा चाकी ट्रक बघितला असेल तो चितळेंचा. काका चितळे आणि नाना चितळे ही दोन नाव ऐकतच पोरं मोठ्ठी झाली. चितळेत कामाला आहे म्हणल्यानंतर पोराच लग्ना ठरवताना अडचणी येत नाही. कारण काय तर लोकांचा विश्वास आहे, हे चितळे काय बुडणार नाहीत आणि नोकरी काय जाणार नाही.

इथं नोकरीला असलं की काहीही असू वर्षभर जितका पगार असतो त्याच्या २० ते ३० टक्यांपर्यन्त दिवाळीला बोनस दिला जातो. सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्याला दोन दिवसाचा पगार मिळतो. महिन्याच्या २, १२ आणि २२ तारखेला शेतकऱ्यांची दूधाची रक्कम मिळते आणि हो सांगली कोल्हापूरच्या भागात ज्या म्हैसाणा, मुऱ्हा सारख्या लाख लाख रुपयच्या म्हशी आणण्यात आल्या त्यामागे सुद्धा चितळेंचा हात असतो. 

इतकं सगळ असताना आम्ही जेव्हा पुण्यात येतो तेव्हा चितळे म्हणजे १ ते ३ बंद असणारे. अस्स्ल पुणेकरांचा गर्व घेवून जगणारे म्हणून ऐकावं लागतं. 

मग मला देखील प्रश्न पडला भिलवडीकडं आणि पुण्यात इतकं टोकाचं मत कस असू शकतो. चितळेंचा सातबारा काढायचं मनावर घेतलं आणि जे सापडलं ते “बोलभिडू” वर लिहलं. 

चितळे मुळचे सातारचे. नाही म्हणायला चितळे तेव्हा देखील श्रीमंतच होते. भास्कर गणेश चितळे आणि त्यांच्या पत्नी जानकीबाई यांनी सुरू केलेला हा व्यवसाय. दुधाबरोबर चक्का, तूप असे पदार्थ त्या काळात विकले जातं. भास्कर चितळेंच्या अस लक्षात आलं की या भागात कमी पाण्यामुळे म्हणावी अशी वैरण मिळत नाही. त्यामुळे दुधाच उत्पन्न कमी मिळत. त्या विचारातून आपल्या ६५० म्हशींसोबत त्यांनी भिलवडी स्टेशन गाठलं.

१९३९ च्या दरम्यान भिलवडी स्टेशनवर हा चितळ्यांचा गोठा उभा राहिला. भास्कर चितळे यांच्या सर्वात मोठ्या मुलाच नाव रघुनाथराव. रघुनाथराव हाताखाली कामाला आला. त्याच वेळी दूध आणि दुधाचे पदार्थ मुंबईला पाठवण्याची कल्पना भास्कर चितळेंच्या डोक्यात आली होती. मुंबईच्या तांबे आरोग्य भूवन मार्फत मुंबईत दूधाचा व्यवसाय चालू करण्यात आला होता. पण इथे चितळेंची डाळ शिजली नाही. 

मुंबईतल्या व्यवसायास म्हणावी तशी गती नव्हती पण पुण्यातल्या वेगवेगळ्या डेअरीमार्फत चितळेंच दुध, चक्का, तूप मिळत होतं. पुण्यातच काहीतरी करता येईल का पहा असा आदेश भास्कर चितळ्यांनी रघुनाथरावांना दिला आणि त्यांनी पुण्याचा अभ्यास सुरू केला. त्यातूनच पुण्यातल्या शनीपार जवळ चितळे बंधुच १९५० साली पहिलं आऊटलेट निघाल. रघुनाथराव आणि त्यांचे धाकटे बंधु राजाभाऊ पुण्यात विपणनाच काम पाहू लागले तर भिलवडी स्टेशनवर काकासाहेब आणि नानासाहेब उॆत्पादनाच काम पाहू लागले. 

सरळ साध गणित ठरलं. पुणे व्यवसाय वाढू लागला. चितळेंनी बाकरवाडीचं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं. चितळे मिठाई आली. डेक्कन जिमखान्यावर दूसर आऊटलेट निघालं. नंतर बाजीराव रोडवरच दूकान सुरू झालं. पुण्यात काय झालं हे नेमकं आणि थोडक्यात सांगायचं झालं तर चितळेंनी बाटलीबंद असणारं दूध भारतात पहिल्यांना पिशवीत भरलं. गुजरातची बाकरवडीच्या धर्तीवर पुणेरी बाकरवडी आणली. आज पुणेकरांना बाकरवडी म्हणजे अस्सल महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ वाटतो इतकं हे समीकरण घट्ट झालं. इकडे नाविण्यपुर्ण कामामुळे रघुनाथरावांना ओळख मिळाली. ते अस्सल पुणेकर झाले पण तिकडे या सगळ्यांचा बॅकबोन होते नाना चितळे आणि काका चितळे. 

नाना चितळे आणि काका चितळे हे दोघं भिलवडी राहून उत्पादनाच काम पहायचे. त्यांनी नेमकं काय केलं सागायचं झालं पुण्याची वाढती गरज बघुन दुध उत्पादनासाठी जे काही करायला लागतं ते त्यांनी केलं. आज भिलवडी स्टेशनवर काय आहे तर म्हैशींच्या जेनेटिक्सचा अभ्यास करणारं जगातलं पहिलं  केंद्र भिलवडी स्टेशनला आहे. म्हैशीला खाद्य देण्यापासून ते दूध काढण्यापर्यन्तचा सर्व कारभार संगणकीकरणावर चालतो. दुधात पाश्चरायझेशची भारतात सुरवात करण्याच श्रेय देखील चितळेंना जातं. 

याबद्दल भिलवडीचा स्टेशनवरचा मित्र अभिजीत जाधवला फोन लावून विचारलं तेव्हा त्यांन सांगितल ती प्रतिक्रिया खूप बोलकी होती तो म्हणाला, 

कसय आपल्याकडं एक शेतकरी गुजरात नाहीतर हरियाणात जावून लाख लाख रुपयेच जनावर आणू शकत नाही. एकच म्हैस घ्यायची असती. मुळात कुठली म्हैस चांगली, आपल्याकडं ती जगल का? दूध देईल का? असले खंडीभर प्रश्न असायचे. चितळ्यांनी काय केलं तर त्यांची डॉक्टरांची टिम अगोदर तिथ जायची. रिपोर्ट द्यायचे. मग ती टिम तिथ जावून जनावरं पारखून घेणार. शेतकऱ्यांनी पैसै भरले की जनावर घरपोच. आपल्या भागात म्हैसाणा,मुऱ्हा वाढण्यामागं त्यांचीच सिस्टीम आहे. ऊसामुळे पैसा आला म्हणतात पण खरा पैसा दूधामुळं आला. 

काका चितळे आणि नाना चितळे हि दोन माणसं छोट्यातल्या छोट्या कामगारासोबत बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नाना चितळेंनी सामाजिक काम केली त्याची चर्चा जोरात चालू असते. उदाहरण द्यायचच झालं तर यंदाच्या महापूराचं. हा किस्सा निमणीचे गजानन पाटील सांगतात.

ते म्हणाले, 

तिथं पण चितळे धावून आले. मग लोक पण चितळ्यांसाठी धावून जावू लागले. यंदाच्या महापूरात चितळ्यांच्या डेअरीत म्हणे पाच रेडे होते. एका रेड्याची किंमत १ कोटी रुपये. ब्रिडींग करण्यासाठी हे रेडे आहेत. पुराच पाणी जावू लागलं तेव्हा गावातल्या तरुणांनी जिव धोक्यात घालून हे रेडे बाहेर काढले. एखाद्यानं बक्षीस म्हणून चार पैसे देवून विषय संपवला असता. पण चितळेंनी पोरांची माहिती घेतली आणि डेअरीत त्यांना परमनंट नोकरी देवू केली. 

काका चितळे आणि नाना चितळ्यांची दूसऱ्या पिढीची हि जोडी. आत्ता त्यांची मुलं हा उद्योग त्याच विश्वासानं पुढं घेवून जात आहेत. जाता जाता अजून एक महत्वाची गोष्ट. भिलवडीत चितळ्याचं दूकान आहे ते सकाळी सात ते रात्री आठपर्यन्त सुरू असतं. आणि हो ते दूकानाला आज अखेर सुट्टी नाही. काहीही असो दूकान सुरू. भिलवडीच्या चितळ्यांसारखाच सुट्टी नॉट कार्यक्रम या दूकानाचा पण चालतो. 

हे हि वाच भिडू.