भावेश जोशी – आम आदमीचा “खास सुपरहिरो”.

भारतात सुपरहिरो ही संकल्पना का रुजली नसावी? पाश्चात्य देशांमध्ये सुपरहिरो हे पॉप कल्चरचा अविभाज्य भाग असतात. तिथल्या नवीन पिढ्यांच्या बालवयापासूनच्या मानसिक विकासात ते महत्त्वाची भर घालत असतात. तिथले गुन्हेगारीचे प्रमाण आणि भौतिक संपन्नतेमुळे सुपरनॅचरल फँटसीची ओढ ही त्यामागची मुख्य कारणं असावीत असं माझं मत आहे. भारतात कदाचित रामायण महाभारतातल्या गोष्टींमुळे आपली सुपरनॅचरल फँटसीची भूक लहानपणातच भागत असावी. आपल्याकडे असलेल्या लोककथांच्या श्रीमंत खजिन्यामुळे आपल्याला वेगळ्या सुपरहिरोंची कधी गरज वाटत नाही. म्हणून बजरंगबली, राम, कृष्ण, कर्ण, अर्जुन हेच आपले सुपरहिरो बनतात असे मानायला हवे.

“भावेश जोशी सुपरहिरो” या चित्रपटामध्ये मात्र अशा सुपरनॅचरल ताकतीचा हवेत उडणारा सुपरहिरो नाही. जनसामान्यातून आलेल्या हवश्या गवाश्यांची काहीतरी बदल घडवण्याच्या धडपडीची ही कथा आहे. चित्रपट सुरू होते तेव्हा 2014 आधीचे “जनलोकपाल” आंदोलनाचे देशात वातावरण आहे. भावेश जोशी(प्रियांशु पेन्यूली), सिकंदर खेर (हर्षवर्धन कपूर) हे दोन मुंबईत राहणारे जिवाभावाचे मित्र या आंदोलनामध्ये सामील होतात. या देशामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून बदल घडून येईल, भ्रष्टाचार समूळ नष्ट होईल असे या मित्रांना वाटत असते. रजत (आशिष वर्मा) हा त्यांचा हातात लेखणी किंवा कॅमेरा असणारा तिसरा मित्र त्यांच्या करामतीचा साक्षीदार आणि बहुतांशी चित्रपटाचा नॅरेटर आहे. भावेश एका वार्डातले पाण्याच्या चोरीचे प्रकरण उघडकीस आणतो पण त्यात त्याची हत्या होते आणि त्यामुळे आपल्या स्वप्नांपासून करियरपासून फारकत घेऊन सिकंदर भ्रष्टाचाराची घाण साफ करायचे काम स्वतःच्याच अंगावर घेतो अशी चित्रपटाची कथा आहे. कथा अगदी सरळ आणि अपेक्षित आहे. इथे सरळसरळ हिरो आणि व्हिलन वेगळे केले जाऊ शकतात. पण तरीही ते आपल्याला जाचत नाही. चित्रपटाची खरी ताकत तिच्या प्रेझेंटेशनमध्ये आहे. काही क्लिशे असले तरीही चित्रपट कुठेही अविश्वसनीय वाटत नाही. पटकथेला एक सुंदर चढता आलेख आहे. ज्यामुळे कथेच्या प्रोटागोनिस्टसोबत आपण त्याच्या भावनिक प्रवासाचे साक्षीदार होतो. म्हणूनच सिकंदरचे भावेश जोशीच्या व्यक्तित्वात परकाया प्रवेश होणे आणि व्हिजिलांटे जस्टीस वर विश्वास बसणे आपल्याला मनापासून पटते.

चित्रपटाचे छायाचित्रण अव्वल दर्जाचे आहे. कलर पॅलेट मधले सर्व रंग चित्रपटात पाहायला मिळतील. विशेषतः प्रत्येक प्रसंगाला मूडनुसार एक रंगछटा आहे. जे मला फार विशेष वाटले. बरं सर्व रंग आणि प्रकाशयोजना ही प्रसंगातल्या प्रॉप्समधूनच आलेली आहे. कुठेही खोटे कलर करेक्शन दिसत नाही. चित्रपटाचे संकलन खूपच विचारपूर्वक आणि सुंदर आहे. काही जम्प कट आणि मॅच कट अगदी क्लासिक चित्रपटांची आठवण करून देतात. सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिलेला आहे. विशेषकरून चित्रपटातले मारधाडीचे तसेच बाईकच्या पाठलागांचे दृश्य हे अतिशय वास्तववादी, कुठल्याही व्हिज्युअल इफेक्ट्सविना केलेले आहेत. ज्यासाठी ऍक्शन डिरेक्टर आणि दिग्दर्शक आपसूक वाहवा घेऊन जातात. आपण किती कमी बजेटमध्ये किती उत्कंठावर्धक कलाकृती तयार करू शकतो यासाठी तरी चित्रपटाच्या विद्यार्थ्यानी हा चित्रपट पहायलाच पाहिजे.

चित्रपटाची जराशी कमकुवत बाजू त्यातले राजकारण आहे. जनलोकपाल आंदोलनाच्या अपयशानंतर आलेले (भारतमातेच्या) अस्मितेचे राजकारण त्यात सूक्ष्मपणे दाखवले आहे. तरीसुद्धा येऊनजाऊन नगरसेवक, कॉन्ट्रॅक्टर यांना दोषी ठरवून व्हिलन बनवणे हे जरा सरधोपट वाटते. भावेश जोशी बहुतेक फ्रांचायझी बनेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे येत्या भागांमध्ये हे दोष काढले जातील असे वाटते. काही ठिकाणी चित्रपट थोडा धीमा होतो आणि प्रोटागोनिस्टच्या मानसिकतेत जाण्याचा प्रयत्न करतो ते काही प्रेक्षकांना अनावश्यक वाटेल तरीही चित्रपटप्रेमींसाठी पर्वणी आहे. एके ठिकाणी भावेश जोशी म्हणतो ” डेमॉक्रसीमे हरेक की औकात होती है…” हे वाक्य चित्रपटाच्या सामान्यांचे सुपरहिरो होण्याच्या पहिल्या पायरीचा दगड आहे. क्रांतीची सुरुवात प्रत्येकापासून व्हायला हवी. कोणीतरी अवतार येऊन आपले दुःख हरण करेल ही भारतीय मानसिकता इथे उघडी पडते. चित्रपटाच्या शेवटाला कोणत्याही हिरॉईक पद्धतीने न्याय मिळत नाही तर कथेमध्ये साक्षीदार असणारे रजत आणि सिकंदरची गर्लफ्रेंड न्यायासाठी लढणारे लढवय्ये बनतात. ही चित्रपटाची खास जमेची बाजू आहे. पुढच्या काळात आपल्या लोककथांमध्ये समाविष्ट होण्याच्या लायकीची या चित्रपटाची कथा आहे. आवर्जून पाहिल्यास कुठलाही तोटा नाही.

  • अरविंद गजानन जोशी. 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here