विलासराव देशमुख मुख्यमंत्री होण्याची भविष्यवाणी भैय्यु महाराजांनीच केली होती –

 

“संत हा एक विचार आहे. कोणी मनुष्य चमत्कार दाखवून संत होतो अस मला वाटत नाही. संत होण्यासाठी समाजाची सेवा करा. संत म्हणजे श्रद्धा आणि सबुरी”

संतपणाची अशी व्याख्या करणाऱ्या भैय्यू महाराजांनी आत्महत्या करावी ? हे न उलगडणार कोड आहे. ते संत होते का? याबाबत देखील अनेकांचे आरोप होते. पण ते गरिबांची सेवा करायचे. त्यांच्या ट्रस्ट मार्फेत त्यांनी लाखो शेतकऱ्यांचा संसार उभा केला, अनाथांना आसरा दिला, देहविक्री करणाऱ्या महिलांना मुख्य प्रवाहात आणलं. एक संत करतो ते सारकाही त्यांनी केलं. 

मात्र मोठमोठ्या राजकिय व्यासपीठांवर त्यांना पाहिलं की अनेकांच्या भुवया उंचावत ते तिथे नेमके काय करत होते हे कोणालाच समजत नसे. त्यांच एखाद्या उपक्रमात असणं जस कोडं होत तशीच गरज देखील होती. त्यांच्यावर राजकिय संत म्हणून देखील टिका होत होती. विलासराव देशमुखांबरोबर त्यांचे चांगले संबध होते. विलासराव मुख्यमंत्री होणार अशी भविष्यवाणी त्यांनीच केल्याचं सांगितल जातं. प्रतिभा पाटील जेव्हा राजस्थानच्या राज्यपाल होत्या तेव्हा त्यांनीच प्रतिभाताई राष्ट्रपती होतील अस सांगितलं होतं. पण या सगळ्या झाल्या कानगोष्टी. यातलं नेमकं खर काय ते कधीच समजणार नाही. 

महाराजांच्या भक्तांची यादी काढली तर भली मोठ्ठी लिस्ट मिळेल. नितीन गडकरी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, विलासराव देशमुख, प्रतिभा पाटील, लता मंगेशकर, हर्षवर्धन पाटील, सुशिलकुमार शिंदे अशी भक्तांची भली मोठ्ठी लिस्ट.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी एकदिवसाचं उपोषण केलं होतं. या सद्भावनेत प्रमुख व्यक्ती म्हणून भैय्यु महाराज उपस्थित होते. त्यांनी मोदींच उपोषण सोडवलं. मोदीनां हाताने ज्यूस देतानाचे फोटो आजही त्यांची ओळख सांगताना झळकत असतात. 

बाळासाहेब गेल्यानंतर ठाकरें कुटूंबाजवळ दिसणारी एकमेव घराबाहेरची व्यक्ती म्हणजे भैय्यु महाराज होते. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कटूता संपवण्यासाठी भैय्यू महाराजांनीच भेटी दिल्या होत्या. आण्णा हजारेंनी जेव्हा दिल्लीमध्ये आंदोलनाच शस्त्र बाहेर काढलं होतं तेव्हा विलासरावाना सोबत घेवून आण्णांबरोबर बोलणी करण्याचं काम देखील त्यांनीच केलं. 

मधल्या काळात भैय्यू महाराजांचा अपघात झाला होता.अपघात की घातपात याचं नेमकं कारण कळलं नव्हतं. मात्र एकाच रात्री एका ट्रकने पाठीमागून धडक देण्याचा तर काहींनी गाडीवर दगडफेक करण्याचा प्रकार केला होता. तेव्हा त्यांच्या भेटीसाठी सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्यापासून ते आनंदीबाई पटेलांपर्यन्त सर्वच जण हजर झाले होते. मराठा मोर्चामध्ये कोपर्डीला भेट देवून मराठा समाजाची कटूता कमी करण्यासाठी भैय्यू महाराजांना पुढं केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर करण्यात आला होता.

अगदी मागील वर्षी मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाव आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी देखील त्यांनाच मध्यप्रदेश सरकारनं पाचारण केलं होतं. 

हि झाली भैय्यू महाराजांच्या उपस्थितीची माहित असणारी निवडक उदाहरणं. त्यांनी राजकिय नेत्यांची भविष्य सांगितली. त्यांनी राजकिय नेत्यांच्या भूमिका देखील मांडल्या. त्यांच्या उपस्थितीने प्रश्न सुटायचे की नाही, ते कोणालाच ठामपणे सांगता येणार नाही मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांचा असणारा वावर महत्वाचाच होता.