सांगलीच्या राजकुमारीनं वडलांना स्पष्ट सुनावलं,” मैने प्यार किया !”

१९८९ साल. थियेटरमध्ये एक नवीन सिनेमा आला. राजश्री प्रोडक्शन च्या पिक्चर मध्ये हिरो आणि हिरोईन दोघे पण नवीन होते. पोस्टर वर तर दोघे फ्रेश दिसत होते. प्रेम आणि सुमनची ही लव्हस्टोरी. यात पत्र नेणारं कबुतर होत, फ्रेंडस लिहिलेली टोपी होती, केळ खिशात ठेवून फिरणारा लक्ष्या होता, अंताक्षरी होती. पिक्चर सुपरहिट झाला. यात मोहनीश बहलचं करेक्टर एक जबरदस्त डायलॉग मारतो,

  “एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते.”

निरागस आणि देखण्या दिसणाऱ्या प्रेम-सुमनच्या स्टोरीबरोबर अख्खा भारत इमोशनल झालेला. मुलगा आणि मुलगीच्यात मैत्री होऊ शकते का प्रश्नाने अनेकांना छळलं होत. पिक्चर तर सुपरहिट झालाच सोबत हे हिरो हिरोईनसुद्धा प्रत्येकाच्या घराघरात पोहचले. हिरो होता सलमान खान आणि हिरोईन होती भाग्यश्री.

खूप दिवसांनी बातमी समोर आली ही भाग्यश्री म्हणजे सांगलीची राजकुमारी हर हायनेस श्रीमंत भाग्यश्रीकुमारी पटवर्धन !!

सांगली संस्थानचे लाडके महाराज विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या तीन लेकिंपैकी भाग्यश्री सर्वात थोरली.  जेव्हा बाकीच्या मुली भातुकलीने वगैरे खेळत असतात त्या वयात भाग्यश्री आपल्या संस्थानच्या हत्तीशी खेळायची. थोरली असल्यामुळे लहानपणापासून तिच्यावर राजघराण्याच्या रितीभाती परंपरा जपण्याची जबाबदारी पडली होती.

मुलींचे शिक्षण स्वतःचा व्यवसाय याच्या निम्मिताने विजयसिंह राजे मुबईला राहायचे. पण दर वर्षीच्या गणेशोत्सव थाटामाटात साजरा करण्यासाठी संपूर्ण राजकुटुंब सांगलीमध्ये एकत्र यायचं.

विजयसिंहराजेना संगीताची, गायनाची खूप हौस होती. मुंबईत त्यांच्या बंगल्याशेजारी राहणारे अमोल पालेकर दूरदर्शनसाठी एक सिरियल बनवत होते तीच नाव होत ‘कच्ची धूप’. ही लहान मुलांची हसतखेळत संगीतिका होती.  या सिरीयलसाठी सांगलीच्या राजांनी संगीत दिल होत. त्यांच्या धाकट्या मुलीने सिरीयलमध्ये  छोट्याशा मिनूचा रोल केला होता. मोठ्या अलकाचा रोल करण्यासाठी पालेकरांना कोण मुलगी मिळत नव्हती.

एक मुलगी मिळाली पण ऐन शुटींगच्या दिवशी ती आपल्या बॉयफ्रेंड बरोबर पळाली. सगळा सेट उभा होता. आता हा रोल करण्यासाठी सोळा सतरा वर्षाची मुलगी कुठून आणायची?  अखेर विजयसिंह राजे यांच्याच थोरल्या मुलीला म्हणजेच आपल्या भाग्यश्रीला तयार करण्यात आलं . खर तर ती कायम अभ्यासात बुडालेली, वडिलांच्या धाकाने सलवार कमीज घालणारी , कधीही जास्त न बोलणारी लाजरी मुलगी होती.

कच्ची धूप त्याकाळात दूरदर्शनवर खूप गाजली. या सिरीयलमध्ये भाग्यश्री ने केलेला अभिनय सुरज बडजात्याने पाहिला. बडजात्या कुतुंब आणि पटवर्धन फमिली चांगली मैत्री होती. त्याने विजयसिंह राजेना आपल्या पोरीला मैने प्यार किया मध्ये काम करण्यासाठी तयार केले.

या सिनेमातल्या सोज्वळ सुमनच्या भूमिकेसाठी भाग्यश्री तयार झाली. वडिलांना न सांगता तिने फिल्ममध्ये जीन्स देखील घातली. तिच्या दृष्टीने हे खूप मोठ्ठ बंड होत. फक्त कीसचा सीन देण्यास तिने नकार दिला. आरशाच्या साह्याने हा सीन बडजात्याने निभावून नेला.

हा पिक्चर सुपरहिट झाला. सलमान खान भराभर फिल्म्स साईन करत सुटला. मैने प्यार किया आणि कयामत से कयामत तक या सिनेमाने भारतात लव्ह स्टोरीचा जॉनर परत आणला होता. सलमान प्रमाणेचं भाग्यश्रीसुद्धा मोठी स्टार झाली होती.

त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर तिला मिळाला होता.पूर्ण इंडस्ट्रीचं लक्ष तिच्याकडे लागलं होत. पण त्यांनतर बरेच दिवस भाग्यश्रीचा एकही सिनेमा दिसला नाही.

आणि बातमी आली भाग्यश्रीने आपल्या बॉयफ्रेंड बरोबर पळून जाऊन लग्न केले आहे.तिच्या घरच्यांप्रमाणे पूर्ण महाराष्ट्र आणि अख्ख्या भारतासाठी हा धक्का होता. भाग्यश्री तेव्हा अवघ्या अठरा वर्षाची होती.  

खर तर तिची लव्हस्टोरी मैने प्यार किया प्रमाणेचं होती. तिचा नवरा हिमालय दासानी तिचा शाळेपासूनचा मित्र. तेव्हापासून दोघांच नात खठ्ठ्या मिठ्या मैत्रीचं होतं. दोघे एकाच कॉलेजमध्येही शिकले. तेव्हा हिमालयने हिमंत करून तिला लग्नासाठी विचारलं. लाजरीबुजरी भाग्यश्री तयार झाली. पण तिच्या घरचे या आंतरजातीय लग्नासाठी तयार झाले नाहीत.

विजयसिंहराजेनी तिला हिमालयशी भेट घेण्यासाठी सुद्धा मनाई केली. घरच्यांच्या प्रेशरमूळ दोघांनी ब्रेकअप केलं. तसही भाग्यश्री अजून सोळा सतरा वर्षाची होती. हिमालय पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला गेला. या दरम्यानच्या काळात भाग्यश्रीला मैने प्यार किया मिळाला. तो सुपरहिट झाला.

या वर्षभराच्या काळात भाग्यश्री ला जाणवलं की आपण हिमालयशिवाय जगू शकत नाही. तिनं घरच्याच्या विरुद्ध जाऊन त्याच्याबरोबर लग्न केलं.

भाग्यश्रीला एका मुलाखतीत तिच्या पुढच्या फिल्म करीयर बद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली मी माझा नवरा सोडून दुसऱ्या कोणाबरोबर काम करायला कम्फर्टेबल नाही. फिल्मइंडस्ट्रीमध्ये ब्रेकिंग न्यूज आली,

“भाग्यश्री पटवर्धन आता फक्त तिचा नवरा हिरो असलेल्या सिनेमातच काम करणार. “

भाग्यश्रीची त्याकाळात क्रेझचं इतकी होती की तिच्या बरोबर काम करण्यासाठी प्रोड्युसरनी ठीकठाक दिसणाऱ्या हिमालयला हिरो म्हणून घेतले. असे जवळपास तीन चार सिनेमे आले आणि फ्लॉप झाले. हिमालय आपल्या सोबत भाग्यश्रीचं करीयरही डूबवून गेला. तिने सोडलेल्या सिनेमात काम करून दिव्या भारती, जुही चावला, रविना टंडन मोठ्या हिरोईन झाल्या. मात्र भाग्यश्रीला त्याच दुःख्ख नाही.

आजही भाग्यश्री आहे तशीच दिसते, गोड साधी सोज्वळ. ती आता हिमालयच्या घरात मारवाडी पदार्थ बनवणारी टिपिकल गृहिणी झाली आहे. दोन मुलांच्या जन्मानंतर तिच्या वडलांचा तिच्यावरचा राग कमी झाला. आता भाग्यश्री पूर्वीप्रमाणे आपल्या लाडक्या सांगलीच्या राजगणेशाच्या मिरवणुकीत सामील होते. तिची मूलं काही वर्षात सिनेमामध्ये सुद्धा येतील. सलमान म्हणे त्यांना लॉन्च करणार आहे.

एकूण काय तर तीच तस बरं चाललंय. मैत्रीतून सुरु झालेली तिच्या लव्हस्टोरीच्या फिल्मचा शेवट मात्र गोड झालाय हे नक्की! 

हे ही वाच भिडू.