देहविक्री करणाऱ्या गोव्यातील त्या बायका कुठे गेल्या हे आजपर्यन्त कोणालाच माहित नाही ?

येथे राहणाऱ्या महिलांची आकडेवारी तुमच्याकडे होती का ?

वस्ती उध्वस्त केल्यानंतर येथील बाया कोठे गेल्या याची चौकशी झाली आहे का ?

त्यांनी आत्महत्या केल्या का की परत त्या देहविक्रीच करू लागल्या..?

त्यांच्या पुर्नवसाठी तुम्ही काय केले ?

त्यांचे नेमके काय झाले ?

असे अनेक प्रश्‍न आजही गोव्यातील संवेदनशील लोक भाजप सरकारला विचारतात, ज्यांची उत्तरे आजही देण्यात आलेली नाहीत.

 

वरून कोसळणारा धोधो पाऊस, सोसाट्याने वाहणारा वारा, बाजूलाच खवळलेला दर्या आणि एकाला लागून दाटीवाटीने कोंदटलेल्या वातावरणात वसलेली घरे. कोणताही पर्यटक गोव्यात आलाकी बायना कोठे..?

असा प्रश्‍न आवर्जून विचारायचा कारण वास्कोमधील बायना ही वस्ती गोव्यातील प्रसिद्ध रेड लाइट एरिआ म्हणून ओळखली जात असे. आजच्याच दिवशी म्हणजेच 14 जून 2004 रोजी ही झोपडपट्‌टी भाजप सरकारच्या काळात उध्वस्त करण्यात आली. येथे राहणाऱ्या हजारच्या आसपास देहविक्री करणाऱ्या बायकांचा आक्रोश आजही या घटनेची आठवण निघल्यानंतर अस्वस्थ करून सोडतो.

सुमारे 8500 स्केअर मीटर एरियावर एकूण दहा बुलडोझर फिरविण्यात आले. वरून कोसळणाऱ्या पावसात टाहो फोडत रडत बसलेल्या, आपले घर न मोडण्यासाठीची भीक मागणाऱ्या तेथील लहान मुलांचे, बायकांचे काय झाले. याचे उत्तर आजतागायत कोणाकडे नाही.

कधीकाळी देहाचा बाजार असणाऱ्या या गजबजलेल्या भागात दिमाखात ओठाला लाली फासून, कंबर उघडी सोडून, केस पिंरगाळत पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःच्या देहाला अनेकांजवळ विकणाऱ्या या बाया धोधो कोसळणाऱ्या पावसात टाहो फोडून रडल्या होत्या. पण कोणाचीही गय न करता, नियमाप्रमाणे त्यांचे पुनर्वसनही न करता या बायांना या वस्तीतून हाकलून देण्यात आले होते. कोणी टाहो फोडून रडले होते, कोणी आपल्या मुलांना पोटाशी धरून दुसरी वस्ती गाठली तर काही बाया बेपत्ताच झाल्या, ज्या आजपर्यंत बेपत्ताच आहेत.काहींनी जमिनीवरच बसून सरकारच्या नावाने बोटे मोडली. त्यावेळच्या वर्तमानपत्रांनी या घटनेचे केलेले वर्णन हृदय पिळवटून टाकणारे आहे.

अनेक कोवळ्या मुली येथे विविध कारणांपायी आणल्या जायच्या, आणणाऱ्याला घरवालींकडून पोरगीच्या दिसण्यावर आणि तिच्या शरीराच्या पिळदारपणाला जोकता पैसा मिळत असे. जे मुली आणून विकत आणि धंदा करणाऱ्यांसाठी गिऱ्हाईक आणत त्यांना भडवे म्हटले जाई. हे लोक त्यांच्या आई, बहिणी आणि बायकांनाही गिऱ्हाईक आणून देत. जेव्हा वस्तीत नवी मुलगी येई तेव्हा तिच्याकरवी धंदा चांगला व्हावा म्हणून वस्तीच्या मध्यभागी असणाऱ्या त्यांच्या देवतेजवळ नेऊन कपाळाला सिंदूर लावून ती वेश्‍या झाल्याचे घोषितही केले जाई. राजकारणी, पोलिस यांच्यासाठी ही वस्ती स्वतःची शारीरिक भूक भागविण्यासह हप्ते घेण्यासाठीचे केंद्र होती. 1994 नंतर वस्तीवर एड्‌सने कब्जा केल्याने तेथे होणाऱ्या मृत्यूमुळे वर्तमानपत्रांची पाने भरली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here