अंजना ओम मोदी.. सॉरी अंजना ओम कश्यप !!

अंजना ओम मोदी सॉरी अंजना ओम कश्यप परवा परत चर्चेत आल्या. विषय असा होता की त्यांच्या आज तक चॅनलवर शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरेची बाईट सुरु होती. ते निवडणुकीत लढवायची की नाही यावर to be or not to be असं चाललंय हे सांगत होते.

इकडे अँकर अंजनाबाई मात्र वैतागल्या होत्या. त्यांना म्हणे इच्छा होती की देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत पाहिजे पण पदरी पडले आदित्य ठाकरे. बाईंचा माईक ‘चुकून’ सुरु राहिला. मग काय मनातल सगळ ओठावर आलं आणि ते गावभर झालं.

“ये शिवसेना का राहुल गांधी साबित होगा’, लिखकर रख लीजिए आप।”

झालं. लोकांना वाटल आता राडा होणार. युवाहृदयसम्राटांना अंजनाबाईनी बोलल म्हणजे खळखट्याक होणार. मागे निखील वागळेनां दोन वेळा धूतल होतं. पण तसं काही झालं नाही. शिवसेनेन सबुरीच धोरण स्वीकारलं.

कारण निवडणुकीचा सिझन, युतीच भविष्य टांगलेलं. फक्त काँग्रेसमधून नुकताच शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विटरवरून “भाडे का तट्टू” म्हणत आगपाखड केली मात्र त्यांनीही अंजना ओम याचं नाव घेतल नाही. खर तर अंजना कश्यपने आदित्य ठाकरे यांच्याबरोबर राहुल गांधींचा पण अपमान केला होता. मात्र काँग्रेसने जास्त लोड पण घेतला नाही.

अंजनाबाईनी चुकून झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. असो शिवसैनिकांनी देखील मोठ मन दाखवून त्यांना माफ केलं.

विषय असा की या अंजना ओम कश्यप आहेत तरी कोण?

अंजना ओम कश्यप यांचा जन्म झारखंड रांचीचा. तिथच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तीच शिक्षण झालं. तिचे वडील मिल्ट्रीमधले डॉक्टर. मुळचे बिहारी. अंजनाला वडिलांप्रमाणे डॉक्टर व्हायचं होतं. पण एन्ट्रन्स पास झाली नाही. मग काय तुमच्या आमच्या सारखं युपीएससीच खूळ तिच्या डोक्यात बसलं. नियमाप्रमाणे दिल्लीला आली. काही वर्ष दिली पण काय जमल नाही.

मग काय? स्पर्धापरीक्षेने गांजलेल्या प्रत्येकाच्या मदतीला येते त्या पत्रकारितेने हात दिला. जामिया इस्लामिया कॉलेजमधून जर्नालीजमचा डिप्लोमा केला आणि निघाली जग जिंकायला.

आता तुम्ही म्हणाल की गावकड चेहऱ्याने रापलेले वार्ताहर असतात तसा स्ट्रगल करावा लागला असेल तर तसं नाही. अंजना ताई दिसायला स्मार्ट होत्या, छोट्या शहरातून आल्या असल्या तरी इंग्लिश पक्कं होतं. मध्यंतरी सोशलवर्कमध्ये पोस्ट ग्रज्यूएशन.करून कुठल्यातरी एनजीओमध्ये काम केलेलं. या सगळ्याच्या जोरावर तिला नोकरी मिळाली. थेट दूरदर्शनवर.

वर्ष होतं २००३. आंखो देखी म्हणून गाजलेली सिरीयल लागायची तेव्हा, त्यात तुम्ही अंजनाला बघितल असेल. 

दूरदर्शनवर तिने केलेल्या कामाची जादू लवकरच पसरली. तिला झी न्यूज कडून टीव्ही रिपोर्टर म्हणून बोलावण आलं. अंजनाची स्टाईल, कोणतीही भीडभाड न ठेवता फर्ड्या हिंदीत स्पष्टपणे केलेले सवाल यामुळे तिची चर्चा सुरु होती.

याच काळात भारतीय मिडियाला बदलून टाकणारी एक घटना घडली. प्रिन्स बोअरच्या खड्ड्यात पडला. आठवतंय का? साधारण २००६ साल असेल. सगळी जनता देव पाण्यात घालून बसली होती. अंजनाबाई तिथे माईक घेऊन पोहचल्या. दिवसरात्र प्रिन्स बाहेर येई पर्यंत त्यांनी किल्ला लढवला. तिथे त्यांनी केलेलं काम बघून घराघरात तिला ओळखल जाऊ लागलं.

यानंतरच्या काळाला अंजना ओम कश्यप एरा म्हटल तरी चालेल. झी, स्टार वेगवेगळ्या चॅनलचा प्रवास करून शेवटी आज तक ला स्थिरावली. हिंदी न्यूज चॅनलची ती साम्राज्ञी झाली होती. दरम्यानच्या काळात तीच लग्न देखील झालं. तिला यूपीएससी जमल नाही पण लग्न मात्र एका आयपीएस ऑफिसरबरोबर केलं. नाव मंगेश कश्यप.

पुढे काय मग, निर्भया केस वेळी त्या स्वतः रस्त्यावर उतरून केलेलं ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना त्यांना काही दिल्लीच्या मुंड्यानी छेडल. तेव्हा सगळा देश सहानुभूतीने त्यांच्या पाठीशी उभा राहिला.

कायम चिडून तावातावाने भांडणाऱ्या अंजना यांचा हल्लाबोल हा कार्यक्रम सुपरहिट झाला. आज तकच्या त्या मुख्य अँँकर आहेत. काही जन सांगतात की त्यांना महिन्याला ३० लाख पगार मिळतो, कोणी म्हणत दिल्लीत त्यांची १८ कोटीची प्रॉपर्टी आहे. एक पत्रकार एवढी प्रगती करतो ही आपल्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे.

पण वाद त्यांची कधी पाठ सोडत नाही. विरोधक म्हणतात की २०१४ नंतर त्यांनी मोदींची तळी उचलून धरली आहे. त्यांच्या नवऱ्यामूळ पण एक वाद झाला. २०१६ साली मंगेश कश्यप यांना बऱ्याच सिनियरना डावलून दक्षिण दिल्ली नगरनिगमचा महत्वाचा ऑफिसर म्हणून निवडल गेल. यामागे अंजना बाईनी लावलेला वशिला होता असं बोललंल जातं. खर खोट माहित नाही.

मुझ्झफ्फरपूर मधल्या लहानमुलांच्या आयसीयुमध्ये जाऊन डॉक्टरांना धारेवर धरण्याच्या त्यांच्या स्टंटला सुद्धा खूप नावे ठेवली गेली. कधी जावेद अख्तरशी पंगा घेताना शब्दांचा मार खावा लागला तर कधी न्यूजरूम डिबेटमध्ये दंगा झाला. कधी स्वतःच नावच चुकून अंजना ओम मोदी असं सांगितलं.

पण पत्रकारिता म्हटल्यावर हे छोटे मोठे वाद पाचवीला पुजलेले असतात. दिवसभर बोलायचं म्हटल्यावर माणूस कन्टाळतो. कधी कधी जीभ घसरते. चालायचं. आता अंजना ओम कश्यप ४४ वर्षाच्या झाल्या आहेत.

वाद जाऊ दे पण त्या भारतीय मिडियाचा चेहरा आहेत. त्यांना कित्येक पुरस्कार मिळाले आहेत आणि कोणी कितीही कुत्सितपणे म्हटल तरी एक बिहारी पार्श्वभूमी असणाऱ्या या महिला पत्रकार असून ट्रोलर्सना भिक न घालता मोठमोठ्या पुढार्यांना घाम फोडताना त्यांनी जी कामगिरी केली आहे ती अतिशय स्पृहणीय आहे.

हे ही वाच भिडू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here