“बलात्कार कसा करावा” पुस्तक लिहणारे अनिल थत्ते.

अनिल थत्ते या अजब-गजब माणसाचं नाव मी पहिल्यांदा ऐकलं ते माझ्या आठवणीप्रमाणे साधारण तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी. कै.शंकरराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते आणि हे महोदय स्वतःला त्यांचे मानसपुत्र म्हणवून घ्यायचे ! स्वतः शंकरराव चव्हाण यांनी अनिल थत्ते हा आपला मानसपुत्र असल्याचं कुठे म्हटलेलं आमच्या ऐकण्यात किंवा वाचनात कधीही आलं नव्हतं हे विशेष ! तर ते असो. परंतु तेव्हापासून हा माणूस लक्षात राहिला हे महत्वाचं. त्यानंतर पुढे मग हा माणूस सातत्याने समोर येत गेला तो त्याने सुरु केलेल्या ‘गगनभेदी’ या पाक्षिकातून. तोवरच्या मराठी साप्ताहिक-पाक्षिकांच्या लिखाणाची, मजकुराची जी साचेबद्ध शैली होती तिलाच या माणसाने गगनभेदीतून प्रचंड मोठा छेद दिला. राजकारणासोबतच अश्लीलता, शिवीगाळ आदी कोणतेच लिखाण या पाक्षिकाला त्याज्य नव्हते. आणि आणखी महत्वाचं म्हणजे संपूर्ण अंकातील सर्व लिखाण एकट्या अनिल थत्तेंनी केलेलं असायचं !

खरंतर प्रचंड प्रतिभा या माणसात आहे. सरस्वती प्रसन्न आहे म्हणा ना. या प्रतिभेच्या जोरावर काही सकस साहित्य निर्माण करण्याचं या माणसाने ठरवलं असतं तर तो आज मराठी भाषेतील श्रेष्ठ साहित्यिक म्हणून निश्चितपणे गणला गेला असता.परंतु आपल्यातील या प्रतिभेचा वापर त्यांनी साहित्यबाह्य अन्य बाबींसाठी केला ! सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची अनेक लफडी, गैरव्यवहार त्यांनी आपल्या खास शैलीद्वारे गगनभेदीतून समोर आणले. परखड आणि स्फोटक मांडणीमुळे हे पाक्षिक संपूर्ण महाराष्ट्रात चांगलेच लोकप्रिय झाले. त्यांच्या लेखांचे मथळे जबरदस्त आणि कॅची असायचे. महाराष्ट्राचे तेव्हाचे महसूल मंत्री शांताराम घोलप यांच्या भ्रष्टाचारावर त्यांनी लिहिलेल्या एका लेखाचा मथळा मला अजून आठवतोय.’पन्नासाव्या वर्षी पन्नास कोटींचे मालक-मंत्री शांतारामभाऊ घोलप..’ या अशा गगनभेदीच्या हेडलाईन्स असायच्या !

एका राजकारण्याची मुलाखत घ्यायची आणि लगेच मग त्याच्या विरोधकाची मुलाखत घेऊन दोन्ही मुलाखती बाजूबाजूला छापायच्या. त्यात दोघांनी एकमेकांवर केलेले आरोप, शिवीगाळ वगैरे तसेच्या तसे, त्यांच्याच भाषेत ! महाराष्ट्रातील अनेक राजकारण्यांमध्ये तोवर असलेली किरकोळ स्वरूपाची भांडणे या अनिल थत्तेंनी गगनभेदीतून विकोपाला नेली. बरं..अनेक राजकारणी मंडळी विश्वासाने काही गोष्टी यांना ऑफ द रेकॉर्ड सांगायचे आणि हे महाशय मात्र त्या गोष्टी खुशाल एक्सक्युझीव म्हणून छापून मोकळे व्हायचे ! नीतिमत्ता, तारतम्य अनिल थत्तेंनी कधीतरी पाळले असेल का, याची मला शंका आहे. राष्ट्रवादीचे नेते वसंतराव डावखरे यांच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन या अनिल थत्तेंवर अखेरीस हल्ला केला, त्यांच्या गाडीच्या काचा वगैरे फोडल्या इतका या माणसाने त्यांना गगनभेदीतून मानसिक त्रास दिला. त्यांचे नुकतेच निधन झालेले असल्याने ते प्रकरण लिहिण्याचे टाळतो.

केवळ लपूनछपून विकल्या जाणाऱ्या पिवळ्या पुस्तकांमध्ये असणाऱ्या मजकुरापेक्षाही अधिक अश्लील मजकूर अनिल थत्तेंनी गगनभेदीत खुलेआम छापायला सुरुवात केली. ‘बायकोला अशी खुलवावी’,’निरोध असा वापरावा’ ही त्यांच्या काही लेखांची हेडिंग..! तुम्हाला आता वाटेल यात काय गैर आहे ? पण लक्षात घ्या, पंचवीसएक वर्षांपूर्वी आपल्यातील असामान्य प्रतिभेचा वापर करीत या अशा हेडिंग खालच्या लेखात थत्ते जे काही अश्लीलतेच्याही पलीकडचे लिहायचे त्याने खळबळ माजायची. सेक्स हा बहुदा अनिल थत्तेंचा वीक पॉईंट असावा. आणि त्यांच्या याच विषयावरच्या वादग्रस्त लिखाणाने त्यांना जीवघेण्या अडचणीतही आणले होते. झाले असे कि आपण काहीही लिहिले तरी आपले काही वाकडे होत नाही, आपल्याला कोणी काही करीत नाही या अहंकारातून अनिल थत्तेंचं धारिष्ठ्य बहुदा वाढत गेलं आणि त्यातूनच पुढे त्यांनी चक्क बलात्काऱ्यांना मार्गदर्शन करणारे ‘बलात्कार कसा करावा ?’ हे पुस्तक लिहिले ! थत्तेंचा हा प्रकार भयानक आणि सगळ्या सीमा ओलांडणारा होता. या पुस्तकाने साहजिकच प्रचंड खळबळ माजली. त्यांच्यावर अनेक महिला संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांनी खटले दाखल केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत थत्तेंचा हा सर्व पराक्रम पोहचला. बाळासाहेब प्रचंड संतप्त झाले. या माणसाला जिथे दिसेल तिथे ठेचून काढा असा जाहीर आदेशच बाळासाहेबांनी शिवसैनिकांना दिला. मग मात्र थत्ते महोदय गायब झाले. गगनभेदी बंद पडले. त्याच्यावरही तोवर अनेक केसेस दाखल झाल्या होत्या. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रारी गेल्या होत्या. एकूण अनिल थत्तेंचे वाईट दिवस सुरु झाले होते. असे बरेच दिवस गेले. आणि मग अचानक एक दिवस अनिल थत्तेंची बायको बरोबर रक्षाबंधनाच्या दिवशी शिवसेनेचे ठाण्याचे सर्वेसर्वा आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील मठात अवतीर्ण झाली. हातात ओवाळणीचे ताट, त्यात राखी वगैरे सगळं..डोळ्यात अश्रू..चेहरा केविलवाणा..कठोर हृदयाच्या आमच्या आनंद दिघेंचे हृदयही अखेर द्रवले. त्यांनी तिच्याकडून राखी बांधून घेतली आणि तिच्या नवऱ्याला म्हणजेच अनिल थत्तेंना शिवसेनाप्रमुखांच्या कोपापासून वाचवण्याचे वचन दिले !

आनंद दिघेंनी बाळासाहेबांचा राग कसा शमवला माहित नाही परंतु त्यानंतर काही दिवसांनी अनिल थत्ते आनंदआश्रमात दिसायला लागले. पुढे दिघेंच्याच सहकार्याने त्यांनी ठाण्यात एक केबल न्यूज चॅनल सुरु केले. प्रभावी वक्तृत्वाचेही वरदान असल्याने ते चॅनलही अल्पावधीत लोकप्रिय झाले. सगळे बरे चालले होते. पण वर म्हटल्याप्रमाणे नीतिमत्ता आणि थत्तेंचा कधी संबंधच आलेला नाही. कुणा एकाचे ते कधीच एकनिष्ठ होऊन राहू शकले नाहीत. ज्यांनी त्यांना बाळासाहेबांच्या रागापासून वाचवले, संरक्षण दिले, पुन्हा उभे केले त्याच आनंद दिघे यांच्याशी प्रतारणा करण्यास त्यांनी सुरुवात केली. दिघेंनी इशारा देऊनही थत्ते बधले नाहीत. उलट आपल्या चॅनल मधून त्यांनी जाहीरपणे दिघेंवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. साहजिकच त्याचा व्हायचा तो दुष्परिणाम झाला. ते चॅनल आणि अनिल थत्ते पुन्हा एकदा भुईसपाट झाले.

पण इतकं झाल्यावरही गप्प बसतील ते अनिल थत्ते कसले ? त्यांनी थेट दिघेंचे पक्षांतर्गत विरोधक असणाऱ्या नवी मुंबईचे सम्राट गणेश नाईक यांच्या दरबारात प्रवेश मिळवला ! पुढची काही वर्षे त्यांनी त्यांच्याबरोबर काढली. आपल्या कर्तृत्वानुसार पुढे तिथेही त्यांचे काही बिनसले आणि नवी मुंबईतूनही त्यांची हद्दपारी झाली ! पुढची काही वर्ष थत्ते शांत होते. परंतु आनंद दिघेंच्या अकाली निधनानंतर पुन्हा त्यांना उभारी आली आणि मग काही जाहिराती, व्याख्याने वगैरे असं त्यांचं काहीबाही सुरु झालं. चित्रविचित्र वेशभूषा करून आणि गाडीवरही काहीतरी विचित्र स्लोगन,फोटो पेंट करून ते ठाण्यातून फिरताना दिसायला लागले. वर्तमानपत्रात त्यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमांच्या जाहिराती सतत दिसत असतात. आज ठाणे,उद्या अलिबाग,परवा नाशिक असे त्यात उल्लेख असतात. पण इतक्या वर्षात त्यांचा हा व्याख्यानाचा कार्यक्रम कुठे प्रत्यक्ष सुरु असल्याचं माझ्या तरी निदर्शनाला आलेलं नाही ! कदाचित त्यांचे असे असणेच त्यांच्या बिग बॉस कार्यक्रमातील सहभागाला कारणीभूत ठरले असावे !

  • रवी पोखरकर