अनिल कपूरने संजय दत्तला गंडवून त्याचा हॉलीवूडचा चान्स घालवला होता.

आपला झक्कास भिडू ‘बाल’ कलाकार अनिल कपूर हा खऱ्या आयुष्यात देखील वन टू का फोर करण्यासाठी फेमस आहे असं म्हणतात. आपल्या चाप्टरपणाच्या जोरावरचं त्याने गेली चाळीस वर्षे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान टिकवून ठेवले आहे आणि एवढच नाही तर अमिताभने नकार दिलेल्या स्लमडॉग मिलीनियरमध्ये काम करून हॉलीवूडमध्ये सुद्धा प्रवेश मिळवला.

तर किस्सा आहे अनिल भाऊच्या हॉलीवूडमधल्या करामतीचा.

तर झालं असं होतं की डनी बॉयल दिग्दर्शित स्लमडॉगला मिळाले ८ ऑस्कर. पिक्चर झाला सुपरहिट. सगळीकडे त्याची चर्चा झाली. त्यातल्या अनेक भारतीय कलाकारांना हॉलीवूडमध्ये संधी मिळाली. देव पटेल, इरफान खान, ए आर रेहमान सगळ्यांना चान्स मिळाला. अनिल कपूरला वाटलं

“अपुन को भी हॉलीवूड मै ट्राय मारणे का है. बोले तो झक्कास”

झालं मग मुंबईमधून सगळ चंबूगबाळ आवरल,बॅगेत दाढीचं खोरं टाकलं आणि बायका पोरांना टाटा करून गडी डायरेक्ट लॉस एंजलीसला येऊन धडकला. तिथे रोज नवनवीन डायरेक्टर,प्रोड्युसरना भेटू लागला.बॉलीवूडमधला हा मोठा स्टार हॉलीवूडमध्ये स्ट्रगल करू लागला. स्लमडॉग मिलेनियरची पुण्याई सोबत होती त्यामुळे कमीतकमी पार्टीत इकडे तिकडे मोठ्या दिग्दर्शकांशी भेट होतच होती.

एकदा अशीच त्याची भेट ऑलिव्हर स्टोनशी झाली. आता तुम्ही विचाराल ऑलिव्हर स्टोन कोण? प्लॅटून, बोर्न ओन फोर्थ जुलै अशा सिनेमासाठी दोन वेळा ऑस्कर मिळवणारा दिग्दर्शक. तो त्याने सत्तरच्या दशकातल बनवलेल्या वॉलस्ट्रीट या सिनेमाचा सिक्वेल बनवणार होता. 

अनिलला ते कुठून तरी कळालेल होतं. अनिल भाऊ बोले तो झक्कास करत ऑलिव्हरच्या शेजारी गोंडा घोळू लागले. शेवटी ऑलिव्हरने त्याला विचारल काय म्हणून. तर अनिलने आपली ओळख वगैरे सगळ सांगितलं, आपला जबरदस्त फॅन आहे वगैरे नेहमीची सुरवात केली आणि एक गोष्ट तो त्यांना म्हणाला,

“मी तुमच्या एका सिनेमात काम केलो आहे.”

स्टोनला कळेना या माणसाला आपण कधी रोल दिला ते? शेवटी अनिलनेचं खुलासा केला,

“तुमचा सुपरहिट सिनेमा यु टर्नला आम्ही हिंदीत बनवलं होतं, त्या ‘मुसाफिर’ सिनेमात शॉन पेन ची भूमिका मी केली होती.”

ऑलिव्हर स्टोनला ऐकून गंमत वाटली. त्याला तो सिनेमा बघायचा होता. अनिलने लगेच त्याला मुसाफिरची डीव्हीडी पाठवून दिली. ऑलिव्हरने पिक्चर बघितला. त्यानंतर त्याने अनिलला फोन करून भेटायला बोलवले.

अनिल कपूरची तर निकल पडी. त्या रात्री ते झोपलं नाही. रात्रभर त्याने काय बोलायचं याची प्रॅक्टीस केली. ऑडिशनसाठी म्हणून एक दोन सीन तयार केले आणि सकाळी ऑलिव्हर स्टोनला भेटायला गेला. अनिल कपूरला बघताच ऑलिव्हर स्टोन खुश झाला. त्याने धावत येऊन अनिलला मिठीच मारली.

“मला पिक्चर खूपचं आवडला. सिनेमा संपेपर्यंत मी हसत होतो. जबरदस्त काम केल आहे तुम्ही.”

अनिल कपूरचे तर हात स्वर्गाला टेकायचे बाकी होते. आता वॉलस्ट्रीटच्या सिक्वेल मध्ये आपल्याला रोल मिळणार त्याला शंभर टक्के खात्रीच होती. ऑलिव्हर स्टोन मुसाफिर बद्दल भरभरून बोलत होता. अनिल भाऊचा जीव त्याच्या कानात आला.

“माझ्या पुढच्या सिनेमामध्ये एक रोल आहे. तुझ्या त्या मुसाफिर मध्ये तो सहा फुट उंचीचा तगडा हिरो कोण आहे? त्याला मला कास्ट करायचे आहे. त्याची माझी गाठ घालून देशील का? “

हे ऐकल्यावर अनिल कपूरचा फुगा फटकन फुटला. आपण एवढ कष्ट केले आणि रोल फुकट संजूबाबाला मिळणार म्हटल्यावर त्याच तोंड बारीक झालं. पण त्याच शैतान दिमाग काम करत होतं. अनिल कपूर म्हणाला,

“त्या हिरोचं नाव संजय दत्त. पण तो या सिनेमात काम करू शकत नाही.”

ऑलिव्हर स्टोन म्हणाला,

“why? he is a brilliant actor. माझ्या फिल्म साठी तर तो एकदम परफेक्ट आहे.”

अनिल म्हणाला,

“ते सगळ ठीक आहे पण संजय अमेरिकेला येउच शकत नाही. त्याला इमिग्रेशन व्हिसाचा प्रॉब्लेम आहे.”

ऑलिव्हर स्टोन खूप वेळ चुकचुकला. त्याने संजय दत्तला घेण्याचा विचार रद्द केला. इकडे अनिल भाऊला पण तो रोल मिळाला नाही.

 पुढे अनिल कपूर टॉम क्रुजच्या मिशन इम्पोसिबल मध्ये मार खाताना दिसला. 24 नावाच्या गाजलेल्या वेबसिरीजमध्ये सुद्धा त्याने काम केले आहे. वरचा किस्सा त्याने एका शो मध्ये संजय दत्तच्या समोरचं सांगितला. संजय दत्तने तेव्हा हसत हसत ऐकून घेतले पण नंतर त्याची हाडे सैल केली का हे नक्की माहित नाही.

हे ही वाच भिडू