अंदमान निकोबार बेटे आज भारतात आहेत याचं श्रेय जातं मराठा आरमाराच्या पराक्रमाला !

बंगालच्या उपसागरात असणारी अंदमान निकोबार बेटे. भारताच्या गळ्यात गुंफलेला पाचूचा नेकलेस.  नजरेत न मावणारे विस्तीर्ण समुद्र किनारे, पांढरीशुभ्र वाळू, आपल्याशी हितगुज करणाऱ्या अगणित लाटा आणि हिरवीगार सदाहरित जंगले हे तेथील आकर्षण.

काही दिवसापूर्वी सेंटनली आदिवासींच्या प्रश्नावरून अंदमान निकोबार बेटे परत चर्चेत आली. इथे राहणारी आदिवासी अजूनही अश्मयुगीन काळाप्रमाणे राहात आहेत. आधुनिक विज्ञानाने केलेली प्रगती त्यांच्या पर्यंत पोहचलेली नाही. गेली हजारो वर्षे त्यांच्या जीवनपद्धतीत कोणताही बदल झालेला नाही. अशा अनेक आदिवासी प्रजाती अंदमान निकोबारवर आढळतात.

अशावेळी प्रश्न पडतो की अंदमान निकोबार बेटाचा इतिहास काय? ही बेटे आपल्या भारतात कधीपासून आली?

अंदमान या शब्दाचा पहिला उल्लेख चिनी साहित्यात आढळतो. कुठल्यातरी चीनी व्यापाऱ्याचे भारताच्या मुख्य भूमीकडे येणारे जहाज वादळामुळे भरकटले आणि ते या बेटांवर जाऊन पोचले. या बेटाचा उल्लेख त्यांनी येनटोमेन असा केला आहे. पुढे काही वर्षांनी म्हणजेच पंधराव्या शतकात आणखी एका चीनी प्रवाशाने आपल्या डायरीत आंदेमन पर्वत अशी नोंद केली आहे. हेच ते अंदमान.

याचाच अर्थ या बेटावर चीनवरून भारताकडे येणारी जहाजे विश्रांतीसाठी थांबत असण्याची शक्यता आहे.

भारतात दहाव्या शतकात चोल राजा राजेंद्र याने सुमात्रा बेटांवर हल्ला करण्यासाठी या बेटांचा वापर केला होता अस सांगितलं जात. हे सोडलं तर अंदमानचा इतिहास तसा अप्रकाशित आहे. ज्याची कोणालाही जास्ती माहिती नाही.

मध्ययुगात भारतात अनेक राज्य होती, अनेक राजे होते. मात्र या राजांकडे आपले शक्तीशाली आरमार नव्हते. भारत देश हा सुपीक देश आहे. शिवाय सोन्याच्या हिऱ्याच्या प्रचंड खाणी येथे आढळतात. भारतीय राजे संपन्न होते. त्या काळातल्या कर्मठ समजुतीप्रमाणे हिंदू धर्मात समुद्रगमन करण्यास परवानगी नव्हती.

अशा अनेक कारणांमुळे भारतात कोणाकडेच मोठे नौदल नव्हते किंवा कोणी समुद्रपार करून पलीकडे असलेली बेटे ताब्यात घेतली नाहीत. फक्त एक राजा सोडून.

“छत्रपती शिवाजी महाराज”

महाराजांकडे प्रचंड मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्याचं रक्षण फक्त दिल्लीच्या मुघलसत्तेपासूनच नाही तर सातसमुद्रापार हून आलेल्या गोऱ्या लोकांपासून केले पाहिजे हे त्यांनी ओळखलं होतं. यासाठीच मराठ्यांचं पहिलं आरमार त्यांनी उभा केलं. समुद्री किल्ले मजबूत केले. महाराजांच्या काळात अरबी समुद्रातून स्वराज्याकडे वाकडी नजर करून पाहण्याची टाप कोणाकडे नव्हती.

पुढे मराठी आरमाराची जबाबदारी कान्होजी आंग्रेच्या कडे आली. शिवरायांच्या आणि संभाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्य मोडकळीस येईल असा जो अनेकांचा अंदाज होता तो संताजी, धनाजी, कान्होजींच्या सारख्या लढवय्या सरदारांच्या मुळे खोटा ठरला. मराठी राज्याचा तारू या वादळात टिकला आणि जोमाने मार्गक्रमण करू लागला.

छत्रपती ताराराणीबाईसाहेबांच्या काळात कान्होजी आन्ग्रेनी प्रचंड पराक्रम  गाजवला.

मुंबई ते वेंगुर्ला या किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व होते. अरबी समुद्रातच नाही तर हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या भागातही मराठ्यांच्या लढाऊ नौका फिरत होत्या. दर्यासारंग कान्होजी आंग्रेंची दहशत लंडनपर्यंत पोहचली होती. त्यांचा बंदोबस्त कसा करावा हा प्रश्न इंग्रज सत्तेला पडला होता.

बंगालच्या उपसागरावर नियंत्रण मिळवण्यासाठी तिथल्या इंग्रज डच आणि पोर्तुगीज जहाजांशी लढा देण्यासाठी कान्होजी आन्ग्रेनी अंदमान बेटावर आपला नाविक तळ उभा केला.

अंदमान बेटावरचा हा पहिला नाविक तळ होता. 

कान्होजी आंग्रे यांचा हा व्युव्हात्मक निर्णय होता. कलकत्ता, मद्रास, पोंडेचरी येथून जाणारी इंग्लिश, डच जहाजे मराठ्यांच्या टप्प्यामध्ये आली. जंग जंग पछाडूनही इंग्रजांना सरखेल कान्होजी आंग्रेंचा पराभव करणे शक्य होत नव्हते. दुर्गम अशा अंदमान निकोबार बेटांमध्ये वेगाने जाऊन लपणार्या मराठी जहाजांचा पाठलाग करण्यासाठी गेलेल्या इंग्लिश नौका तिथेच जलसमाधी घेत होत्या.

त्यांच्या भीतीने इंग्रजांनी कान्होजींच्या मराठा आरमाराला समुद्री चाचे म्हणून घोषित केले होते.

कोकणाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कान्होजींच्या बंदोबस्तासाठी आलेले अनेक इंग्लिश दर्यावर्दी मारले गेले. एकदा तर मराठ्यांनी मुंबईच्या ब्रिटीश गव्हर्नरला ताब्यात घेतले होते. मेधाजी भटकर आणि मायनाक भंडारी यांच्या मदतीने कान्होजीनी संपूर्ण भारताच्या किनारपट्टीवर राज्य केलं.

कान्होजींच्या मृत्यूनंतर मराठा सत्तेचे आपल्या आरमाराकडे दुर्लक्ष झाले.

काही वर्षांनी आपल्या सत्तासंघर्षाच्या नादात पेशव्यांनी इंग्रजांना मराठा आरमार बुडवण्यात मदत केली. १७५६ साली पेशव्यांनी कान्होजींच्या मुलाला म्हणजे तुळाजी आंग्रेला इंग्रजांना पकडवून दिले आणि समुद्रावरील आपले राज्य देखील संपुष्टात आले.

कान्होजींच्या नंतर इंग्रजांना अंदमान, निकोबार या बेटांचे महत्व लक्षात आले आणि त्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी तिथला वापर सुरु केला.

भारतात गुन्हे केलेल्या अनेक कैद्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात येऊ लागले. तिथे अत्याधुनिक नाविक तळ उभारण्यात आला. अंदमानमध्ये झालेल्या शिक्षेची भीती एवढी होती की लोक तीला काळ्यापाण्याची शिक्षा म्हणून ओळखत होते.

पुढे दुसऱ्या महायुद्धावेळी जपानी सैन्याने अंदमान निकोबारवर विजय मिळवला आणि सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या ताब्यात ही बेटे दिली. पण दुर्दैवाने इंग्रजांचा दुसऱ्या महायुद्धात विजय झाला आणि ही बेटे परत ब्रिटीश साम्राज्याच्या ताब्यात आली.

पुढे १९४७ साली भारत सोडून जाताना इंग्रजांनी भारताच्या मुख्यभूमीबरोबरच अंदमान निकोबार ही बेटे सुद्धा स्वतंत्र केली आणि ती भारताचा अविभाज्य भाग आहेत असे घोषित केले.

आजही भारतासाठी सामरिकदृष्ट्या अंदमान व निकोबार बेटे अतिशय महत्वाची आहेत. बांगलादेशला स्वतत्र करण्याच्या युद्धात आपल्या नौदलाने अंदमानवरून केलेल्या मोहिमेचा आपल्याला खूप मोठा फायदा झाला. आजही अंदमानमुळे बंगालचा उपसागर, हिंदी महासागरावर आपले वर्चस्व टिकून आहे.

याचे श्रेय जाते कान्होजी आंग्रेंच्या दूरदृष्टीला. त्यांनी तिथे नाविक तळ उभारला म्हणून अंदमान आज भारताचा एक शक्तिशाली घटक बनला आहे. नाही तर काय माहिती या बेटांचा ताबा म्यानमार मलेशिया इंडोनेशिया तिथून तुलनेने जवळ असणाऱ्या कुठल्या तरी देशाकडे असता.

संदर्भ- Indian defence review by Lef. gen. J.S.Bajwa

हे ही वाच भिडू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here