ही दोस्ती तुटायची नाय !!

आपल्या बॉलीवूड सिनेमात नेहमी फ्रेन्डशिप ची उदाहरण सांगितली जातात. मुन्नाभाई मधला मुन्ना सर्किट, शोले मधला जय विरू, रांझणा मधले कुंदन मुरारी, सैराट मधले परश्या आणि लंगड्या किती तरी उदाहरणे सांगता येतील. हिरोची हिरोगिरी त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या जीवावरच चालते. हीरोवर कसलं पण संकट येऊ दे त्याचा बेस्ती त्याला त्यातून बाहेर काढतोच.

भारतीय राजकारणात सध्या अशाच दोन बेस्ट फ्रेंडचा बोलबाला आहे. तुम्ही ओळखलं असलच बोल भिडू आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा बद्दल बोलणार आहे.

मोदिजीनी आज दुसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली, तीही सध्या सुध्या नाही तर जवळपास तीनशे साडे तीनशे खासदारांच्या त्सुनामी सकट. आज मोदिजीच्या समोर कोणीही उभे राहण्याची ताकद विरोधी पक्षात तर जाऊ द्या पण खुद्द भाजपमध्ये देखील नाही. आज कोणालाही विचारलं मोदींच्या या यशामागे कोण आहे तर सगळे सांगतील त्यांचा बेस्ट फ्रेंड आमित शहा.

हे अमित शहा आहेत तरी कोण? त्यांची आणि नरेंद्र मोदींची मैत्री कधी पासून सुरु झाली?

साधारण ऐंशीच्या दशकातील गोष्ट आहे. गुजरातमध्ये आरएसएसने जोर धरला होता. गावोगावी त्यांचे प्रचारक हिंडत होते. यातच होते नरेंद्र दामोदरदास मोदी. आणीबाणीच्या काळात त्यांनी भूमिगत होऊन केलेल्या कामामुळे संघाच्या वरिष्ठ वर्तुळात मोदींच नाव पोहचल होत. त्यांना गुजरातच्या सुरत वडोदराबरोबरचं दिल्लीमध्ये देखील महत्वाच्या जबाबदार्या देण्यात आल्या होत्या.

एकदा आरएसएसच्या एका मिटिंगसाठी नरेंद्र मोदी अहमदाबादला आले होते. तेव्हा कोणीतरी त्यांची ओळख एका तरूणाशी करून दिली,

“इनसे मिलीये, ये एबीव्हिपी मै बहुत बढीया काम करते है. बहुत उत्साही कार्यकर्ता है. इनका नाम है अमितभाई शाह”

त्या दिवसापासून अमित भाई शाह हे नाव आयुष्यभरासाठी नरेंद्र मोदींशी जोडलं जाणार होतं.

अमित शाह यांचं कुटुंब तसं सुखवस्तू, मोदिजीप्रमाणे त्यांना लहानपणी चहा विकणे वगैरे कामे करावी लागली नाहीत. मनसा येथे त्यांच्या वडिलांचा पीव्हीसी पाईपचा बिझनेस होता. अमित शहा हे तेव्हा गुजरात विद्यापीठात बायोकेमिस्ट्री शिकत होते. त्यांना लहानपणापासून शाखेत जात असल्यामुळे संघविचारांची आवड होती. कॉलेज जीवनात ते संघाची विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले. पुढे यातच काम करण्यासाठी त्यांनी आपले शिक्षण अर्ध्यातून सोडले.

याच काळात संघाची राजकीय विंग असलेली भारतीय जनता पार्टी आकार घेत होती. अमित शहा यांचं संघटन कौशल्य पाहून त्यांना १९८४-८५ मध्ये एबीव्हीपी मधून भाजपा युवा मोर्चा मध्ये पाठवण्यात आलं. पुढे आयुष्यभर निवडणुका आपल्या मॅनेजमेंट कौशल्याने गाजवणारे अमितभाईनी अहमदाबादच्या नगरपालिका निवडणुकीत नरानपुरा वॉर्डात पोलिंग एजंट म्हणून काम केलं. निवडणुका कशा असतात याचे धडे गिरवले त्यांनी तिथेच गिरवले.

पुढे एक वर्षाने प्रचारक नरेंद्र मोदींना गुजरात भाजपा मध्ये पाठवण्यात आले. तसं बघायला गेलं तर मोदी हे अमित शहा यांच्या पेक्षा जवळपास १४ वर्षांनी मोठे आहेत. पण ते भाजप मध्ये अमित शहा यांच्या नंतर आले. त्या अर्थाने ते अमितभाई यांना ज्युनिअर म्हटले पाहिजेत.

१९८७ मध्ये नरेंद्र मोदींकडे अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली. मोदींनी भाजपा युवा मोर्चाच्या अमित शहा यांच्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांना घेऊन जोरदार कम्पनिंग केलं. भाजपाने तिथे सहज विजय मिळवला. याच निवडणुकी दरम्यान या दोन्ही नेत्यांची गाढ मैत्री झाली.

अमित शहानी नरेंद्र मोदींचे शिष्यत्व पत्करले. नरेंद्र मोदींना देखील हा माणूस आपल्याला कधी धोका देणारं नाही याची जाणीव तिथेच झाली.

दिवसेंदिवस गुजरात भाजपमध्ये या दोघांच्या नेतृत्वाचा बोलबाला सुरु झाला. रामजन्मभूमीसाठी सुरु करण्यात आलेल्या रथयात्रेला गुजरातमध्ये जोरदार प्रतिसाद मिळाला. त्याच्या नियोजनात याच गुरु शिष्याची जोडी आघाडीवर होती. एवढेचं नव्हे तर १९९१ साली खुद्द लालकृष्ण आडवाणी यांना गांधीनगर मधून निवडून आणण्यातही हेच दोघे होते.

या दोघांच्या कामाच्या तडफदार कामाची चर्चा भाजपा हाय कमांड मध्ये सुरु झाली होती. १९९५ साली गुजरात मध्ये पहिल्यांदा भाजपाचे सरकार आले. केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले.हा विजय साकार करणारया नरेंद्र मोदीना तेव्हा सरकारच्या ऐवजी संघटना मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. दिल्ली मध्ये भाजपचा राष्ट्रीय सरचिटणीस व प्रवक्ता ही महत्वाची पदे त्यांना दिली.

नरेंद्र मोदीनां गुजरातच्या राजकारणापासून दूर करण्याचे प्रयत्न झाले पण मात्र त्यांनी अमित शहा ना सोबत घेऊन गुजरात च्या गावोगावी फिरून पक्ष मजबूत करण्याचे काम सुरूच ठेवले. त्या काळी गुजरातच्या ग्रामीण भागात कॉंग्रेसचे वर्चस्व होते. पण या दोघांनी प्रत्येक गावातून कॉंग्रेसचे जुने कार्यकर्ते फोडून त्यांना आपल्या पक्षात आणायचा सपाटा लावला. कॉंग्रेसचे बळ असणाऱ्या सहकारी संस्था आपल्या ताब्यात घेनाय्स सुरवात केली.

१९९७ साली अमित शहा पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.पुढच्या दोनच वर्षात ते अहमदाबाद जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन बनले. त्यांनी ती बँक तोट्यातून फायद्यात आणून दाखवली. गुजरात भाजपा वर मोदींच्या गटाचे वर्चस्व होते. 

२००१ साली गुजरात मध्ये भूकंप झाला. तेव्हा झालेल्या मदतकार्यात झालेल्या चुका, भ्रष्टाचाराचे आरोप, निवडणुकीत येत असलेले अपयश, स्वतः मुख्यमंत्र्यांची खालावलेली तब्येत अशी अनेक करणे दाखवून केशुभाई पटेल यांना खुर्चीवरून बाजूला करण्यात आलं, आणि नरेंद्र मोदी यांचं युग सुरु झालं.

२००२च्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीनंतर मोदींनी या आपल्या लाडक्या दोस्ताला मंत्रीमंडळात घेतले. ते गुजरातचे सर्वात तरुण मंत्री होते. एक काळ असा होता अमित शाह हे मोदींच्या मंत्रीमंडळाट जवळपास १२ खाती सांभाळत होते. यात गृह, कायदा आणि सुव्यवस्था अशा महत्वाच्या खात्यांचा समावेश होता.

मुख्यमंत्री काळात नरेंद्र मोदींच्यावर जे जे काही हल्ले करण्यात आले त्यावेळी अमित शहा त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे असलेले दिसले. २०१०साली फेक एन्काऊंटर केस प्रकरणी त्यांना अटक करण्यात आले. त्यांच्या वर तडीपारीचे आदेश देण्यात आले. एका चनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशन द्वारे आरोप करण्यात आले की अमित शाह हे नरेंद्र मोदींच्या आदेशावरून एका महिलेवर पाळत ठेवत होते.

पण हे आरोप पुढे टिकू शकले नाहीत. जेव्हा भाजप तर्फे नरेंद्र मोदीना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यात आले तेव्हा पासून अमित शहा यांच्यावरही महत्वाची जबाबदारी पडली. नरेंद्र मोदींची प्रचार यंत्रणा अमित शहा यांच्याच आदेशावरून काम करत होती. त्यांनी केलेले बूथपातळीवरचे मायक्रो नियोजन मोदींना पंतप्रधान पदावर घेऊन गेले.

मोदीही प्रधानमन्त्री बनल्यावर आपल्या मित्राला विसरले नाहीत. त्यांनी पूर्ण पक्षाची पकड आपल्या हाती राहावी यासाठी अमित शहाना दिल्लीत बोलावून घेतले आणि त्यांना भारतीय जनता पार्टी अध्यक्ष बनवले. अमित शहानी मोदी सरकारचे वादळ त्यांनतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत घुमवले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी मिळवलेला जबरदस्त विजय हा आश्चर्यकारक मानला गेला.

यावेळच्या मोदींना जिंकून देणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर ही अमित शहा यांचीच छाप होती. मोदी फ्रंटवर राहून प्रचारसभा घेत होते मात्र त्याचे बारीसारीक नियोजन अमितभाई करत होते. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देखील नरेंद्र मोदी यांच्या एकमेव पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा अमित शहा यांनी प्रधानमन्त्रयावर होणारे प्रश्नरुपी हल्ले स्वतः परतवून लावले. मोदींना एकही प्रश्नाचे उत्तर द्यावे लागले नाही. अनेकांनी गंमतीमध्ये अमित शाह यांना रामाच्या हनुमानाची उपमा दिली.

आज देशभरातील सर्वात शक्तिशाली नेते म्हणून या दोघांचा उल्लेख करावं लागेल. मोदींवर झालेला राफेल सारखा आरोप असो किंवा अमित शहांच्या मुलावर अवैध संपत्ती गोळा क्र्नायचा आरोप असो, कोणत्याही परिस्थितीत एकमेकावरचा विश्वास ढळू न देता आक्रमकपणे विरोधकांना संपवायचं काम या जोडीने केलंय. म्हणूनच यावेळी देखील भाजपाचे प्रचंड बहुमताने सरकार स्थापन होतय.

काही दिवसांनी मोदी परत पंतप्रधानपदाची शपथ घेतील. यावेळी अमित भाई शाह गांधीनगर मधून प्रचंड मतांनी खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते लोकसभेमध्ये मोदींची बाजू सांभाळायला सर्वात पुढे असतीलच पण अशीही चर्चा आहे की त्यांना मोदीजी आपल्या मंत्रीमंडळात गृहमंत्री पद देतील. बघू काय काय होतं ते.

हे ही वाच भिडू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here