स्वत:च्या चप्पला घालता आल्या नाहीत म्हणून अवधचा नवाब इंग्रजांना सापडला..!

अवधचा नवाब. हा तोच न ज्याला पकडायला इंग्रज आले पण त्याला स्वत:ची चप्पल घालता येत नव्हती. तो पळूनच जावू शकला नाही म्हणून सापडला. अवधच्या नवाबाबद्दलचा हा सर्वात लोकप्रिय किस्सा. काही किस्से इतिहासाच्या पुस्तकातून जन्म घेतात तर काही किस्से माणसांच्या मैफिलीतून.

हा किस्सा माणसांच्या मैफिलीतला. संदर्भ नसलेला पसरवण्यात आलेला किस्सा. पण नवाबाबतीत हा किस्सा जोरदार पसरला गेला त्याचं महत्वाच कारण म्हणजे, त्याची लाईफस्टाईल !

अवध म्हणजे आज जिथे अयोध्या आहे तिथला आसपासचा भाग. अवध संस्थानची राजधानी होती लखनौ आणि नवाब होता वाजीद अली शाह. गंगेच्या सुपीक खोऱ्यातल अवध म्हणजे तसा समृद्ध भाग. इंग्रज अधिकारी तर अवध संस्थानला केक वरची चेरी म्हणत.

वाजीद अलीच्या पूर्वजांनी नवाब म्हणून भरपूर वर्ष अवध वर राज्य केलं पण वाजीद अली जेव्हा नवाब बनला तेव्हा अवध संस्थानची ताकद पूर्वी एवढी उरली नव्हती. इंग्रजांबरोबर लढायामध्ये हार मिळाल्यामुळेअवध संस्थान क्षीण झाले होते.

वाजीद अली शाह म्हणजे मोठा शौकीन माणूस. त्याला रणांगणावरच्या लढायापेक्षा संगीत,नृत्य, नाट्य, शायरी, दर्जेदार जेवण या मध्ये रुची होती. तसही लखनौ शौकीन मिझासी, मेहमान नवाझी यासाठी जगप्रसिद्ध आहे. मग त्यांचा नवाब तरी यामध्ये कसा मागे राहील. वाजीद अली शाहच्या आयुष्यात त्याच्या नवाबीपेक्षाही या सर्व गोष्टी महत्वाच्या होत्या.

आज लखनौ मध्ये जिथे भातखंडे संगीतविश्वविद्यालय आहे तिथे पूर्वी वाजीदअली शाहचा परीखाना होता. इथे नवाबाच्या पऱ्या राहायच्या. पऱ्या म्हणजे नवाबाच्या आवडत्या दासी.वाजीद अली ने ३००च्या वर लग्ने केली होती. याशिवाय अंगवस्त्र म्हणून आणखी दासी असायच्या.

असं म्हणतात की वयाच्या ८व्या वर्षीच नवाबाला एका दासीने कामक्रीडा शिकवली होती. तेव्हा पासूनच त्याला पऱ्याचा शौक सुरु झाला. आपली कामक्रीडेची ताकद वाढवण्यासाठी १६० पेक्षा अधिक मसाले घातलेले कबाब, कुश्ते, बिर्याणी असा जबरदस्त आहार तो घेई.  ज्या परीला नवाबापासून मूल होई तिच्या नावापुढे महल लावले जाई .

 पुढे १८५७च्या बंडात पराक्रम केल्यामुळे  इतिहासात प्रसिद्ध झालेली वाजीद अली ची लाडकी बेगम हझरत महल, ती सुद्धा असाच प्रवास करून परीहून बेगम बनली होती.

सार जग गोऱ्या रंगामागं वेडं असताना वाजीद आली शाहच्या परीखाण्यामध्ये आफ्रिकेच्या कृष्णवर्णीय पऱ्या सुद्धा होत्या.  या परीखान्यामध्ये राहणाऱ्या पऱ्याना संगीत नृत्य याबरोबर शस्त्र चालवायचं खास प्रशिक्षण दिल जाई. परीखाण्याच्या संरक्षणाची जबाबदारीही पऱ्यांवरच असे. यामुळेच काही तासात लखनौ जिंकूनही इंग्रजांना बेगम, तवायफ आणि त्यांची मुले यांना पूर्णपणे निपटून काढायला अनेक महिने गेले.

नवाबाला कत्थक नृत्य आणि ठुमरीचं विशेष वेड होत.

फक्त मंदिरापुरत्या असणाऱ्या या नृत्यप्रकाराला त्याने राज्यमान्यता दिली. तो उत्तम कत्थक नर्तक होता. दरबाराला गोकुळ बनवून तो स्वतः कृष्ण बने आणि त्याच्या दासी गोपिका बनत. रासलीला च्या रुपात कत्थक नृत्याचा अविष्कार घडे. अनेक ठुमरीची रचना त्याने स्वतः केली. आजही प्रसिद्ध असलेली “बाबुल मोरा” ही ठुमरी त्यानेच लिहिली आहे.

त्याने ६०च्या वर ग्रंथ लिहिले. त्याला सर्वसामन्य लोक बोलतात त्या खडी बोली आवडायची. त्यानेच अवधी भाषेचा प्रसार केला. लोकांचा तो आवडता नवाब होता.

एकदा मोहरम आणि होली एकाच दिवशी आल्यामुळे लखनौ मध्ये रंगपंचमी खेळली गेली नाही. त्यावेळी रागावलेल्या नवाबाने दुसऱ्या दिवशी सगळ्या लखनौच्या नागरिकांना रंगपंचमी खेळायला लावली. त्या दिवशी पहिल्यांदा हिंदूमुस्लीम एकत्र रंगपंचमी खेळले.

असा हा रंगरेल नवाब, त्याच्या कडे लढाईचे कौशल्य नसल्यामुळे काही तासातच इंग्रजांच्या हाती आपलं सारं साम्राज्य गमावून बसला. लॉर्ड डलहौसीच्या मते झाड हलवल्यावर जसे चेरीचे फळ खाली पडते तेवढ्या सहजतेने अवध इंग्रजांच्या हाती लागले. इतक्या झटपट हार पत्करल्यामुळेच की काय नवाबाच्या चपलेचा तो किस्सा सुप्रसिद्ध झाला.

नवाब वाजीद अलीशाह ची रंगीन स्टोरी भारताचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांना इतकी आवडली की त्यांनी आपल्या आयुष्यातला एकमेव हिंदी चित्रपट “शतरंज के खिलाडी” वाजीद अलीच्या राजवटीवर बनवला.

याच शतरंज के खिलाडी मध्ये एक प्रसंग आहे, इंग्रज लखनौ मध्ये शिरले आहेत. आता वाजीद अलीचे राज्य गेले म्हणून त्याचा प्रधान रडतो आहे. तेव्हा स्वतःला ही आलेला आवंढा गिळून शायरीच्या रुपात नवाब आपल्या प्रधानाची समजूत काढतो,

” सिफ शायरी और मौसकी ही मर्द के आंखो मी आसू ला सकते है.”

खुलेपणाने रडू न शकणाऱ्या आणि ऐनवेळी पळताना चप्पल न सापडणाऱ्या सर्व शौकीन मिजास मर्द भिडूनां जागतिक मर्द दिनाच्या शुभेच्छा !

हे ही वाच भिडू.