शिवरायांच्या आरमाराचे खरे वारसदार व्हाईस अॅडमिरल मनोहर प्रल्हाद आवटी

मराठी रक्तात स्वराज्याचे प्रेम आणि ते टिकवण्यासाठी लागणारे शौर्य जन्मजातच असते. फक्त जमिनीवरच नव्हे तर समुद्रात देखील शूर मराठी तलवार परकीय आक्रमकांशी लढा देत होती. कान्होजी आंग्रेच्या साथीने शिवरायांनी मराठी सत्तेच आरमार उभारलं. या आरमाराचा डंका जंजीऱ्याच्या सिद्धी जोहर पासून ते पोर्तुगीज आणि इंग्लिश नेव्ही पर्यंत वाजला.

स्वातंत्र्यानंतर भारतभूमीचे रक्षण करण्यासाठी सदैव पुढे राहण्याची परंपरा मराठी तरुणांनी कायम राखली. सैन्याच्या तिन्ही दलात मराठी सैनिकांनी अनेक पराक्रम केले.

याच महान परंपरेचे शूर पाईक कान्होजी आंग्रेच्या आरमाराचा वारसा सांगणारे व्हाईस अॅडमिरल मनोहर प्रल्हाद आवटी.

सातारा जिल्ह्यातल्या फलटण नजीक विंचुर्णी या गावी त्यांचा जन्म झाला. ट्रेनिंग शीप डफरीन येथे प्रशिक्षण घेतल्यावर १९४५ साली तेव्हाच्या रॉयल इंडियन नेव्ही मध्ये त्यांची निवड झाली. इंग्लंड मधील डार्त्समाउथ आणि ग्रीनविच नेव्ही कॉलेजमध्ये त्यांना पुढच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले.

१९५० मध्ये ते सिग्नल कम्युनिकेशन मध्ये स्पेशलायझेशन मिळवून ते भारतात परत आले. भारतीय नौदलाच्या आयएनएस रणजित, दिल्ली, म्हैसूर, बेटवा, तीर अशा अनेक लढाऊ जहाजाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांनी पार पडली.

बांगलादेशाच्या स्वातंत्र्यानंतर सुरु झालेल्या १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात छेडले गेले. पहिल्यांदाच  दोन्ही देशाच्या नौदलानी मोठ्याक्षमतेने युद्धात भाग घेतला. अनेक लढाऊ नौका पाणबुड्या एकमेकाविरुद्ध ठाकल्या होत्या. पाकिस्तानला मदतीसाठी अमेरिकेचे सातवे आरमार हिंदी महासागरात उतरण्याची भीती होती. अशात भारतीय नौदलाने जे शौर्य दाखवले त्याला सीमा नव्हती.

अॅडमिरल आवटी तेव्हा आयएनएस कामोर्टा चे कप्तान होते.  याच कामोर्टा जहाजाला घेऊन अनेकदा शत्रू च्या गोटात जाऊन सागरी हल्ले करण्याचे धाडस त्यांनी दाखवले होते. बांगलादेश मधल्या बंदरात उभ्या असलेल्या पाकिस्तानी नौदलाचे अपरिमित नुकसान कामोर्टा जहाजाने केले. अॅडमिरल आवटी यांनी तीन पाकिस्तानी जहाज आपल्या ताब्यात घेतले. एका पाकिस्तानी पाणबुडी बरोबर त्यांच्या जहाजाचा सामना झाला.

या युद्धात त्यांनी धैर्याने लढा दिला. जोरदार प्रत्युत्तर हल्ला करून त्या पाकिस्तानी पाणबुडीला जलसमाधी मिळवून दिली. त्याकाळात बंगालच्या उपसागरावर कामोर्टा जहाजाची दहशत पाकनौदलामध्ये पसरली होती.

आवटी यांचा हा पराक्रम त्यांना सन्मानाचे वीरचक्र मिळवून दिला.

त्यांच्या विस्तृत कारकिर्दी मध्ये त्यांना पुण्याजवळच्या खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी चे प्रमुख,  नौदल मुख्यालयाचे मनुष्यबल प्रमुख, भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर अशी अनेक महत्वाची पदे भूषवण्याचा मान मिळाला. पण तरीही १९७१ च्या युद्धाचे वॉरहिरो हीच त्यांची कायमची ओळख राहिली.

१९८३ साली अॅडमिरल आवटी नौदलातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर देखील समुद्राची आणि त्यांची साथ सुटली नाही. मेरीटाईम हिस्ट्री सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची उभारणी करून ते आरमारी इतिहासाची पुढच्या पिढीला ओळख राहावी म्हणून प्रयत्नशील राहिले.

भारतीय आरमारी इतिहासातला सर्वात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणजे “सागरपरिक्रमा“. २००९ साली अॅडमिरल आवटी यांच्यापासून प्रेरणा घेऊन नौदलाचे कमांडर दिलीप दोंदे आणि कमांडर अभिलाष टोमी यांनी फक्त शिडाच्या जहाजाने  आयएनएस महादेई ने जगप्रदक्षिणा मारली. फक्त एवढेच नव्हे तर महिला अधिकाऱ्यांनी सुद्धा याच धरतीवर आयएनएस तरिणी या शिडाच्या जहाजाने जगप्रदक्षिणा मारून एक विक्रम प्रस्थापित केला. या दोन्ही प्रदक्षिणा आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.

आयएनएस महादेई च्या सागरपरीक्रमेवेळी सहकार्यांसमवेत व्हाईस अॅडमिरल आवटी

शेवटपर्यंत हाडाचे दर्यावर्दी राहिलेले अॅडमिरल आवटी हे वन्यजीव संरक्षणासाठी सुद्धा कार्यशील राहिले. निवृत्तीनंतर जेष्ठ पक्षीनिरीक्षक डॉ.सलीम अली यांच्या सोबत त्यांनी काम केले होते.

असा हा निसर्गाचा आणि समुद्राचा सच्चा रक्षक. त्यांनी काल वयाच्या ९१व्या वर्षी आपल्या जन्मगावी विंचुर्नी इथे शेवटचा श्वास घेतला.

हे ही वाच भिडू.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here