उटीच्या बागेत रंगला होता अलका कुबल आणि दिलीप प्रभावळकरांचा रोमान्स !!

दिलीप प्रभावळकर म्हटल की आठवतो दिसायला शांत सज्जन मध्यमवर्गीय पापभिरू लाजरा भोळा भाबडा मास्तुरे, सध्या निवृत्त.

याचा अर्थ असा नाही की त्यांनी असेच रोल केले आहेत. कधी चिमणराव तर कधी गंगाधर टिपरे कधी तात्या विंचू तर कधी खुद्द महात्मा गांधी. चौकट राजा सारख्या सिनेमात त्यांनी केलेला गतिमंद मुलाचा अभिनय तर खरोखर काळजाचा ठोका चुकवून जातो. पण कधी अॅक्शन करणारा गाणी म्हणणारा टिपिकल भारतीय हिरोचा रोल त्यांनी केलाच नाही.

एक डाव भुताचा पासून काही दिवसापूर्वी आलेल्या फास्टर फेणे पर्यंत त्यांचे कित्येक सिनेमे येऊन गेले, त्यांना कित्येक पुरस्कार मिळाले. पण ते कधीचं मोठ्या पडद्यावर रोमांटीक गाण्यावर नाचले नाहीत. फक्त एकदाच हा प्रयोग झाला होता.  खुद्द दिलीप प्रभावळकरांनी आपल्या ‘एका खेळीयाने’ या आत्मचरित्रात हा किस्सा सांगितलं आहे.

सालं होत १९८९.

झालं असं होतं की दादा कोंडकेनां पहिला ब्रेक देणारे, त्यांच्या सुरवातीच्या दोन सिनेमाचे दिग्दर्शक गोविंदराव कुलकर्णी एका प्रेमकथेवर सिनेमा बनवणार होते. सिनेमाच नाव होतं “झाकली मुठ सव्वा लाखाची.”  स्वप्न पाहण्याची सवय असणाऱ्या नायकाची कथा होती.

गोविंदरावांनी दिलीप प्रभावळकरना हिरो म्हणून काम करणार का विचारलं. आपण टिपिकल हिरोसारखे दिसत नाही हे प्रभावळकरांना देखील ठाऊक होतं. पण सिनेमाची कथा त्यांना आवडली होती शिवाय गोविंदरावांसारखा अनुभवी दिग्दर्शक आहे म्हटल्यावर डोळे झाकून त्यांनी सिनेमा साईन केला.

कुलकर्णींचा दिग्दर्शक म्हणून हा पंचविसावा सिनेमा होता. भारतातलं युरोप समजल्या जाणाऱ्या उटीमध्ये पहिल्यांदाच मराठी सिनेमाच्या गाण्यांचं शुटींग होणार होतं. यासाठी खास प्रवीण कुमार नावाच्या कोरिओग्राफरची नियुक्ती केली गेली होती.

जेव्हा दिलीप प्रभावळकरांना हे कळाल तेव्हा मात्र त्यांना घाम फुटला. ड्रीम सिक्वेन्स मध्ये गाणी होती. त्यांनी या पूर्वी काही नाटकामध्ये नाच केला होता पण हे नृत्य म्हणजे नायिकेबरोबर बागेतल्या झाडाभोवती फेर धरून नाचण होतं. प्रभावळकर म्हणतात,

“हे प्रकरणच वेगळ होतं! शम्मी कपूर, जितेंद्र वगैरे मंडळींच्या उज्ज्वल परंपरेतला हा एक गरीब प्रयत्न असणार होता.”

या सिनेमाची नायिका होती अलका कुबल. दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमाणेच तिचीही इमेज सालस, भोळी भाबडी, सुसंस्कारी भारतीय नारीची होती. पण तिला नाचण्याच अंग चांगलं होतं. तिला नाचाची सवय होती पण तिच्यासोबतचा नाच चाळीशीतल्या मास्तुरे दिलीप प्रभावळकरना कसा झेपेल हा प्रश्न खुद्द त्यानाही पडला होता. पण त्यांनी मनाची तयारी केली.

उटीपासून जवळच असलेल निलगिरीचं बन, दोडाबेट्टा शिखर, बोटॅनिकल गार्डन इथे ही गाणी चित्रित झाली. शिवाय मैने प्यार कियाच्या गाण्यामुळे फेमस झालेल्या उटीच्या तलावातल्या छोट्याशा रोमांटिक बोटी, कुन्नूरला जाणारी मिनी टॉय ट्रेन यांमध्येही गाण्याच्या काही कडव्यांच शुटींग झालं.

आपले लाडके मास्तुरे अलका कुबल सोबत थोडस आखडून का होईना नाचले. चांगली दोन चार गाणी बनली. हळूहळू प्रभावळकरांची भीड चेपली. पुढे पुढे तर ते दिलखुलास नृत्य करू लागले.

प्रवीण दवणेच्या गीतांना सतीश-प्रमोद या दुकलीने संगीत दिल होतं. लोकप्रियता मिळवू शकतील अशा चाली होत्या. शुटींग पाहायला आलेले मराठीचा गंधही नसलेले तमिळ तेलगु लोकसुद्धा या गाण्यांवर ठेका धरत होते. पण ही गाणी फेमस झालीचं नाहीत. कारण “झाकली मुठ सव्वा लाखाची” पूर्ण बनला पण काही कारणास्तव रिलीजचं झाला नाही. तो डब्ब्यात गेला.

दिलीप प्रभावळकर म्हणतात,

“चित्रपटाची मुठ झाकलेलीच राहिली आणि माझ नृत्यकौशल्यही !!”

पण गेल्या काही दिवसांपूर्वी हा सिनेमा युट्युबवर रिलीज झाला. म्हणजे काय त्याकाळातल्या लोकांना नाही पण आपल्याला आयाबायांना रडवणारी अलका कुबल आणि चिमणराव दिलीप प्रभावळकर यांचा लाडिक प्रेमाची नृत्ये असलेला झाकली मुठ सव्वा लाखाची बघायचा सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. नक्की बघा आणि कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया कळवा.

हे ही वाचा भिडू.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here