भिडू आजपासून अलिबाग से आया है क्या म्हणायचं नाही !!

काही म्हणी वाक्प्रचार शिव्या आपल्या रोजच्या लाइफच्या पार्ट बनलेल्या असतात. जर आम्ही तुम्हाल सांगितलं की आज एका म्हणीच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टात केस झालीय तर तुम्ही काय म्हणालं?,

“अरे भिडू तू अलिबाग से आयेला है क्या?”

एक्जॅटली आम्हाला पण तसच वाटलं. गरीब बिचारी म्हण तिने कोणाचं असं काय घोडं मारलंय? पण शोध घेतल्यावर कळाल हे खरोखर घडलंय. ती म्हण आहे  हीच आपली नेहमीची, ‘अलिबाग से आया है क्या?’

येड्यासारखं वागणाऱ्याला आपण सर्रास हेच शब्द वापरतो. पण अस म्हटल तर जेल मध्ये जाण्याची वेळ येऊ शकते?? आईच्या गावात. नेमकं प्रकरण आहे तरी काय जाणून घेऊ.

तर झालंय असं अलिबाग जवळच्या एका छोट्या गावाचे रहिवाशी श्री.राजेंद्र ठाकूर यांचं सारखं सारखं अलिबाग से आया है क्या अलिबाग से आया है क्या हे ऐकून एक दिवस डोकं सटकल. त्यांच्या भावना दुखावल्या होत्या. उठ सूट कोण पण येतोय आणि अलिबाग से आया है क्या म्हणून अप्रत्यक्षरीत्या अलिबागवासीयांचा अपमान करतोय.

आणि एकदा मर्द मराठी मावळा पेटला की मग कोणाच्या पप्पाला पण ऐकत नाही. 

डायरेक्ट हाय कोर्टात केस दाखल केली. तीही महाराष्ट्र सरकार, सेन्सॉर बोर्ड ऑफ इंडिया आणि केंद्रीय सांस्कृतिक मंडळाविरुद्ध.

राजेंद्र ठाकूर यांचं म्हणण आहे की अलिबाग ही शूरवीरांची भूमी आहे. मराठा नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे, पद्मश्री विजेते शिल्पकार विनायक करमकर, ऑपरेशन ब्लू स्टारमधील जनरल ए. एस. वैद्य, पद्मभूषण विजेते पांडुरंग शास्त्री आठवले, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अशा सुपुत्रांची भूमी आहे.

आणि अशा भूमीला वेड्यांची भूमी ठरवण्याचा हा प्रयत्न आहे. तो हाणून पडणे गरजेचे आहे.

आपल्याला तर राजेंद्र ठाकूर यांचं म्हणण पटलं. पण ही म्हण आली तर कुठून? अलिबाग से आया है क्या या म्हणी मागचा इतिहास सुद्धा आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला.

काही जण म्हणायचे की अलिबाग मध्ये वेड्यांचे मोठे हॉस्पिटल आहे म्हणून येड्यासारखे वागणाऱ्याला अलिबागसे आया है क्या असं विचारलं जात. पण अभ्यासांती असं लक्षात आलं की अलिबाग मध्ये वेड्यांचे हॉस्पिटल नाही. मग काय झालं असेल ज्यामुळे अलिबाग ला ही उपाधी चिकटली?

यासाठी आम्ही अलिबागच्या इतिहासात भूगोलात शिरलो.

अलिबाग हे रायगड जिल्ह्यातलं एक छोटसं गाव. मुंबईपासून अंतर साधारण १२० किमी. समुद्रमार्गे फेरीने गेलं तर आणखीन जवळ. जेव्हा मुंबई आकार घेत होती तेव्हा अलिबागची भोळीभाबडी जनता चाकरीच्या शोधात मुंबईला येत होती. इथल्या हायफाय इंग्लिश फिन्ग्लीश झाडनाऱ्यांच्या समोर त्यांची संभावना घाटी येडे अशी केली जायची. यातूनच अलिबाग से आया है क्या ही म्हण रूढ झाली असं म्हणतात.

हिंदी सिनेमामध्ये कादर खान यांनी ऐंशीच्या दशकात बम्बैय्या भाषा फेमस केली. यात हमखास डायलॉग असायचा,

“तेरेकु क्या अपुन अलिबाग से आयेला लगता है क्या?”

 खर तर अलिबाग ची ओळख इथले सुंदर बीच, कोकणातील निसर्गसौंदर्य, अस्सल रानमेवा  यामुळे आहे पण गंमती गंमतीतून लोकांनी अलिबागला वेडेपनाशी जोडून टाकलं. आणि हाच अलिबागच्या लोकांना प्रॉब्लेम आहे. 

राजेंद्र ठाकूर यांनी दाखल केलेल्या याचिकेत या वाक्याचा वापर सिनेमा, नाटके, टीव्ही मालिका, सार्वजनिक सादरीकरणे, स्टँडअप कॉमेडी इत्यादींमध्ये करण्यास बंदी घालावी, अशी विनंती केली आहे. अॅड. रघुराज देशपांडे यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर नुकतीच प्राथमिक सुनावणी झाली.

गेली कित्येक वर्ष हा अपमान झाला पण आता न्यायालयाने हा आदेश दिला, तर या वाक्याच्या वापराला चाप बसण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास ठाकूर यांनी आहे. 

तर भिडू लोग तुम्ही पण या म्हणीचा वापर करताना विचार करा. आपल्याच भाऊ बंधूंचा आपल्याच मातीचा तअपमान आपल्या शब्दातून होऊ नये.

हे ही वाच भिडू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here