कितीही अपयशीपणाचा शिक्का मारा पण वनडेत कुंबळे, श्रीनाथच्या खालोखाल विकेटा आगरकरच्या नावावर आहेत.

अजित भालचंद्र आगरकर. गोराघारा वर्ण. पाच फुट पाच इंच उंची. सडपातळ बांधा. भारतीय  क्रिकेट टीम मध्ये जलदगती गोलंदाज.

आगरकरची वधुवरसूचक मंडळासाठीची जाहिरात अशीच असेल नाही??? पण क्रिकेट विश्वात हा प्रोफाईल काही जमणारा नव्हता. साडेपाच फुट उंचीचा काटकुळा फास्टर बॉलर बघून पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटर हसून पडायचे बाकी होते. पण पहिल्याच सामन्यात आगरकरने अॅडम गिलख्रिस्टला आउट काढलं आणि ऑस्ट्रेलियन फॅन्सची बोलती बंद केली.

सचिनसारखाच रमाकांत आचरेकरांचा शिष्य. त्याच्या वडीलांना त्याला फलंदाज बनवायचं होत. शारदाश्रम शाळेतून प्रतिष्ठेची हॅरीस शिल्ड स्पर्धा आपल्या बॅटिंगने गाजवली. शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर आचरेकर गुरुजींचा नेक्स्ट सचिन म्हणून त्याच्याबद्दल चर्चा  सुरु झाली होती. 

त्याच काळात त्याची नेटमधली बॉलिंग बघून कोणीतरी त्याला आॅल राउंडर हो म्हणून सांगितलं. मुंबई रणजी संघात बॅट्समन पेक्षा आॅल राउंडर म्हणून लवकर जागा मिळण्याची शक्यता होती आणि घडल ही तसंच. मुंबईकडून खेळताना तो १४०-१५०किमीच्या वेगाने सहज बॉल टाकत होता.लवकरच त्याला भारताच्या टीममध्ये निवडण्यात आलं.

१ एप्रिल १९९८ रोजी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने डेब्यू केला.

सुरवातीपासून आगरकरची चर्चा होती. त्याचा वेग चांगला होता. त्यापेक्षाही तो बॉल दोन्ही बाजूनी जबरदस्त स्विंग करत होता. पहिल्यांदाच भारतातला कोणी फास्टर बॉलर पाकिस्तानी अस्त्र म्हणजेच “रिव्हर्स स्विंग” त्यांच्यासारख्याच परिणामकारकरित्या वापरत होता.

अवघ्या तेवीस वनडे मॅचमध्ये आगरकरने पन्नास विकेटा घेऊन डेनिस लिलीचा विश्वविक्रम मोडून काढला.

सगळ्यांना वाटलं की भारताचा जलदगती बॉलरचा शोध संपला. त्याची बॅटीग पण चांगली होती. एकदा तर सातव्या नंबरला येऊन त्याने पंचवीस चेंडूत पासष्ठ रना चोपल्या. भारतातर्फे फास्टेस्ट फिफ्टीचा तो रेकॉर्ड होता. त्याकाळच्या मानाने फिल्डिंग सुद्धा बाप करायचा.

आगरकर हा नेक्स्ट सचिन नाही तरी कमीत कमी पुढचा कपिल देवसारखा आॅल राऊंडर तरी होईल असं मिडियाने डिक्लेअर केलं.

पण भारतीय फास्ट बॉलरला जो दुखापतीचा शाप आहे त्याने आगरकरला ही गाठलं. भर उन्हात पाटा पीचवर दिवसभर सलग बॉलिंग करणे हे दुखापतीना निमंत्रणच होते. आगरकरचे टीममध्ये दर्शन हळूहळू कमी झालं. याच काळात गांगुलीची नवी टीम उभी राहत होती. झहीर खान नेहरा ही नव्या दमाचे फास्टर बॉलर टीम मध्ये आले. आगरकरचे टीममधले स्थान डळमळलं.

ज्या बॅटींगबद्दल आगरकरला आत्मविश्वास होता त्यातही तो फेल जाऊ लागला. एकदा तर सलग सात इनिंग मध्ये डकवर आउट होऊन अनोखा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.

विकेट टेकिंग बॉलर म्हणून तो प्रसिद्ध होता पण तो रनाही खूप द्यायचा. झहीर खान ,नेहरा, श्रीशांत, आर पी सिंग,इरफान पठाण या बॉलरच्या समोर तो टिकाव धरु शकला नाही. आगरकरपर्व जितक्या वेगाने भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर आले तितक्याच वेगाने धूसर होत गायब झाले.

सडपातळ कमी उंचीचा आगरकर दिसायचा शांत पण एकदा मात्र पाकिस्तान दौऱ्यामध्ये त्याचं भांडण खूप गाजलं होतं.

२००६ सालचा भारताचा पाकिस्तान दौरा होता. लाहोरमध्ये मॅच होती. त्या सामन्यापूर्वी तिथल्या खेळपट्टी बद्दल बरीच उलटसुलट चर्चा होती. पाकिस्तानचे चीफ क्युरेटर आगा जाहिद हे स्वभावाने खूप वाकडे होते. पीचचा अंदाज ते कोणाला लागू देत नव्हते.

मॅचच्या अगोदर नेटमध्ये प्रॅक्टीस सेशन सुरु होतं. आगरकर मुख्य खेळपट्टी कशी आहे हे पाहण्यासाठी पीच जवळ गेला. पण तिथे काम करत असणाऱ्या  ग्राउंडस्टाफने त्याला पीचवरच्या कव्हरला देखील हात लावण्यास मनाई केली. अपमानित होऊन आगरकर परत नेट मध्ये आला. आल्यावर तो कोणाला काही बोलला नाही.

थोडावेळ बॉलिंग केल्यावर त्याने बॅट हातात घेतली. पण सुरवातीपासून त्याने लंबे लंबे शॉट मारायला सुरवात केली. सगळे बॉल नेटमधून मुख्य खेळपट्टी कडे जात होते. एक बॉल तर जोरात पिचवर ग्राउंडस्टाफच्या अंगावर जाऊन आदळला. ते पाहून चीफ क्युरेटर आगा जाहिद तावातावाने भांडायला आले. आगरकरला बॅटिंग करण्यास ते मनाई करू लागले.

आगरकर रागाने लालबुंद झाला.

दोघांच्या हमरीतुमरी झाली. शिवीगाळवरून मामला हातघाईवर आला. आगा जाहिदला मारायसाठी आगरकरने बॅट उगारली. शेवटी सचिनने त्याला अडवले. कसे तर करून त्याला शांत केले. पाकिस्तानी क्युरेटरला स्लेजिंग करणारा तो पहिला भारतीय बॉलर ठरला.

कोणी कितीही अपयशीपणाचा शिक्का मारो वनडे मध्ये कुंबळे, श्रीनाथच्या खालोखाल विकेटा (२८८) आगरकरच्या नावावर आहेत. झहीर, नेहरा वगैरे सातत्यपूर्ण होते तरी त्यांना आगरकरच्या जवळ पोहचता आलं नाही. आगरकर खरोखर अपयशी होता की त्याच्याबद्दलच्या लोकांच्या अपेक्षा जास्त होत्या माहित नाही.

भले त्याला सचिन बनता आलं नाही पण सचिनला अख्ख्या आयुष्यात  क्रिकेटचा मक्का लॉर्डसवर शतक मारता  आलं नाही ते अजित आगरकरने करून दाखवलं होतं. 

हे ही वाचा भिडू.

3 COMMENTS

  1. अजित आगरकर अपयशी कधीच नव्हता तो भारताचा यशस्वी गोलंदाज होता पण त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा आणि 2003च्या world cup मध्ये गांगुली ने त्याला संधी न देणे हे त्याच्या अस्त होण्याची कारणं आहेत…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here