बांगलादेश घाबरला असेल, त्यांना शेवटच्या बॉलला सिक्स मारून संपवणारा आज टीम मध्ये आलाय.

इंग्लडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कप सुरु झालंय . काही दिवसापूर्वी जेव्हा भारतीय संघाची घोषणा झाली होती  तेव्हा नेहमीप्रमाणे अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर जशा प्रतिक्रिया येतात तशा प्रतिक्रिया आल्या. काही जण खुश झाले, काही जण निराश झाले. जुन्या खेळाडूंनी काही तरी खुसपट काढण्याच आपल कर्तव्य पार पाडलं.

चर्चा सुरु झाली दिनेश कार्तिक ला टीममध्ये का घेतलंय?

इंग्लंड मध्ये होणाऱ्या या वर्ल्ड कप मध्ये भारतीय टीमचा विकेटकिपर आहे महेंद्रसिंग धोनी. तो जर चुकून इन्जुअर्ड झाला तर एवढ्या लांब किपर कुठन आणायचा यासाठी बॅकअप ऑप्शन विकेटकिपर न्यायचं ठरलं.

या यादीत दोन नावं होती. ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक.

ऋषभ पंत भारताचा कसोटी टीमचा रेग्युलर किपर होता तरी निवड समितीने दिनेश कार्तिकला संधी दिली. पुढे योगायोगाने शिखर धवन जखमी झाल्याने ऋषभ पंत देखील टीममध्ये आला. पण गेली काही सामने दिनेश कार्तिकला मुख्य टीममध्ये खेळवल नव्हतं. मग त्याला का बरं घेतलं असेल?

यासाठी आपल्याला जावे लागेल मार्च २०१८ मध्ये. तेव्हा श्रीलंकेमध्ये निधास कप सुरु होता. भारत, श्रीलंका, बांगलादेश या ट्वेन्टी ट्वेन्टीसिरीजमध्ये एकमेकांशी लढत होते. 

भारताचे मुख्य खेळाडू म्हणजे  कप्तान विराट कोहली, धोनी वगैरेना विश्रांती दिली होती. यावेळी रोहित शर्मा कॅप्टन होता. निवडसमितीला मेन टीम सोडून आणखी कोण कोण चांगलं खेळू शकत हे बघायचं होत. यात मनिष पांडे, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, विजय शंकर असे अनेक जण होते. प्रत्येकाला माहित होतं जर टीममध्ये जागा बनवायची आहे तर हा बेस्ट चान्स आहे.

पहिलाच सामना भारताने श्रीलंकेविरुद्ध हरला. प्रत्येक मॅचनंतर काही बदल करून बघितले जात होते. जे लोक फॉर्म दाखवत नाहीत त्यांना डच्चू दिल जात होतं. नसल्यामुळे कशीबशी भारतीय टीम फायनल मध्ये पोहचली. तेव्हा आपल्या विरुद्ध होती बांगलादेश. त्यांनी लंकेला हरवून नागीण डान्स करत फायनल मध्ये प्रवेश केला होता.

रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. बांगलादेशने वीस ओव्हर मध्ये  १६६ धावा बनवल्या. त्यांच्या सब्बीर रहमानने चांगली बॅटींग केली होती. भारताची मदार शिखर धवन आणि रोहित शर्मा या अनुभवी सलामी जोडीवर होती. 

पण शिखर धवन स्वस्तात आउट झाला. त्याच्या पाठोपाठ आलेला रैना तर डकवर माघारी परतला. केएलराहुल ला घेऊन रोहित शर्माने डाव सांभाळला. संघाच्या ८३ धावा झाल्या असताना राहुल आउट झाला आणि थोड्याच वेळात आपली फिफ्टी पूर्णं केलेला रोहितसुद्धा नजमुल इस्लामच्या जाळ्यात सापडला.

हातातली मॅच अवघड होत चालली होती. रोहित शर्मा पव्हेलीयनमध्ये परतला. त्याच्यानंतर मनिष पांडे मैदानात उतरला होता. रोहित ड्रेसिंग रूम मध्ये जाणार तेवढ्यात त्याला तिथे बसलेला दिनेश कार्तिक दिसला, त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर कळत होतं हा एकदम रागात आहे आणि कधी पण फुटेल. रोहितला माहित होत याला नेमक काय झालंय.

झालं असं होत की पूर्ण सिरीज मध्ये दिनेश कार्तिकला रोहितने खालच्या नंबरवर खेळायला पाठवलं होतं. त्याला विशेष चान्सचं मिळाला नव्हता. आज पण चार विकेट झाल्यातरी त्याला पाठवण्याची लक्षणं दिसत नव्हती. पांडे, विजय शंकर यांना कार्तिकच्या अगोदर पाठवलं होत. तो लईचं चिडला होता. रोहित शर्मा त्याला म्हणाला,

“उनके एक्पेरीय्न्स्ड बॉलर्स अच्छी बॉलिंग डाल रहे है. तू टीमका सबसे सिनियर प्लेअर है. डेथ ओव्हर्स मै सिर्फ तूही उनको खेल पायेगा. थोडी देर रुक.  “

कार्तिकला काही ते पटलं नाही. त्याचा चेहरा एकदम लाल झालेला. रोहित शर्मा ला लक्षात आले आता याच्याबरोबर वाद करण्यात काही पोईंट नाही. उगीच भांडणं होणार. तो सरळ आत शॉवर घ्यायला गेला. काही वेळात मनिष पांडे आउट झाला. आता शेवटच्या दोन ओव्हर शिल्लक होत्या आणि टार्गेट होत ३४. भारताला मच अवघड झाली होती.

इथ धुमसत असलेला कार्तिक  हातात बॅट आणि डोक्यात काही तरी निश्चय घेऊन मैदानात उतरला होता. आल्या आल्या पहिल्याच बॉलला त्याने जबरदस्त सिक्स मारला. पुढच्या बॉलला बाउन्ड्री मारली आणि तिसऱ्या बॉलला परत सिक्स. तीन चेंडूत १६ धावा निघाल्या होत्या. पुढचा बॉल डॉट, मग दोन रन आणि परत शेवटच्या बॉलला सिक्स.

सगळ्यांना कळत होत कार्तिक पेटलाय. 

शेवटच्या ओव्हरला विजय शंकर स्ट्राईकला आला. सौम्या सरकार बॉलिंगला आला. त्याच्या पुढे विजय शंकरला विशेष काही करता आलं नाही. फक्त एकचं चौकार मारला आणि ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर तो आउट झाला. आता मॅचचं फक्त शेवटचा बॉल शिल्लक होता आणि भारताला जिंकायला पाच धावा पाहिजे होत्या.

नशिबान दिनेश कार्तिक स्ट्राईकवर आला होता. आता या बॉलवर सिक्स मारण्याशिवाय कोणताही पर्याय त्याच्याजवळ नव्हता. भारताला शेवटच्या बॉलवर जावेद मियांदादने सिक्स मारून हरवलेलं याच्या जखमा भरून आलेल्या नव्हत्या. कार्तिकलाही तसच काही करून दाखवायला लागणार होतं. पूर्ण देश सुईच्या टोकावर बसला होता. अनेकांची बिपी वाढली होती. काहीही झालं तरी बांगलादेश सारख्या सध्या टीमकडून एवढ्या अटीतटीच्या सामन्यात हरण्याचा अपमान कोणालाही सहन होणारा नव्हता.

सौम्य सरकारने रनअप घेतली. कार्तिकने बॅट उचलून सिक्स ची तयारी केली. बॉलरला पण माहित होते की काहीही झालं तरी कार्तिक उचलणार. त्याने मुद्दामहून बॉल ऑफसाईडच्या बराच बाहेर टाकला. पण कार्तिकने तोही बॉल टोलवला. बॉल काही उंच उडाला नाही, जमिनीशी समांतर एखाद्या बुलेट प्रमाणे बॉल सीमापार गेला.  

पूर्ण मैदानात जल्लोष झाला. असा कानात धूर करणारा सामना खूप वर्षात झाला नव्हता. रोहित शर्माने धावत जाऊन कार्तिकला मिठी मारली.

या सिक्सरमुळे कार्तिकची टीममधली जागा फिक्स झाली होती.

भारताचे वर्ल्ड कपचे गेले दोन सामने बघितलं तर भारत डेथ ओव्हरमध्येच मार खात आहे. भारताचा ऑल टाईम सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळखला जाणारा धोनी त्याच्या क्षमतेला साजीशी कामगिरी करत नाही आहे. त्याला बाहेर काढा म्हणून मागणी होत आहे. पण कोहलीने त्याला पाठिंबाचं दिला. पण आजच्या बांगलादेशच्या सामन्याविरुद्ध मात्र त्याच्या जोडीला दिनेश कार्तिकला देखील संधी दिलीय. बघू तो काही चमत्कार करतोय का ते?

हे ही वाच भिडू.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here