अर्धे हिंदू आणि अर्धे मुसलमान असणारे हुसैनी ब्राम्हण.

धर्माच्या नावावर लोकांना एकमेकांमध्ये लढवून त्यावर आपल्या राजकीय स्वार्थाच्या पोळ्या भाजून घेणारे पायलीला पसाभर राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात असताना धार्मिक सौहार्दाची मिसाल बनून समोर येणाऱ्या अनेक घटना देखील आपल्या आजूबाजूलाच घडत असतात.

इस्लाम धर्मियांचा मुहर्रम महिना देखील असाच हिंदू-मुस्लीम एकतेचा आणि मानवतेच्या उदात्त मूल्याची शिकवण देणारा. ज्या इमाम हुसैनच्या बलिदानाच्या स्मरणार्थ मुहर्रम साजरा केला जातो, त्या हुसैनबद्दल राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी म्हणून ठेवलंय की,

“मला या गोष्टीत तिळमात्र शंका नाही की, इस्लाम धर्माचा जो जगभरात प्रसार झाला तो इस्लामी योद्ध्यांच्या तलवारीच्या जीवावर नाही तर इमाम हुसैनच्या सर्वोच्च बलिदानामुळे झाला”

पवित्र मुहर्रममधील दहावा दिवस हा इराकच्या भूमीवर झालेल्या कर्बालाच्या लढाईत इमाम हुसैन इब्न अली यांनी आपल्या कुटुंबातील ७२ जणांसह दत्त कुटुंबातील ७ पुत्रांनी क्रूरकर्मा याजीद विरोधात लढताना दिलेल्या बलिदानाची आठवण काढण्याचा दिवस.

कर्बालाची लढाई फक्त इमाम हुसैन यांनीच नाही तर इमाम हुसैन यांच्या मदतीला गेलेल्या हिंदू ब्राम्हणांनी देखील लढली होती आणि मानवतेच्या महान मूल्याच्या संरक्षणार्थ ते इमाम हुसैन यांच्याबरोबर या लढाईत शहीद झाले होते.

आपल्यापैकी अनेकांना कल्पना नसेल पण या लढाईत लढलेल्या दत्त कुटुंबातील ब्राम्हणांचे वंशज आज देखील आपल्यात आहेत, जे स्वतःला अतिशय अभिमानाने ‘हुसैनी ब्राम्हण’ म्हणवून  घेतात.

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते आणि माजी खासदार सुनील दत्त हे देखील या हुसैनी ब्राम्हनांचेच वंशज होते. सुनील दत्त यांनीच एका मुलाखतीत ही माहिती दिली होती. शिवाय हुसैनी ब्राह्मण समाज ज्यांना अभिमानाने आठवणीत ठेवतो त्या राहीब दत्त यांच्या आठवणीत सुनील दत्त यांनी एक  शेर सुद्धा सादर केला होता. तो शेर म्हणजे,

‘वाह दत्त सुलतान ! 

हिंदू का धरम, मुसलमान का इमान

आधा हिंदू, आधा मुसलमान ! 

महाभारतातील अश्वत्थामाचे वंशज.

पारंपारिक मान्यतांनुसार हुसैनी ब्राह्मण हे महाभारतातील अश्वत्थामाचे वंशज मानले जातात. असं मानलं जातं की महाभारताच्या लढाईत फक्त अश्वत्थामा जिवंत वाचला होता, जो पुढे इराकमध्ये जाऊन स्थायिक झाला. त्याचे इराकमधील वंशज म्हणजे हा ब्राह्मण समुदाय. जो ‘मोहियाल ब्राम्हण’ म्हणून देखील ओळखला जातो.

इराकमधील या ब्राह्मणांचे राजे होते राहीब सिद्ध दत्त. मान्यता अशी आहे की त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती, परंतु इमाम हुसैन यांच्या आशीर्वादाने त्यांना ७ पुत्र झाले, जे पुढे कर्बालाच्या लढाईनंतर इमाम हुसेन यांच्यासाठी शहीद झाले.

कर्बालाची लढाई आणि दत्त कुटुंबियांचं बलिदान.

इमाम हुसैन आणि याजीद यांच्यामध्ये कर्बालाची लढाई झाली. या लढाईमध्ये हुसैनने आपल्या पित्यासाठी आणि इस्लामसाठी फक्त आपल्या ७२ कुटुंबियांच्या जीवावर याजीदच्या महाकाय सैन्यासमोर आत्मसमर्पण न करता लढण्याचा निर्णय घेतला होता.

या लढाईत जेव्हा हुसैनचा पराभव झाला त्यावेळी याजीदचे सैन्य इमाम हुसैन यांचे धड घेऊन जात असल्याची बातमी जेव्हा राहीब दत्त यांना समजली त्यावेळी त्यांनी या सैन्याकडून इमाम यांचं धड मिळवलं. ही गोष्ट जेव्हा याजीदच्या सैन्याच्या लक्षात आली, त्यावेळी सैन्याने राहीब दत्त यांचा पाठलाग केला.

राहीब दत्त आपल्या सैन्यासोबत निवांतपणे आराम करत असताना याजीदच्या सैन्याने त्यांना गाठलं आणि हुसैनचं धड आपल्या हवाली करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावेळी राहीब दत्त यांनी हुसैनचं धड देण्याऐवजी आपल्या एका मुलाचं धड दिलं.

ही गोष्ट याजीदच्या सैन्याच्या लक्षात आली आणि त्यांनी परत एकदा धड मागवलं. राहीब यांनी पुन्हा तेच केलं आणि अशाप्रकारे एक-एक करून आपल्या ७ मुलांचे धड राहीब यांनी याजीदच्या सैन्याला दिले. राहीब दत्त यांचे हुसैनच्या आशीर्वादाने झालेले ७ मुले हुसैनसाठीच शहीद झाले.

हुसैनच्या मृत्यूचा घेतला बदला 

एवढं होऊन देखील याजीदचं सैन्य ऐकत नाही हे लक्षात आल्यानंतर राहीब दत्त यांनी हुसैनच्या सैन्यासोबत युद्ध लढलं आणि हुसैनच्या हत्येचा बदला घेतला. त्यानंतर राहीब दत्त यांनी युद्धात शहीद झालेला हुसैन आणि आपली ७ मुले यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून अनेक दोह्यांचं पठन केलं होतं.

तेव्हाचपासून इस्लाम धर्मीय आणि मोहियाल ब्राह्मण समाज मुहर्रमच्या दिवशी या दोह्यांचं पठन करतात. ही परंपरा आजतागायत सुरु आहे. इस्लाम धर्मियांबरोबरच मोहियाल ब्राह्मण समाज देखील मुहर्रम साजरा करतो. आजघडीला पाकिस्तान दिल्ली, महाराष्ट्रातील काही भाग आणि अरब देशांमध्ये हुसैनी ब्राह्मण समाज आढळून येतो. त्यांच्या अनेक प्रथा आणि परंपरांवर इस्लामचा प्रभाव बघायला मिळतो.

‘हुसैनी ब्राह्मण’ समुदाय हा देशातील गंगा-जमनी तहजीबला अधिक बळकटी देणारा दुवा आहे, पण दुर्दैवाने आपल्यापैकी अनेकांना याविषयी कसलीच माहिती नाही. त्यामुळेच आजच्या धार्मिक विद्वेषाच्या वातावरणात ‘हिंदू-मुस्लीम’ एकतेची ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न.

हे ही वाच भिडू