भारताचे असे एक पंतप्रधान, जे आयुष्यभर भाड्याच्या घरात राहिले..!

साधं राहणीमान असणारे पंतप्रधान म्हणलं की डोळ्यासमोर येतात ते लालबहादूर शास्त्री. निर्विवादपणे लालबहादूर शास्त्री याचं राहणीमानं अगदी साधच होतं पण त्यांच्यासारखेच अजून एक पंतप्रधान भारताला लाभले. दुर्देवाने त्यांची कारकिर्द कार्यवाहक पंतप्रधानाची असल्याने त्यांचे किस्से त्यांच्या कथा आपणाला खूप कमी वाचायला मिळाल्या असतील. 

गुलजारीलाल नंदा हे नाव आठवतय. MPSC,UPSC करणाऱ्या मुलांना देखील गुलजारीलाल नंदा म्हणल्यानंतर कोणाच्या अगोदर आणि कोणाच्या नंतर किती दिवस कार्यवाहक पंतप्रधान होते या पलिकडे त्यांची माहिती नसावी. 

गुलजारीलाल नंदा एक सरळ साध व्यक्तिमत्व होतं ज्यांनी फक्त आणि फक्त आपल्या जबाबदाऱ्या संभाळल्या. पैशाचा मोह नाही कि सत्तेचा मोह नाही. कदाचित राजकारणाच्या पारदर्शक काळात देखील त्यांना जमवून घेणं अनेकांना जड जात होतं. 

शेवटच्या दिवसांमध्ये पेन्शनसाठी अर्ज केला होता. 

गुलजारीलाल नंदा यांनी आपल्या शेवटच्या काळात स्वातंत्रसैनिकांची पेन्शन मिळावी यासाठी अर्ज केला होता. त्याचा प्रामाणिकपणा इतका टोकाचा होता की, आपली मुलं नरिंदर नंदा आणि महाराज कृषेन नंदा यांच्याकडे पैसे मागनं देखील त्यांना चुकिचं वाटत होतं. पण दोन वेळच्या जेवणाचा देखील प्रश्न या माजी कार्यवाहक पंतप्रधानापुढे निर्माण झाला होता.

नुसते कार्यवाहक पंतप्रधान म्हणूनच नाही तर ते भारताचे गृहमंत्री देखील राहिले आहेत. १९ ऑगस्ट १९६३ ते १४ नोव्हेंबर १९६६ दरम्यान ते भारताचे गृहमंत्री होते. 

पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर २७ मे १९६४ रोजी नंदा यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती त्यानंतर  ताश्कंदमध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर ११ जानेवारी १९६६ रोजी पुन्हा त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. दोन्ही वेळा त्यांनी १३, १३ दिवस भारताचा कार्यवाहक पंतप्रधान म्हणून कारभार सांभाळला होता. 

भारतातून भष्ट्राचार कायमचा बंद व्हावा म्हणून ते प्रयत्न करत राहिले त्यांनी १९७८ साली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की मी एका कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्यावर कारवाई करण्याच्या दिशेनं पाउल टाकत होतो. तेव्हा मला विरोध करण्यात आला. पुढे ते जनता पक्ष सत्तेवर येताच म्हणाले होते की, सत्ताधाऱ्यांनी आपआपली खाजगी संपत्ती वेळीच जाहिर करावी. ते असही म्हणाले होते की, भष्ट्राचार हा डाळीच्या आमटीत असणाऱ्या मीठासारखां असतो पण दुर्देवाने इथे तर संपुर्ण डाळ मिठापासूनच बनली आहे.

हे ही वाचा.