खताळ नसते तर आज देशभरातल्या शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स भरावा लागला असता. 

संपुर्ण देशभरातील मुख्यमंत्र्यांची एक परिषद दिल्ली येथे बोलवण्यात आली होती. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित राहू शकत नसल्याने तत्कालीन मंत्री बी.जे.खताळ या परिषदेसाठी उपस्थित होते. याठिकाणी शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स लागू करावा का यासंबधीत चर्चा चालू होती. खताळांनी त्याला विरोध केला.

फक्त विरोधच करून ते थांबले नाहीत तर इन्कम टॅक्सला पर्याय म्हणून शेतसाऱ्याची पद्धती त्यांनी सुचवली. गावच्या तलाठ्याकडून पिकांची नोंद करून त्यानुसार शेतसारा भरण्याचा पर्याय पुढे करण्यात आला. त्याला सर्वानुमते संमती देण्यात आली. 

महाराष्ट्राच्या राजकारणात तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बी.जे. खताळ यांच १६ सप्टेंबर रोजी निधन झालं.

ते २१ वर्ष आमदार होते. पैकी १५ वर्ष त्यांनी राज्यातल्या महत्वाची खाती संभाळली. मध्यंतरी राजकारणातून संन्यास कधी घ्यावा यावर बोलताना एक मंत्री म्हणाले होते कुठल्याही नेत्यासाठी ६० नंतरचा काळ हा तरुणपणाचा असतो. या वयातच तो उंचीवर पोहचू शकतो. खताळ राजकारणात राहिले असते तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते.

पण आपल्या कृतीतून आदर्श निर्माण करणाऱ्या खताळांनी वयाच्या ६५ व्या वर्षी राजकारणातून संन्यास घेतला. 

नगर जिल्ह्यातल्या धांदरफळचे ते सुपूत्र. २६ मार्च १९१९ हि त्यांची जन्मतारीख. नुकतीच त्यांनी वयाची शंभरी पुर्ण केली होती. खताळांच घर हे परगणादाराचं. पण जूनी सुबत्ता गेलेली. त्यांचे आई वडिल शिकलेले होते. त्यातून खताळ पण शिकले. मॅट्रिकपर्यन्तच शिक्षण पुर्ण करुन ते चार पाच रुपये गोळा करून बडोद्याला बोर्डिंग स्कूलला गेले. त्यांच्या वडिलांची इच्छा पोराने पाटीलकी करावी अशी होती. पण खताळांनी त्याला विरोध केला. बडोद्याच्या बोर्डिंग स्कुलमध्ये त्यांना राजारामबापू पाटील, उत्तमराव पाटील, अण्णासाहेब शिंदे, कृष्णराव धुळप यांच्यासारखे सहकारी भेटले. इथेच विचारांची बैठक पक्की होत गेली. 

१९४२ सालात पुण्यात येवून त्यांना आय.एल.एस लॉ कॉलेजला वकिलीसाठी प्रवेश घेतला.

वकिलीचं शिक्षण पुर्ण झालं आणि ठरल्यासारखी स्वारी पुन्हा गावी परतली. त्या काळात गांधीवादी विचारांनी ते भारावून गेले. सोबत कम्युनिस्ट विचारसरणी देखील जवळची वाटायची. त्यांना विचारलं कि ते म्हणायचे, त्या अल्लड वयात आपल्या न्यायासाठी भांडाव लागतं हे मार्क्सनेच शिकवलं. भूमीगत राहून त्यांनी क्रांन्तीकार्यात स्वत:ला झोकून दिलं. त्याच दरम्यान वकिली देखील चालू होती ४५ ते ५१ हा काळ एक वकिल म्हणून त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याला भरारी देणारा ठरला.

त्या काळात फौजदारी वकिल म्हणून त्यांच नाव राज्यभर होतं. त्यांची फी हजारांच्या घरात होती. १९४५ ते १९५१ काळात हि रक्कम म्हणजे आज लाखोंच्या पुढे जाईल. असा नावलौकिक त्यांनी मिळवला होता. स्वातंत्र मिळाल्यानंतर कम्युनिस्टांनी हे स्वातंत्र नाहीच अशी आरोळी ठोकली आणि खताळांवर असणारा कम्युनिस्ट पक्षाच्या विचारांचा प्रभाव कमी होत गेला. सामाजिक व्यासपीठावरील नेतृत्त्व आणि नावाजलेले वकिल अशा दुहेरी भूमिकेत ते होते. 

१९५२ मध्ये धुळे येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

त्याच वेळी कॉंग्रेस पक्षामार्फत त्यांनी निवडणुक लढवण्यास सांगण्यात आलं. त्यांनी निवडणुकीसाठी अर्ज केला पण तेव्हा नगर जिल्ह्या हा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आलेल्या १९५७ च्या निवडणुकीत तेच उमेदवार असणार हे निश्चित झालं होतं. याच दरम्यान संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारला गेला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या बाजूने खताळ होते. पक्षश्रेष्ठींना खरमरीत पत्र लिहून आपण या काळात उभा राहणार नसल्याचं त्यांनी कळवलं. त्याच सोबत पक्ष जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करु अस देखील सुचवलं. 

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि १९६२ सालच्या पहिल्या निवडणुका लागल्या.

खताळ हे या निवडणुकीत उमेदवार होते. त्यांनी निवडणुक लढली आणि ते जिंकून देखील आले. महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रीमंडळात ते सहकार राज्यमंत्री होते. त्यानंतर महसूल, विधी व न्याय, अन्न नागरी पुरवठा, पाठबंधारे, नियोजन, अशा विविध खात्यांचा कारभार त्यांनी पाहिला. 

त्यांनी काय केलं अस कोणी विचारलं तर महाराष्ट्रातील पाठबंधारे प्रकल्प आणि त्यांच समीकरण समजून सांगाव वाटतं. कोल्हापूरचे दुधगंगा-वेदगंगा, सांगलीचे चांदोली, सातारचे धोम, पुण्यातील चासकमान, अप्पर वर्धा, नांदेडचे विष्णुपूरी अशी कित्येक धरणांची त्यांच्या कार्यकाळात पायाभरणी झाली. 

यशवंतराव चव्हाण, मोरोतराव कन्नमवार, वंसतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार, अंतुले, बाबासाहेब भोसले अशा मुख्यमंत्र्यांच्या काळात त्यांची राजकीय कारकिर्द बहरली. त्त्यांनीच श्रमदानातून रस्तेनिर्मितीला चालना दिली.इंदिरा गांधींनीच त्यांना प्राग येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सहकार परिषदेला पाठवलं होतं. 

असे हे खताळदादा साहित्यात देखील तितकेच मातब्बर होते. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी लिखानास सुरवात केली साहित्याची आवड असणाऱ्या खताळांना मराठी, इंग्रजी, ऊर्दू, गुजराती, हिंदी अशा भाषा येत असत. साहित्याच्या आवडीतूनच त्यांनी स्वत:चा स्वतंत्र असा शब्दकोश तयार करण्यास सुरवात केली होती. अंतरीचे धाव, गुलामगिरी, धिंड लोकशाहीची, गांधीजी असते तर अशी पुस्तके त्यांनी लिहली. ते संगमनेरच्या साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक तर होतेच पण प्रवरा साखर कारखान्याचे पहिले सभासद देखील होते. 

सर्व गोष्टीमध्ये एक नंबरला असणाऱ्या खताळदादांनी वयाच्या ६५ मध्ये १९८५ साली सक्रिय राजकारणातून संन्यास घेतला. त्यानंतर अगदी कालपरवापर्यन्त ते समाजकारणात सक्रीय होतेच. बोलभिडू तर्फे बी.जे. खताळ यांना भावपुर्ण श्रद्धांजली. 

हे हि वाच भिडू. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here