बी.जी शिर्केंमुळे पसरणी गावातला प्रत्येक तरुण फॉरेनला जावू शकला.

पोटाला लावणारी माणसं. ग्रामिण भागात गेलात तर पोटाला लावणारा माणूस असा एक शब्दप्रयोग आहे. पंचक्रोशीत, तालुक्यात एखादा माणूस असतो. जो शुन्यातून विश्व निर्माण करतो. पण हे सर्व करत असताना आपल्या गावाला, आपल्या माणसांना विसरत नाही. तो शून्यातून उभा राहतो पण आपल्या मागच्या माणसांना पोटापाण्याला लावतो. त्यांना नोकऱ्या देतो. दोन वेळेच खायला मिळेल याची तरदूत तो करतो.

असाच एक उद्योजक म्हणजे बी.जी. शिर्के.

त्यांच्यामुळे त्यांच्या गावाच प्रत्येक तरुण परदेशात जावू शकला. चांगले पैसै कमावू शकला, नोकरीतून घरसंसार उभा करू शकला. वाई जवळच्या पसरणी गावात गेलात तर मोठ्या अभिमानाने लोक बी.जी शिर्केंच नाव घेतात. 

बांधकाम क्षेत्रातले शिवाजी म्हणून देखील त्यांचा उल्लेख केला जातो.

महाराष्ट्राच्या छोट्या गावात, एका शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या या तरुणाने स्वत:ची कंपनी सुरू करून देश-परदेशात कामे मिळवली. वीर धरण, बालेवाडीचं क्रिडासंकुल, कर्नाटकचे विधानभवन, पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क, बंगलोर येथील आयटी पार्क, भारताचे संरक्षण मंत्रालयाची इमारत, मुंबई-बंगलोर हायवे अशा कित्येक वास्तूंवर बी.जी. शिर्केंचा शिक्का बसला आहे. 

बी.जी. शिर्के शेतकरी कुटूंबातले. वाई जवळच असणार आणि ऐतिहासिक ठेवा असणारं पसरणी हे त्यांच गाव. कमवा व शिका पद्धतीने वाईच्या द्रविड हायस्कुलमध्ये ते शिकले. पुढे फर्ग्युसन कॉलेज व त्यानंतर पुण्याच्या COEP मधून सिव्हिल इंजिनियर झाले. 

शिर्के सिव्हिल इंजिनियर झाले ते साल होतं १९४३ चं.

या काळात पसरणी गावातच काय तर संपुर्ण तालुक्यातून इंजिनियर झालेले ते पहिले व्यक्ति असावेत. त्या काळातील पद्धतीप्रमाणे शिक्षणातून नोकरी हा मार्ग पत्करत त्यांनी नाशिकची तेजुकाया कंपनीत नोकरीस सुरवात केली. काही दिवस नोकरी केली पण स्वत: कंपनी आणि स्वत:च उद्योग उभारण्याची त्यांची इच्छा त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. त्यातूनच ९ सप्टेंबर १९४४ रोजी दसऱ्याच्या दिवशी स्वत:च्या अशा सुप्रीम कंन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना केली. 

कंपनी उभा राहिली पण काम मिळणं महत्वाच होतं. नुकत्याच इंजिनियर झालेल्या, कोणताच अनुभव नसणाऱ्या व्यक्तीला कोणी काम देण्याची शक्यता अजिबातच नव्हती. अशा वेळी उपयोगाला आला तो प्रामाणिकपणा. 

पुण्यातली लष्करी छावणीला कंपाऊडची भिंत घालायची माहिती त्यांना मिळाली. हे काम मिळवायचं या ध्येयाने या तरुणाने लष्करी अधिकाऱ्यांना गाठलं. लष्करी अधिकाऱ्यांना विनंती केली, बोलत असताना लष्करी अधिकाऱ्याला दिसला तो फक्त त्यांचा प्रामाणिकपणा. 

लष्करी अधिकाऱ्याने त्यांना लष्करी छावणीचे कंपाऊंड बांधण्यात काम दिलं. हेच शिर्के यांच्या सुप्रीम कंन्स्ट्रक्शनने केलेले पहिले काम. 

कामाच्या शोधात शिर्के संपुर्ण पुणे शहर सायकलवरून पालथे घालू लागले. १९४५ च्या सुमारास त्यांना कोल्हापूरच्या कारागृह बांधकामाचे कंत्राट मिळाले. एका नवख्या तरुणावर आलेली हि सर्वात मोठ्ठी जबाबदारी होती. पण मोठ्या कमालीने त्यांनी हे काम पुर्णत्वास नेले. इतकं मोठ्ठ काम एका नवख्या तरुणाने पुर्ण केल्यामुळे त्यांच्या नावाचा चांगलाच दबदबा निर्माण झाला. सुरवातीला चेष्टेत घेणारे मोठ्ठमोठ्ठे बांधकाम व्यावसायिक त्यांच नाव आदरणारे घेवू लागले. त्याच दरम्यानच्या काळात त्यांच लग्न झालं. 

पुढे १९५३ सालात त्यांनी पुणे विद्यापीठातील केमिस्ट्री डिपार्टमेंटची इमारत पुर्ण केली. याच दरम्यान नीरा नदिवरील वीर धरणाच्या बांधकामाची निविदा निघाल्याचं त्यांना समजलं. त्यांची निविदा मंजूर झाली आणि हे काम देखील त्यांना मिळालं. 

किर्लोस्कर कंपनीच्या शंतनुराव किर्लोस्करांना त्यांच्या कामाची माहिती मिळाली आणि किर्लोस्कर कंपनीची सर्व कामे विनानिविदा त्यांना मिळण्याची सोय शंतनुराव किर्लोस्कर यांनी केली. 

बांधकाम व्यवसायिक हिच त्यांची ओळख झाली. परंतु बांधकाम व्यवसाय वेगळ्या उंचीवर घेवून जाण्यासाठी त्यांनी SIPOREX कंपनीची स्थापना केली.हि कंपनी बांधकाम व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्य उत्पादन करणारी कंपनी होती. पण हि कंपनी स्थापन करत असताना प्रचंड अडचणी आल्या. त्या दरम्यान बी.जी. शिर्के यांनी इंदिरा गांधीपासून अनेकांना पत्र लिहली. कोणतिही गोष्ट सुरू करताना भारतात असणारा भ्रष्टाचार आणि काळा पैसा यावर ताशेरे ओढले. सरकारी कारभार, लाच अशा गोष्टींना थारा न देता १९७२ च्या दरम्यान SIPOREX कंपनी उभा राहिली. 

कंपनी उभा राहिली पण पुन्हा काम मिळणे हि महत्वाची गोष्ट होती.

त्या काळात दुबई प्रचंड वेगाने बदलत होती. तेलाचा पैसा निर्माण होत होता. दुबईत मोठ्या प्रमाणात बांधकाम क्षेत्र विस्तारत होतं. पण यामागे अडचण होती ती मनुष्यबळाची. याच काळात दुबईचं मोठ्ठ काम त्यांच्या कंपनीकडे चालून आलं. लागणारं बांधकाम साहित्य आणि मनुष्यबळ अशा दोन्ही गोष्टी शिर्केंमुळे शक्य झाल्या. 

आज दुबईमध्ये ७० ते ८० च्या काळातील ज्या बिल्डींग, मशिदी, हॉटेल दिसतात. त्यातील बहुतांश वास्तु बांधण्याचा मान शिर्के यांच्याकडे जातो. याकामासाठी जे मनुष्यबळ हवं होतं त्यासाठी त्यांनी पसरणी गावातील तरुणांना संधी दिली. गावातील घरटी एक तरुण फॉरेनमध्ये जावू लागला. शिर्केच्या कंपनीत नोकरी करुन डॉलरमध्ये पैसै कमावू लागला. 

आपल्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी फ्रीफॅब हे नवे तंत्रज्ञान विकसित केले. या तंत्रज्ञानामुळे विक्रमी वेळेत कामे पुर्ण होवू लागली. या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी जगभरात दिड लाखाहून अधिक घरे बांधली.

१९९४ साली पुण्यातील बालेवाडी येथे १६५ एकरांच्या माळरानावर श्री शिवछत्रपती क्रिडानगरी विकसीत करण्याचे धोरण आखण्यात आलं. त्याची जबाबदारी शिर्के यांच्याकडे देण्यात आली. शिर्के यांनी एका वर्षांच्या आत संपुर्ण क्रिडीनगरीच भव्य बांधकाम पुर्ण केलं. 

त्यांच्या प्रामाणिकपणामुळेचे वीर धरण, बालेवाडीचं क्रिडासंकुल, कर्नाटकचे विधानभवन, पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क, बंगलोर येथील आयटी पार्क, भारताचे संरक्षण मंत्रालयाची इमारत, मुंबई-बंगलोर हायवे अशा कित्येक गोष्टी आकारास येवू शकल्या. 

हे हि वाच भिडू.