कृष्णेचा वाघ बापू बिरू जेव्हा अरूण गवळीला भेटला तेव्हा…

नुकताच उन्हाळा चालू झालेला. मार्च एप्रिलचा महिना असेल. कराडच्या इस्लामपूर दरम्यान हायवेवरच्या एका ऊसाच्या रसाच्या गाड्यावर गाडी थांबवली. साधारण पन्नाशीच्या पुढे झुकलेला एक म्हातारा. आम्ही पोरं बोलत होतो तेव्हा बापू बिरूचा विषय सुरू झाला.

बापू बिरूची दहशत कृष्णा काठाच्या संपुर्ण पट्ट्यात होती. सांगली, सातारा आणि कोल्हापूर तिन्ही जिल्ह्यातली लोकं “बापू बिरू” या नावाला चांगलेच परिचित होते. 

पोरींना नांदवत नसले की दारापुढं बापू बिरू भाऊ म्हणून उभा रहायचा. सावकारी वाढली, भाऊबंदकीत खून झाले, घरं उघड्यावर पडली की प्रत्येकाला पहिला आणि शेवटचा पर्याय बापू बिरू वाटायचा. हजारों माणसांच्या एका हाकेवर धावून जाणारा बापू बिरू वाटेगावकर नावाचा ढाण्या वाघ कृष्णा नदिच्या खोऱ्यात मुक्तपणे संचार करत राहिला. पोलीसांनी त्यांना पकडून देण्यासाठी मोठ्ठी रक्कम बक्षीस म्हणून लावली. पण लहानथोरांसाठी धावणाऱ्या बापू बिरूच्या प्रेमासाठी एक व्यक्तीदेखील फुटला नाही.

त्या हायवेवर आमच्या चर्चा रंगात आल्या होत्या. तेव्हा ऊसाचा रस काढणारा तो इसम जवळ आला. 

तो म्हणाला, 

बापू बिरू बाहेरच्यांना गुंड वाटायचा, माझी आई लगीन करुन या गावात आली. घरची श्रीमंती म्हणजे गावात आमची १५-२० एकर शेती. गावात चांगल घर. माझ्या बापाचं पंचक्रोशीत चांगल नाव. चांगला माणूस होता तो. पण भावबंदकीचा वाद झाला आणि शेतावर गेल्यानंतर माझ्या बापाला मारला. त्यानंतर सख्या चुलत्यांनी सगळी शेती ताब्यात घेतली. मी तेव्हा पाच सहा वर्षाचा असेल. मला मारल तर पुढ वाटणीचा प्रश्नच नव्हता. आईला आणि मला मारायचा डावच होता. पण बापाच्या कार्याला आलेल्या शे दोनशे जणांच्यात बापू बिरू आला.

आई सांगते तो आला आणि सांगितलं आणि म्हणाला, हि माझी भैन. हिला हात लावला तर एकेकाला जिता गाडील. 

बापू तेवढं बोलला आणि आल्या पावली गायब झाला. एका शब्दाची दहशत बसली आणि आई जगली. आईला विहरीत ढकलून मारायचं ठरवलेलच तेनी. मी पण मेलो असतो. पण जगलो. शेतात वाटणी झाली. पुढे भावबंदकीचा त्रास झाला नाय की गावात माझ्या अंगाला हात लावायची कुणाची हिंम्मत झाली नाही. 

बापू बिरूमुळे जगलेली हजारो माणसं कृष्णेच्या पट्ट्यात दिसतील. बापू बिरू वाटेगावकर धनगर समाजाचे. अनेकजण त्यांच्यावर आरोप करायचा म्हणून मराठा विरुद्ध धनगर अशी जातीय किनार देखील देतात. पण हे अनेकजण या भागातले नसतातच मुळी. जातीनुसार सांगायच झालं तर बापू बिरूमुळे जीव वाचलेली कित्येक माणसं मराठा होती. मुळात बापू बिरूंनी कधी जात बघितलीच नाही. जो गरिबाला नडतो त्याला तोडायचा. अडल्या नडल्याच्या मागे उभा राहचं हे एकमेव तत्व बापू बिरूने आयुष्यभर जपलं. 

बापू बिरू वाटेगावकरांच गाव बहे बोरगाव.

ताकारी आणि इस्लामपूरच्या दरम्यान असणारं. कृष्णेच्या काठावरचं एक श्रीमंत गाव. गावाला शेतीच क्षेत्र मोठ्ठ. त्यात पुर्वीपासूनची श्रीमंती. ब्रिटीशाच सरकार गेल्यानंतर भारताच प्रशासन सुरू झालं होतं. गावगाड्यात अजून पोलीस, यंत्रणा तितकी सक्षम नव्हती. मुळात लोकशाहीची पाळेमुळे म्हणावी तितकी रुजली नव्हती. याच परिस्थितीचा फायदा घेवून गावगुंडाकडून नंगानाच सुरू होता. आयाबहिणीच्या अब्रुला दिवसा ढवळ्या हात घातला जायचा. एखाद्याचं बोकड घेवून मटणाच्या पंगती बसायच्या तर एखाद्याच्या घरातल्या बाईच्या पदराला हात घातला जायचा. 

असाच गावातला गुंड म्हणजे रंग्या शिंदे. रंग्या शिंदेची ३५ जणांची गॅंग होती. रंग्याची मातंग समाजातील एका बाईवर नजर होती. तो त्या बाईच्या घरात शिरला आणि तिला सांगितलं नवरा सोड, पोरं सोड आणि माझ्याकडं येवून रहा. बाई म्हणली मरणाला भित नाय आम्ही. झालं पण तसच. ती बाई मेली पण रंग्या शिंदेकडं गेली नाही. हि गोष्ट बापू बिरूला समजली. तेव्हाच रंग्या शिंदेला संपवण्याचा डाव बापू बिरूने आखला होता. 

त्या काळात गावात गणपती बसलेली. गणपती समोर ओव्याचा कार्यक्रम चालू होता. रात्रीचे ११ वाजले आणि मंडपात रंग्या शिंदे घुसला. रंग्या शिंदेने बायकांच्या अंगावर हात घालायला सुरवात केली. दंगा सुरू केला.

तिथेच बापू बिरू बसलेले. बापू बिरू पुढे गेले आणि रंग्याला म्हणले, 

काय करताय अण्णा तुम्हाला शोभतं का..? 

कालचा धनगराचा पोरं आपल्याला बोलतो म्हणून रंग्या पिसाळला. पण बापूने मोठ्या शिताफीने त्याला शांत केलं. बापू बिरू म्हणले चला मागं बसू घोंगडीवर. पान खावूया. रंग्या बापूबरोबर घोंगडीवर बसला. तेव्हा रंग्याला मातंग समाजातील त्या महिलेच्या खूनाबद्दल अटक केली होती. पण पुरावा आणि साक्षीदार नसल्याने त्याला सोडलं होतं. रंग्या त्यामुळेच जास्त माजला होता.

बापू शेजारी बसून सुपारी कातरू लागले. त्यांच्या खिश्यात चाकू होता. शेजारीच कुऱ्हाड होती. कुऱ्हाडीने मारायचा तर कोणीतरी अडवलं असत आणि उलटी बापूचीच गेम झाली असती. म्हणून बापूंनी चाकून रंग्याला भोकसायचा निर्णय घेतला. 

बसल्या जागेवर कंबरेला लावलेला चाकू खोलता येत नव्हता म्हणून बापू उठले. बापू उठले तसा रंग्या शिॆदेला संशय आला. कुठं चालला या प्रश्नावर बापू म्हणले, मुताय चाल्लो येता का. रंगा दुर्लक्ष करून पुन्हा सुपारी कातरत बसला. माग जावून बापूने चाकू खोलला आणि  रंग्या शिंदेच्या पोटाला लावला. एका डावात रंग्या शिंदेचा कोथला हातात आला. 

बापू तिथनं पळाले आणि ऊसात गेले. पुढं बापूला पण माहिती नसावं पुढचे पंचवीस वर्ष हा ऊसच त्यांच घर असणार आहे. बापू फरार राहिले. पोलीस शोधून लागले. पण इकडं गावातल्या लोकांनी पोळ्या केल्या. रंग्या शिंदेसारखा गुंड मारल्याची चर्चा पंचक्रोशीत गाजली. 

अडल्या नडलेली माणसं बापू बिरू सोबत येत गेली. बापूंनी याच टोळीतली १२ माणसं संपवली.  बापूंच्या टोळीत ५० माणसं होती. एकावेळी बापू बिरू सोबत फक्त दोन ते तीनजणच असायचे. 

अशाच एका रात्री बापू १२ वाजता बहे गावच्या रामलिंगाच्या मंदिरात गेले. बापू बिरूंसोबत दोघं तिघं होते. रात्री मंदिराच्या आवारात एक महाराज जप करत बसलेले. बापू गेले पुजाऱ्याला उठवलं देवाचं दर्शन गेले आणि बाहेर पडू लागले तोच जप करत असणारे महाराज आडवे आले. 

महाराज म्हणाले,

इतक्या रात्रीचं दर्शन घेतात का. पुजाऱ्याला कशाला त्रास द्यायचा. 

तेव्हा बापू म्हणाले,

पोलीसाचं भ्या..! म्हणून रातचं यायला लागलं. 

पोलीसाचं भ्या म्हणताच, महाराज म्हणाले कोण बोरगावकर का? बापूंनी होय म्हणताच.

महाराज म्हणाले, लय भारी काम केलं. समद्या गावानं पोळ्या करुन खाल्या. वाईट काम करणाऱ्याला संपवताना माग पुढं बघायचं नाही. फक्त एक काम करायचं मटण खाल्ली की मस्ती येते. दारू पिली की माणूस भूलून जातो. बिडी, तंबाखू कायच करायचं नाही. बाईच्या नादाला लागायचं नाय. कुणाचा पैसा घ्यायचा नाय. जेवायला मागायचं. मिळल ती भाकरी खायची आणि काम करायचं. 

त्या महाराज गोंदवलेच्या स्वामी समर्थांचे शिष्य जोगळेकर महाराज होते. पुढे बापू बिरू महाराजांच्या याच रस्त्याने वागू लागले. टोळीतला एकही जण व्यसन करायचा नाही. लोकांकडून पैसै मागायचा नाही. 

गावागावात बापू नावाच वादळ याच काळात सुरू झालं. दिवसभर उसात झोपायचं. अडल्यानडल्याच्या घरी जायचं. त्याची मदत करायची. कोणी आडवा आलाच तर त्याला थेट मारून टाकायचा. बापू बिरू वाटेगावकरांची दहशत फक्त गावगुंडाना होती. बायकोला न नांदवणारी, वाटणीपायी भावाचा खून करणारी, आयाबहिणींच्या अब्रुला धक्का लावणारे असे गुंड इतिहासजमा झाली. बापू बिरू येईल म्हणून कित्येकांनी गावं सोडली. 

पोलीस बापू बिरूच्या मागावर होते पण बापू बिरू काय घावत नव्हते. बापूंचा पत्ता माणसं सांगायची नाहीत. अशातच एक दिवस बापूंना वसंतदादा भेटले होते. वसंतदादा आणि राजारामबापू दोघांनी बापू बिरुला शरण येण्यास सांगितले होते. वसंतदादा तर बापूंना म्हणाले होते की, तूला एक दिवस जेलमध्ये राहून देत नाही. आज हजर हो उद्या जामीन करतो. पण बापू बिरूंच म्हणणं होतं की, सुटलो तरी जीवाची हमी कोण घेणार.. 

SRP नावाचं दल खास बापू बिरूंना पकडण्यासाठी आलं.. 

इतके वर्ष बापू बिरू सापडत नाही हा विषय़ पोलिसांसाठी अब्रु घालवणारा झाला होता. काहीही करुन बापूला पकडायचं म्हणून खास SRP टिमला बोलवण्यात आलं. SRP टिमने मळं पालथं घालायला सुरवात केली. टिममधले पोलीस खास प्रशिक्षित होते. पाण्यात बुडून दबा धरून बसायचे अशी गावात चर्चा सुरू झाली. बापूंनी कृष्णेत उडी मारून नदी पार केली. ते थेट किर्लोस्करवाडीला पोहचले आणि त्यानंतर नाशिक पंचवटीला गेले. तेथे भगवी कपडे घातली आणि १२ वर्ष भारभ्रमण केलं. केदारनाथ पासून ते गंगासागर पर्यन्त सर्व तिर्थक्षेत्र पालथी घातली.१२ वर्षांनंतर बापू बिरू वाटेगावकर पुन्हा सांगली जिल्ह्यात आले. 

अलगत पोलीसांनी त्यांना जाळ्यात पकडलच. बापूंना पकडल्याची बातमी गावभर झाली. गावातून जिल्ह्यात आणि जिल्ह्यातून राज्यात झाली. सुतक पाळल्यासारखे लोक शांत झाली. बापूंना दोन दिवस सांगलीच्या जेलमध्ये ठेवून तिथून कळंबा जेलला घेवून जाण्यात आलं. तिथ त्यांच्या टोळीतल्या काहीजणांनी बापूंना पळवून नेण्याचा प्लॅन रचला. प्लॅन निम्यावर फसला आणि बापू बिरूंची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली. 

बापू बिरू आणि अरूण गवळी यांची भेट याच जेलमध्ये झाली. 

बापू बिरूंना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तिथे अरुण गवळी देखील होता. तो बापूंचे नाव ऐकून होता. मोठ्या सन्मानाने त्याने बापूंना बोलावून घेतलं. जेलमध्ये त्यांची भेट झाली. या भेटीत अरुण गवळीने बापू बिरूंना विचारलं माझी एवढी गॅंग आहे, आमच्याकडं हत्यारं आहेत. मुंबईत आमची दहशत आहे पण आमचं नाव झालं नाही. तुमचं इतकं नाव का..? 

बापू गवळीला म्हणाले, 

आम्ही कुणाच्या रुपायाचा मिंध नाय. जेवणावर लोकांचे संसार उभा करून दिले. जिवाला जिव देणारी माणसं जोडली. पैका घेवून काय करायचं. म्हणूनच माणसं सोबत राहत्यात. 

बापूंच्या या उत्तरावर गवळीला देखील काहीच बोलता आलं नाही.  बापू बिरू जसे बाहेर होते तसेच ते जेलमध्ये राहिले. सच्चा प्रामाणिक माणसाप्रमाणे.  त्यांची चांगली वर्तवणूक पाहून त्यांना सोडण्यात आलं. जेलमधून बाहेर आलेले बापू प्रवचन देवू लागले. व्यसन करू नका म्हणून तरुणांना सांगू लागले. वयाची शंभरी गाठली आणि अखेर बापू बिरू नावाची धगधगती मशाला शांत झाली. 

हे हि वाच भिडू.