दस का दम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दहा गोष्टी. 

सध्याच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा चेहरा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. कदाचित त्यांच्याच कार्यकाळात सर्वात जास्त मोर्चे निघाले असावेत. पण दूसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक मोर्चा हा शांततेत हाताळण्याच काम देखील त्यांनीच केलं हे नाकारून चालणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे सांगतात की पुढचा मुख्यमंत्री मीच, ते शरद पवारांना देखील आपल्या भाषणातून आव्हान देत आहे. तिसरीकडे राज ठाकरे यांच्या आरोपांना सभ्यपणे खोडून काढण्याच काम देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे. 

म्हणूनच या चर्चेत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे दहा गोष्टी खास बोलभिडूच्या वाचकांसाठी. 

१) देवेंद्र फडणवीस यांची जन्मतारीख २२ जुलै १९७०. नागपूरच्या धरमपेठ येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते गंगाधरराव फडणवीस यांचे ते दूसरे पुत्र. त्यांच्या मोठ्या भावाचे नाव आशिष. घरात लहानपणापासून संघाचे वातावरण असल्याने त्यांच्यावर देखील संघाचा खोलवर प्रभाव पडला. 

२) १९९७ मध्ये देवेंद्र फडणवीस महापौर झाले. त्या वेळी राज्यात युतीचे शासन होते. युतीच्या शासनात १९९८ साली महापौर संकल्पना पुढे आली. देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती मेयर इन कौन्सिल पदावर करण्यात आली. असा सन्मान मिळवणारे ते राज्यातले एकमेव नेते ठरले. 

३) वयाच्या ३६ वर्षी देवेंद्र फडणवीस यांच लग्न झालं. तेव्हा ते राजकारणात सक्रीय होते. नागपूरमधील प्रसिद्ध डॉ. चारू रानडे आणि नेत्ररोगतज्ञ डॉ. शरद रानडे यांच्या कन्या अमृता रानडे यांच्यासोबत देवेद्र फडणवीस यांचे लग्न झाले. 

४) देवेंद्र फडणवीस यांची आमदरकीची पहिली टर्म सुरू होती. २००४ साली त्यांनी नागपुरमधील रेडिमेड कापडाच्या एका फर्मसाठी मॉडेलिंग केले होते. त्यांचे मित्र विवेक रानडे यांनी हे फोटोशूट केलं होतं. ही जाहिरात पाहून अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना खास दिल्लीला भेटायला बोलवलं होतं. जेव्हा हि भेट झाली तेव्हा वाजपेयी म्हणाले होते, व्वा ! व्वा! क्या स्मार्ट मॉडेल हे ये… 

५) वसंतराव नाईक यांच्यानंतर सलगपणे आपला कार्यकाळ पुर्ण करणारे ते महाराष्ट्राचे एकमेव मुख्यमंत्री ठरणार आहेत. ५ डिसेंबर १९६३ साली वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची सुत्र हातात घेतली ती २० फेब्रुवारी १९७५ अखेरपर्यन्त त्यांच्या हाती राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धूरा होती. त्यानंतर महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले वसंतदादा पाटील चार वेळा,  शरद पवार चारवेळा, विलासराव देशमुख दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले मात्र कोणत्याच मुख्यमंत्र्यांना आपला कार्यकाळ पुर्ण करता आला नाही.

केंद्रासोबत राज्यातील निवडणुका जाहीर करण्यात आल्या असत्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील सलग पाच वर्ष कारभार हाताळता आला नसता. मात्र सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सलग पाच वर्ष कारभार करणारे मुख्यमंत्री ठरू शकतात. केंद्रातील निकालानंतर राज्यातील नेतृत्वात बदल घडले नाहीत तर वसंतराव नाईक यांच्यानंतर दूसरे म्हणून हा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळू शकतो.  

६) दूसरीकडे देवेंद्र फडणवीस देशातील सर्वाधिक गुन्हे दाखल असणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुक आयोगाला देलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार आणि असोशिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफार्म्स या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात हि माहिती देण्यात आली आहे. एकूण २२ गुम्ह्यांपैकी ३ गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामध्ये IPC 134 आणि IPC 324 अंतर्गत गुन्ह्यांची नोंद आहे.  

७) नागपुर महानगरपालिकेचे महापौर म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती वयाच्या २८ व्या वर्षी करण्यात आली. देशाच्या इतिहासात दूसरे सर्वात तरुण महापौर म्हणून ते गणले गेले. (संदर्भ : देवेंद्र फडणवीस लेखक सुषमा नवलखे, वरदा प्रकाशन पुणे ).  

८) आणिबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांना अटक करण्यात येत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांना देखील अटक करण्यात आली होती. त्या वेळी देवेंद्र फडणवीस इंदिरा गांधी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होते. आणिबाणीला विरोध म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी या “इंदिरा गांधी” स्कूलमध्ये जाण्यास नकार दिला. 

९) १९९९ मध्ये होनुलुलू अमेरिका येथे इंटरनॅशनल एनव्हायर्नमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण, २००६ मध्ये स्वित्झलॅंडमध्ये डिझास्टर मीटिगेशन अॅंड मॅनेजमेंट इन इंडिया या परिषदेत आपत्ती व्यवस्थापनासंबधी माहिती. २००५ मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशविले येथे यू.एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स मध्ये सहभाग. 

१०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २००२-०३ साली कॉमनवेल्थ पार्लमेंटरियन सर्वोत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार मिळाला आहे. आतंराष्ट्रीय वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार तर रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग युथ विभागिय पुरस्कार देखील मिळाला आहे. 

हे ही वाच भिडू. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here